आमचा बैल आठ लाखाला विकत मागतायत पण आम्ही तो विकणार नाही. 

सकाळ सकाळी बोलभिडूच्या मेलवर एक फोटो आला. फोटो होता बैलाचा. पाठवणारे वाचक होते कोल्हापूरचे अप्पा चौगुले. बैलाचा फोटो बोलभिडूच्या मेलवर पाठवण्यात आला आहे, म्हणजे नक्कीच यामध्ये विशेष काहीतरी असणार हे आमच्या संपादकांनी जाणलं. 

ते म्हणाले, मालकांना फोन करा माहिती घ्या, अजून फोटो घ्या बैल खास वाटतोय. आज तूम्ही बैलावर लिहा. मग काय आमच्या मालकांच्या आदेशावरुन आम्ही बैलाच्या मालकांना फोन लावण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला. 

हॅल्लो राजाचे मालक बोलताय का ? 

होय राजाचे मालक बोलतोय, कोण तुम्ही काय काम काढलं ? 

आम्ही म्हणालो, 

“हे बघा तुमच्या बैलाचे फोटो आमच्याकडे आलेत. अस विशेष काय आहे त्या बैलात जरा सांगा की.” 

मालक म्हणाले, 

“आमच्या राजाला आठ लाखापर्यन्त मागणी घातल्या पण आम्ही तो विकणार नाही.”

मालकांनी बैलाची किंमत सांगताच, इकडे पुण्यामध्ये आम्हाला सौम्य धक्का जाणवला. आठ लाखांचा बैल कुठे असतो का? म्हणजे नाही म्हणालयाल बैलाच्या शर्यतीवर आत्ता बंदी आहे पण तरिही बैल मार्केट टिकवून आहेत हे आम्हाला पण माहिती. आत्ता मार्केट का चालू आहे ते शहाण्या लोकांना पहाटेच्या अंधारात काय चालतं ते वेगळं सांगण्याची गरज नाही. साहजिक बैलाने जबरा धुमाकूळ घातला असणार. मार्केटमध्ये लाखोंत बक्षीस मिळवली असणार म्हणूनच इतकी किंमत असेल. 

मालकांना पुढचा प्रश्न तोच विचारला, बैल कुठल्या शर्यतीत पळला? किती बक्षीसं मारली ? 

मालकांनी आमचं बैलगाडा शर्यतीबद्दल असणारं अज्ञान जागेवर उघडं पाडलं. ते म्हणाले अहो हि खिलार आहे. हि शर्यतीत वापरत नाहीत. शर्यतीत आपल्या देशी गायाचे बैल असतात. खिलार राजबिंडा असतो. राजाच म्हणा की. आम्ही तो प्रदर्शनात घेवून जातो. प्रदर्शन भरवलं की लोकं बोलवून घेतात. जायचा, यायचा खर्च आणि तितला खर्च दिला जातो. स्पर्धा असल्या तर तिथं नंबर काढला जातो. आम्ही जिथं जातो तिथल्या सगळ्या ठिकाणी आमचा बैल चॅम्पियनच असतोय. नाशिक म्हणा, कोल्हापूर म्हणा, सांगली म्हणा अशा लय कृषी प्रदर्शनात स्पर्धा मारल्यात. 

बर आत्ता सांगा की, या स्पर्धा कशा होतात. 

आत्ता गटात स्पर्धा असत्यात. बिनदाती, चारदाती अशा स्पर्धा असत्यात. तिथला नंबर गटात येतो आणि गटातनं एक चॅम्पियन ठरतो. आमचा हा बैल सगळ्या गटात चॅम्पियन असतो. आणि या दाती कशा ठरवत्यात तर बिनदाती म्हणजे बारका, जरा मोठ्ठा झाल्यावर दोन दाती. आपल्या माणसात जसं बारकं, तरुण, मोठ्ठ अस असतय तसच हे दातात मोजतात. 

Screenshot 2019 02 10 at 5.19.57 PM
अप्पा चौगुले (जयसिंगपूर)

बर आत्ता अजून एक मुद्दा ते काजळी लिहलय ती काय भानगड आणि बैलाचा खर्च किती होतोय. 

काजळी म्हणजे काय तुम्ही बैलाच नाक बघा, कसय. पाय बघा, शिंग बघा आणि सगळ्यात महत्वाचं डोळे बघा. काजळ घातल्यावर जसे दिसत्यात तस आहे. एकदम राज्यासारखं. माणदेशी खिलारमध्ये असा बैल असला की तेला काजळी म्हणतात. राहता राहिला खर्चाच विषय तर सध्या दिवसाला हजार ते बाराशे रुपये खर्च आहे.  म्हणजे महिन्याला तीस चाळीस हजार जात्यात. बैलाच वर्षाच पॅकेज तुमचं तुम्ही ठरवा. 

आत्ता अस्सल पुणेकरांसारखा फायद्या तोट्याचा विचार आमच्या मनात आला ? लागलीच आम्ही प्रश्न विचारला मग तुम्हाला मिळत्यात किती ? 

मालक म्हणले हे बघा हा काय शर्यतीचा बैल नाही. हा वळु सारखा असतो. नाद असला तर संभाळायचा. रेतनाला वापरतात, स्पर्धेला चालतो. पण जीव लावून जपाय लागतो. फायद्यातोट्याच्या गणितात हा मोठ्ठा तोटा असतोय पण घरातल्या माणसांना काय आपण मोजून खायला देतो का ? जीवासारखा जपलां की विचार करायचा नाही. 

पुढं मालक म्हणाले, “हा खरसुंडीच्या पार तिकडं खाली घेतलेला. तेव्हा दूध पेत होता. तेव्हा हे खोंड दिड लाखाला घेतलेलं. आत्ता जिवापाड जपलय. बाकी आठ लाखाला मागूदेत नाहीतर ऐंशी लाखाला आपला बैल भारीए यातच आपणाला समाधान असतं.”

सुरवातीला काय बैलावर लिहायला लागेल म्हणून क्षणभर विचित्र वाटलेलं. कदाचित बैलावर काय वाचायचं असं म्हणून तुम्हालाही वाटलं असेल. पण “राजा” भारीच  आहे. मालक पण भारी आहेत. लहानपणी आपल्या शाळेत असणारा आबांचा पाखऱ्या पण भारीच होता.  

मालकांच नाव : 

पैलवान. मन्सुर यासीन मुल्ला. नागठाणे. ता. पलुस जि. सांगली. फोन नंबर 9011098050

फोटा : अप्पासाहेब चौगुले (जयसिंगपुर)

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.