औरंगजेबाने बांधलेली ज्ञानवापी मशीद पाडायचा पहिला प्रयत्न मल्हारराव होळकरांनी केला होता..
सतराव्या शतकातील गोष्ट.
आग्ऱ्यात भेटीला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मुघल बादशाह औरंगजेबाने दगा कैद केले. मराठ्यांना संपवून अख्खा दक्षिण भारत आपल्या ताब्यात घेण्याचं स्वप्न तो पाहत होता. पण ते घडायचं नव्हतं. छत्रपतींनी त्याच्या सैन्याला गुंगारा देऊन आग्ऱ्यातून सुटका करून घेतली.
आलमगीर भडकला. एवढ्या कडक सुरक्षा व्यवस्थेतून सिवा आणि संभा पळून जातातच कसे हा प्रश्न त्याला पडला होता. त्याने आपली शाही सेना त्यांना शोधून काढायला पिटाळली. त्यांनी जंग जंग शोधलं पण शिवाजी महाराज त्याच्या हाती सापडले नाहीत. वेषांतर केलेले महाराज राजगडावर जाऊन पोहचले ही बातमी कळताच औरंगजेबाचा रागाने तिळपापड झाला.
त्याच्या जखमेवर मीठ चोळल्या प्रमाणे झाले होते. त्याला वाटत होतं की राजा जयसिंगाच्या मुलांनी शिवरायांना आग्ऱ्यातून बाहेर पडण्यास मदत केली. आपला राग भरून काढण्यासाठी त्याने कट्टरतेचा सहारा घेतला. त्याने हिंदूंवरील अत्याचार वाढवले. मंदिरांची विटंबना सुरु केली. आपल्या शक्तीच्या माजात असलेल्या औरंगजेबाने १८ एप्रिल १६६९ रोजी एक फर्मान काढला.
या फर्मानात काशी मथुरा अशा तीर्थक्षेत्रामधील प्राचीन मंदिरे तोडून टाकण्याचा आदेश दिला होता.
पुढच्या साडेचार महिन्यात या आदेशाचे पालन करण्यात आले. जिथं गेल्यावर गंगेच्या पवित्र पाण्यात डुबकी मारून सगळी पापं नष्ट होतात असं म्हटलं जात त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराची नासधूस करण्यात आली. तिथला कळस फोडण्यात आला. बारा जोतिर्लिंगापैकी एक समजल्या जाणाऱ्या विश्वेश्वराच्या पिंडीला भ्रष्ट करून ज्ञानवापी विहिरीत फेकून देण्यात आले.
राहिलेल्या अवशेषांवर औरंगजेब बादशाहने मशीद उभी केली. हीच ती ज्ञानवापी मशीद.
जवळपास सत्तर ऐंशी वर्षे उलटून गेली. मराठ्यांना संपवायच स्वप्न घेऊन दक्षिणेत गेलेला औरंगजेब मराठी मातीत गाडला गेला. मराठ्यांनी तिथून संपूर्ण देशात आपला दरारा प्रस्थापित करण्यास सुरवात केली. हिंदवी स्वराज्याचं पुरुथ्थान शम्भूपुत्र शाहू महाराजांनी हाती घेतलं. तरुण कर्तबगार पेशवे पहिले बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची घोडी नर्मदापार दौडू लागली.
ज्या सरदारांच्या मदतीने मराठ्यांनी उत्तरेत आपला दबदबा प्रस्थापित केला त्यातील प्रमुख नाव म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकर.
एका सामान्य धनगर कुटूंबात जन्मलेला आणि फक्त आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठा साम्राज्याचा सुभेदार पदापर्यंत पोहचलेला शूर सेनानी. मल्हारबाबांनी संपूर्ण माळवा प्रांतात आपले वर्चस्व निर्माण केले. छत्रपतींच्या स्वराज्याची कीर्ती दिगंतात पोहचवली होती.
उत्तरेत मोहिमेवर जाताना एक गोष्ट त्यांना राहून राहून खटकत असे. ती म्हणजे औरंगजेबाने काशी विशेश्वराचे मंदिर पाडून उभी केलेली ज्ञानवापी मशीद.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळं झालं होतं. त्यांचे सरदार ठिकठिकाणी आपली संस्थाने बनवून स्वतः नवाब बनले होते. यात देखील पठाण सरदार व इतर असते त्यांचे आपापसात देखील मोठे वाद सुरु होते. त्यांची भांडणे लढाया यामध्ये निष्पाप प्रजा पिसली जात होती. मराठ्यांनी या उमराव नवाबांच्या भांडणाचा उपयोग करून एकसंध भारत आपल्या हातात घेण्याचे प्रयत्न चालवले होते.
रोहीलखंडाचे नवाब पठाण होते. त्यांनी अफगाण बादशाह अब्दालीला भारतात आणून दिल्लीवर राज्य स्थापन करायचं स्वप्न पाहिलं होतं. तेव्हाच्या मुघल बादशहाचा वजीर होता मोहम्मद मुकी अलीम खान उर्फ अवधचा नवाब सफदरजंग.
अब्दाली सारखा रानटी शासक जर भारतात आला तर तो संपूर्ण देशाला उध्वस्त करून टाकेल याची खात्री सफदरजंग याला होती. अब्दाली येण्याआधी त्याला मदत करणाऱ्या रोहिल्यांच्या पारिपत्य करायचा आणि त्यासाठी दक्षिणेतल्या मराठ्यांची मदत घ्यायची असं त्याने ठरवलं.
१७५१ साल असावं. सफदर जंगने आपले वकील जयपूर मोहिमेवर असलेल्या होळकर आणि शिंदे या मराठा सरदारांकडे पाठवले. त्यांच्याशी तह केले. २० फेब्रुवारी १७५१ रोजी होळकर आणि शिंदे शाहीच्या फौज दुआबात उतरल्या. तिथल्या अहमदखान बंगशचा मोठा पराभव केला. हजारो पठाणांना कापून काढण्यात आले.
हे पाहून खुश झालेल्या सफदरजंगाने बादशाहच्या संरक्षणासाठी मराठ्यांशी करार केला. या करारात चौथाईचे हक्क, मोठा भूप्रदेश, खंडणीची मोठी रक्कम याचा समावेश तर होताच पण मराठ्यांनी त्याला काशी, मथुरा या तीर्थक्षेत्रांच्या पुनर्निर्माणाचे अधिकार मागितले.
अवधच्या नवाबाच्या मदतीसाठी म्हणून आलेले मल्हारराव होळकर तेव्हा काशीला आले. त्यांच्या कडे प्रचंड मोठी सेना होती. सफदरजंगावर त्यांचे उपकार असल्यामुळे तो काही म्हणणे शक्य नव्हते. सर्व परिस्थिती अनुकूल होती.
मात्र काशीतील ब्राम्हणांनी “तुम्ही निघून जाल आणि पातशहा आमची कत्तल करेल’ अशी भीती व्यक्त करून सर्व मराठा सरदारांकडे गाऱ्हाणे घातले. अखेर ती मशीद मल्हाररावांनी पाडली नाही. परकीय आक्रमकांना घालवून संपूर्ण सत्ता हातात आल्यावर इथे कशी विश्वेश्वराचे मंदिर पुन्हा उभारायचं त्यांनी ठरवलं.
सुभेदार मल्हारराव होळकरांचे हे स्वप्न त्यांची सून अहिल्याबाई होळकरांनी पूर्ण केलं.
औरंगजेबाने हे मंदिर पाडून तिथे मशीद उभा केली होती. पण अहिल्यादेवीनी या मशीदीशेजारीच नवे भव्य मंदिर उभारले. काशीचा मुख्य समजला जाणारा मनिकार्निका घाट बांधला. पुढे शीख राजा रणजीत सिंहाने या मंदिराच्या शिखरावर सोन्याचा पत्रा चढवला.
हे ही वाच भिडू.
- मल्हारराव आया इतकचं ऐकू आलं की मुघल सैन्य भितीनं पळत सुटायचं
- होळकर घराण्याचे खरे वारसदार कोण आहेत?
- होळकर घराण्याचं जेजुरीशी शेकडो वर्षांचं नातं आहे..
निव्वळ काल्पनिक आणी राजकारण शी प्रेरित चूकीची माहिति….आधी इतिहास वाचा बरोबर