मार्केट आपटलंय, मग आता काय करायला पाहिजे भिडू?
गेले काही दिवस तुफान फॉर्मात असलेलं शेअर मार्केट कोसळल्यानं गुरूवारी गुंतवणूकदारांमध्ये चांगलीच चिंता पसरली. तसं गेले काही सत्र मार्केट जरा डाऊन होतंच, पण गुरुवारी ११५८ पॉईंट्सनं कोसळलं आणि ५९,९८४ पॉईंट्सवर क्लोज झालं. निफ्टीही ३५३ पॉईंट्सनं कोसळून १७,८५७ पॉईंट्सवर बंद झाली.
३० एप्रिल २०२१ नंतर मार्केट पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या फरकानं कोसळलं. तज्ञांच्या मते पुढच्या दोन आठवड्यांत मार्केट आणखी कोसळेल अशी दाट शक्यता आहे.
मार्केट का पडलं?
या वर्षभरात सेन्सेक्स २७ टक्क्यांनी वाढला आहे. कोविडची दुसरी लाट आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर पडलेला परिणाम या गोष्टी असूनही मार्केटनं मोठी झेप घेतली. जागतिक बाजारपेठेतली हाय लिक्विडीटी, चांगल्या कमाईत वाढ आणि भारतीय अर्थव्यवस्थेत चांगली वाढ होईल अशी आशा, या गोष्टींमुळे सेन्सेक्स सातत्यानं वाढत राहिला.
मार्केट सतत वर गेल्यानं व्हॅल्युएशनच्या बाबतीत स्टॉक्स महाग झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि मार्केटमध्ये सहभागी असलेल्यांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता आहे. मात्र गुरुवारी झालेल्या पडझडीचा सर्वात जास्त प्रभाव गेल्या सहा महिन्यात किंवा वर्षभरात मार्केटमध्ये गुंतवणूक करणं सुरू केलेल्यांवर पडेल.
सध्या परदेशी गुंतवणूकदारही आपल्या होल्डिंग्स कमी करीत आहेत. गेल्या सहा ट्रेडिंग सेशन्समध्ये त्यांनी १२,८६६ कोटी रुपयांच्या देशांतर्गत इक्विटी विकल्या आहेत. साहजिकच मार्केटला याचा मोठा फटका बसला आहे.
करेक्शन आणखी खोल असेल का?
गेल्या आठवड्यात ६२,२४५ चा उच्चांक गाठल्यानंतर सेन्सेक्स ३.६ टक्क्यांनी घसरला आहे. गुंतवणूकदारांचं असं म्हणणं आहे की, ही करेक्शन लार्ज कॅप निर्देशांकांमध्ये १० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते, तर मिडीयम आणि स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये १५-२० टक्क्यांपर्यंत असू शकते. जर परदेशी गुंतवणूकदारांनी त्यांचे होल्डिंग्स कमी करणं सुरू ठेवलं, तर करेक्शन आणखी खोलवर जाण्याची पूर्ण शक्यता आहे.
पुढच्या महिन्यात फेडरल रिझर्व्हकडून बॉण्ड पर्चेस प्रोग्रॅम सुरू झाल्यानंतर, परदेशी गुंतवणूकदारांची प्रतिक्रिया काय येतेय, हे सुद्धा महत्त्वाचं ठरेल. मार्केटला उच्चांक गाठून देण्यात ग्लोबल लिक्विडीटीचा मोठा वाटा आहे, जर ही लिक्विडीटी कमी झाली तर साहजिकच याचा परिणाम मार्केटवर होईल आणि करेक्शन आणखी जास्त होईल.
आता तुम्हाला पडलेल्या गंभीर प्रश्नाचं सोपं उत्तर, काय करायला हवं?
जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल, तर गुंतवणूक होल्ड करा. मार्केट तज्ञांच्या मते, लॉंग टर्म फंडामेंटल्स मजबूत राहतील आणि इक्विटीज ३ ते ५ वर्षांत अधिक चांगली कामगिरी करतील. सध्या अनेकजण नफा काढून घेत आहेत आणि चांगली किंमत असलेल्या बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करत आहेत. करेक्शननंतर मात्र गुंतवणूकदार पुनरागमन करतील आणि मार्केट वधारेल.
त्यामुळे तज्ञांचं मत लक्षात घ्या आणि पडलंय पडलंय म्हणून शेअर्स विकू नका. आणि हा तुमच्या ओळखीतल्या मार्केट एक्स्पर्ट्सकडूनही सल्ला घ्या. उगं हर्षद मेहता बनायला जाऊ नका.
हे ही वाच भिडू:
- आयआरसीटीच्या शेअरची ट्रेन नेमकी का घसरली?
- झुनझुनवाला मोदी भेट काल व्हायरल झाली आणि आज टाटांचे शेअर्स वाढले!
- शेअर मार्केटचं अप्पर सर्कीट आणि लोअर सर्कीट नेमक काय असतय..?
Nice