दामाजी पंतांचे दुष्काळी मंगळवेढा जगभरात ज्वारीचं कोठार म्हणून फेमस झालंय

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ही ऐतिहासिक भूमी संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत बसवेश्वर यांचं विशेष कार्य मंगळवेढ्यात दिसून येते. मात्र या नगरीची ओळख दामाजी पंतांचे मंगळवेढा अशीच आहे.

भीमा, माण नद्यांच्या खोऱ्यातला हा प्रदेश हजारो वर्षांपासून आपल्या दुष्काळासाठी प्रसिद्ध आहे.

बहामनी राजाच्या काळात म्हणजे १४५८ ते १४७० सालच्या दरम्यान असाच मोठा दुष्काळ पडला होता. याला दुर्गादेवीचा दुष्काळ अस ओळखलं जातं.

याच काळात दामाजीपंत येथे तहसीलदार होते.

जनावरे अन्नपाण्या वाचून तडफडू लागली. लोक गाव सोडून जाऊ लागले. मात्र जिथे जाईल तिथे हीच परिस्थिती होती. मरणासन्न अवस्था होती.

सुलतानाची शासकीय गोदामे मात्र तुडुंब भरलेली होती. देशोधडीला लागलेली जनता भीक मागत फिरत आहे जे दामाजीपंतांना सहन झाले नाही.

त्यांनी शासकीय गोदामे फोडली आणि मंगळवेढ्याच्या प्रजेला जगवले.

मंगळवेढ्याच्या गोदामातील धान्य दुष्काळी जनतेला खुली केल्याची चर्चा सर्वदूर पसरली. तिथे गेल्यावर पोटभर खायला मिळतं, ही बातमी वणव्यासारखी पसरली.

एक वेळचं जेवण मिळावं म्हणून बारा-बारा मैल चालत लोक मंगळवेढ्याला येऊ लागले.

दामाजीपंतांच्या दातृत्वाची खबर बादशहा पर्यंत पोहचली. त्याने दामाजीपंतांना बेड्या ठोकल्या व बिदर दरबारात हजर केलं. या संकटसमयी विठू महार नावाचा एक गरीब माणूस बिदर दरबारात आला व सहाशॆ खंडी धान्याचे एक लक्ष वीस हजार मोहरा भरून पावती घेतली.

त्याच्या मुळे दामाजीपंतांची सुटका झाली.

अस म्हणतात की साक्षात विठुराया पांडुरंग विठूमहाराचे रूप घेऊन बिदरला आला होता. पंढरीच्या पांडूरंगाची ही कृपा झाल्याची त्यांना खात्री पटताच दामाजी पंतांनी बादशहाच्या नोकरीचा तात्काळ राजीनामा दिला व राहीलेले आयुष्य पांडूरंगाच्या सेवेत खर्च केले.

प्राणाची पर्वा न करता दुष्काळपिडीत लोकांची सेवा केली म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले आहे.

मंगळवेढ्याची जमीन काळी कसदार आहे मात्र इथे पावसाचे प्रमाण अत्यन्त कमी आहे.

दुष्काळ हा मंगळवेढ्याच्या पाचवीला पुजलेला. बारा बारा वर्षाचे दुर्गादेवी दुष्काळाला सामना देत इथल्या शेतकऱ्यांनी जगण्याची लढाई अखंड लढली. संतपरंपरेमुळे वारकरी संप्रदाय इथे मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या जिद्दीमुळे कष्टाने मंगळवेढ्याची शेती फुलली.

मंगळवेढ्यात सलग, अतिशय सपाट, काळ्या जमिनीचा पट्टा असून, ती जमीन केवळ महाराष्ट्रात नव्हे तर आशिया खंडातील वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. ती जमीन चिकणयुक्त मातीने तयार झालेली, सपाट अशी आहे. मात्र ही जमीन पाणी धरून ठेवण्याची क्षमता राखते. त्यामुळे थोडासा पाऊस झाला तरी तो पिकाला जगवू शकतो.

ज्वारी हे तर कोरडवाहू पीक आहे. इथले ज्वारी मालदांडी ज्वारी म्हणून प्रसिद्ध आहे.

मंगुड्याचे कसदार दाणे आजही गातात गावमहतीचे गाणे’

मंगळवेढ्याच्या ज्वारीचं वैशिष्ट्य म्हणजे ती कमी तापमानाला प्रतिकारक्षम आहे. दाणा टपोरा असून त्याची व चाऱ्याची चव उत्तम असते. या ज्वारीपासून बनवलेल्या भाकरीची चव स्वर्गीय असते अस म्हणतात.

मंगळवेढ्याच्या ज्वारीमध्ये कीड व रोगावर मात करण्याची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे त्यावर कधी कीटकनाशक फवारणीची आवश्यकता पडत नाही.

मधुमेहावर अतिशय गुणकारी असल्यामुळे अनेक पेशंटना डॉक्टर भाकरी खायची असेल तर मंगळवेढा ज्वारीची खा असा सल्ला देतात.

या सगळ्या वैशिष्ट्यामुळे मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीस जी.आय. मानांकनही प्राप्त झाले.

जी आय मानांकन हे जिओग्राफिकल इंडेक्स आहे. महाराष्ट्रात देवगड हापूस, नागपूर संत्री, कोल्हापूरचा गूळ या पाठोपाठ मंगळवेढ्याच्या ज्वारीला देखील हा मान मिळाला.

SAVE 20200928 102550

एकेकाळी दामाजीपंतांच्या दुष्काळामुळे प्रसिद्ध झालेलं मंगळवेढा ज्वारीचे कोठार म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले.

देशभरात या ज्वारीला खास मागणी असते. पण जी.आय. मानांकनामुळे जगाच्या बाजारपेठेचे देखील मंगळवेढ्याची ज्वारीने दार ठोठावले आहार. आता फक्त पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंगची गरज आहे आणि त्याहूनही महत्वाचं इथल्या ज्वारीवर संशोधन होणे आवश्यक आहे. तर जगाच्या नकाशावर मंगळवेढा हे नाव ठळक अक्षरात चमकले यात शंका नाही.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. संताच्या भूमीत सोनेच उगवते, पण त्याची ओळख पटत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.