पाचगणीमध्ये स्ट्रॉबेरी पिकते याचं श्रेय इंग्रजांना नाही तर जमशेदजी टाटांना जातं

पुण्या मुंबईचे चाकरमाने आठवडाभर राबतात ते शनिवार रविवारची वाट बघत. विकेंड आला की गाड्या सुटतात हिल स्टेशनच्या दिशेने. माथेरान, लोणावळा, पाचगणी ,महाबळेश्वर ही हक्काची ठिकाण. एकेकाळी भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटीश राज्यकर्त्यांनी आपल्या गावाची आठवण येऊ लागली की सुट्टीत जाऊन राहण्यासाठी वसवलेली ही गाव.

यातल सगळ्यात फेमस ठिकाण म्हणजे महाबळेश्वर आणि पाचगणी. त्याहूनही फेमस आहे इथली स्ट्रॉबेरी. लालचुटुक स्ट्रॉबेरी खाण्यासाठी बरेच जण पाचगणीला जातात. मॅप्रो गार्डन आणखी कुठे कुठे स्ट्रॉबेरीचे अड्डे आहेत. लहानपणापासून महाबळेश्वरच्या सहलीला कोणी गेलं तर तिथून काय आणल याच उत्तर स्ट्रॉबेरी हेच असायचं.

अख्ख्या भारतात स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वर पाचगणीची ओळख बनली आहे. थंड हवामानाच्या प्रदेशात मुख्यतः पाश्चात्य देशात उमलणार हे फळ पाचगणीला कुठून आलं?

सहाजिकचं इंग्रजांनी आणलं असणार आहे, पण पाचगणीच्या स्ट्रॉबेरीचा खरा मान दिला जातो सर जमशेदजी टाटांना.

जमशेदजी टाटा यांना भारतीय उद्योगधंद्याचे पितामह म्हणून ओळखलं जात. देशातल्या पहिल्या पोलाद कंपनी पासून ताज या पंचतारांकित हॉटेल पर्यंत कित्येक उद्योगधंद्यांची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. टाटा उद्योगसमूहाच रोपट लावलं जे पुढे जाऊन स्वतंत्र भारताचे आधारस्थंभ बनले.

जमशेदजी टाटा सुरवातीपासून चौकस होते. त्यांच्या वडिलांची एक एक्स्पोर्ट फर्म होती. कॉलेजमधून शिक्षण घेणारे जमशेदजी हे त्यांच्या घरातले पहिले व्यक्ती. वडिलांच्या उद्योगाच्या निमित्ताने त्यांचा देशोदेशी प्रवास व्हायचा. युरोपात औद्योगिक क्रांतीनंतर घडणारे बदल त्यांच्या डोळ्यातून सुटत नव्हते.

गरिबीच्या खाईत अडकलेल्या आपल्या देशाला बाहेर काढायचं असेल आधुनिकतेला प्राधान्य दिल पाहिजे हे त्यांच मत होतं. युरोपप्रमाणे नवीन प्रयोग भारतातही करायचे त्यांची इच्छा होती. हे प्रयोग फक्त उद्योगधंद्याशी निगडीत नव्हते तर शेती व इतर जोडधंद्यातही टाटांनी प्रयोग केले.

साधारण एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांनी वडिलांच्या बिझनेसमधून बाहेर पडून मुंबईमध्ये एक कापड गिरणी चालवायला घेतली. ही गिरणी चालवताना त्यांना अनेक बरे वाईट अनुभव आले. दोन वर्षाच्या अपयशानंतर नागपूरला एम्प्रेस नावाची स्वतःची मोठी कापड गिरणी सुरु केली. नागपूरला स्वस्तात उपलब्ध असणाऱ्या कापसामुळे टाटांना कापड उद्योगात जबरदस्त यश मिळाले. त्यांनी देशभर वेगवेगळ्या मिल चालवायला घेतल्या.

याच काळात सुरु झालेल्या स्वदेशी चळवळीने त्यांना भारावून टाकले. कुर्ला येथे धरमसी नावाची एक गिरणी होती. ती त्यांनी विकत घेतली आणि तीच नावच दिल स्वदेशी कापड मिल. ही गिरणीम्हणजे टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. तिला फायद्यात आणण्यासाठी त्यांना बरीच उरस्फोड करावी लागली. पण अखेरीस त्यांच्या कष्टाला फळ आले आणि स्वदेशी गिरणीचे माग जोमाने धडधडू लागले.

याकाळात झालेल्या दगद्गीतून बाहेर पडण्यासाठी ते सुट्टीला म्हणून पाचगणीला आले होते. 

काही वर्षांपूर्वी जॉन चेसन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने पाच खेडे गावांना एकत्र करून पाचगणीची स्थापना केली होती. लॉर्ड बर्टनने त्याला इंग्रज अधिकाऱ्यांच्या सुट्टीतील निवासस्थान बनवण्याची जबाबदारी दिली होती. या जॉन चेसनने आपल्या घराशेजारच्या मळ्यात युरोपातून आणलेली वेगवेगळी झाडे लावण्याचा प्रयोग चालवला होता.

जमशेदजी टाटांनी देखील पाचगणीला बऱ्यापैकी मालमत्ता विकत घेऊन ठेवली होती. हवापालट म्हणून तिथे आलेले असताना त्यांचं व्यापारी डोकं शांत नव्हतं. जमशेदजीनी कलीफोर्नियामधून स्ट्रॉबेरीची रोपे आणली आणि त्याची पाचगणीतल्या आपल्या फार्मवर लागवड केली. हा महाबळेश्वर पाचगणी मध्ये मोठ्याप्रमाणात स्ट्रॉबेरी लागवडीचा पहिलाच प्रयोग होता.

जमशेदजींचा भाचा सोराब स्कलातवाला यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे,

“मी कॉलेजमध्ये असताना त्यांच्यासोबत सुट्टीला जायचो. तेव्हा त्यांचे हे प्रयोग सुरु झाले होते. त्यांना पाचगणीचं टेबललँड विकत घ्यायचं होतं आणि मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी लागवड करून तिथे जामची फॅकट्री सुरु करायची होती.”

त्याकाळात पाचगणीला जाणे हेच खूप मोठे दिव्य असायचे. साध्या टांग्याने २८ किलोमीटरचा घाटातला खाचखळग्यांचा प्रवास करून पाचगणी गाठायला पाच तास लागायचे. भारतातला सर्वात मोठा उद्योगपती स्ट्रॉबेरीची रोपे घेऊन अनेकवेळा चिकाटीने हा प्रवास करत होता. त्यांच्या जिद्दीने व मेहनतीने रंग दाखवला आणि स्ट्रॉबेरीचा मळा पाचगणीमध्ये फुलला.

जमशेदजी टाटांनी फक्त पाचगणीमध्येच नाही तर म्हैसूर परिसरात रेशीम उद्योग, कॉफी उद्योग याची सुरवात देखील त्यांच्या दूरदृष्टीमुळेचं झाली आहे.

पुढे लवकरच प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांचे पाचगणी दौरे थाबले. काही वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. जमशेदपुरच्या स्टील फॅक्टरीच्या नादात या स्ट्रॉबेरीकडे त्यांच्या वारसदरांचे दुर्लक्ष झाले. त्यांची जामची फॅक्टरी उभी राहू शकली नाही. पण टाटांनी पेरलेले हे स्वप्न संपूर्ण महाबळेश्वर परिसरात तरारून उमलून आले. शंभर वर्ष उलटून देखील पाचगणी व तिथल्या शेतकऱ्यांची इकोनॉमी जमशेदजींच्या स्ट्रॉबेरीभवती फिरत आहे.

आज टाटांचा तो मळा तिथे अस्तित्वात नाही. त्यांनी विनोबांच्या भूदान चळवळीला तो दान देऊन टाकला. पण आजही त्यांचे दल केथ आणि बेल एअर ही दोन घरे आहेत पण तिथेही गोरगरिबांसाठी रुग्णालये सुरु आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.