मणिपूर पोलीस Vs आसाम राईफल्स मध्ये काय वाद सुरु आहे ?

मणिपूरमध्ये कुकी आणि मेतेईनंतर आता स्थानिक पोलीस दल आणि आसाम रायफल्स हे दोन्ही आमनेसामने आले आहेत. दोघांमधील संघर्ष वाढला आहे. कारवाईत अडथळा आणल्याबद्दल मणिपूर पोलिसांनी आसाम रायफल्सविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. याच संघर्षामुळं मणिपूरमधील बिष्णुपूर जिल्ह्यातून आसाम रायफल्स मागे घेऊन त्या जागी पोलिस आणि CRPF तैनात करण्याचे आदेश दिलेत.

तडकाफडकी आसाम रायफल्स हटवण्यासाठी स्थानिक पोलीस विरुद्ध आसाम रायफल्स वाद तर कारणीभूत ठरलाच आहे शिवाय मणिपूरमधील मीरा पायबि संघटनेने आसाम रायफल्स काढून टाकण्याची मागणी केली. आसाम रायफल्स कुकी समाजाची बाजू घेत असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे, स्थानिक भाजपचे नेतेही या संघटनेला पाठिंबा देतायत. याच गोष्टी मणिपूर पोलिसांना आसाम रायफलच्या विरोधात पूरक ठरल्या. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं.

आधीच दोन समाजात हिंसाचार आहे. हा हिंसाचार रोखण्यासाठी लष्कर, स्थानिक पोलिस प्रयत्न करत आहेत; मात्र अद्याप या यंत्रणांना यश आलेलं नाहीये. म्हणून आसाम रायफल्सला इथे तैनात केलं गेलं होतं मात्र आता आसाम रायफल्सला हटवण्यात येतंय. हे मणिपूरसाठी आणखीनच प्रॉब्लेमॅटिक ठरतंय.

मणिपूर पोलिस आणि आसाम रायफल्समध्ये कोणत्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे? 

तर मणिपूरमधल्या मेईतेई आणि कुकी अशा दोन प्रमुख समुदायांमधला हा संघर्ष सुरु आहे. आपल्यालाही आदिवासी जमातीचा दर्जा द्यावा, अशी मागणी मेईतेई समुदायाची आहे तर नागा-कुकी समाज मेईतेई समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात आहे. आणि यावरून हा संघर्ष किती टोकाला गेलाय हे आपण दररोजच्या बातम्यांमधून पाहतच आहोत.

याची सुरुवात झाली ती ३ मे रोजी.

या दिवशी ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन मणिपूरने ‘आदिवासी एकता मार्च’ काढला होता. मेईतेई समाजाला अनुसूचित जमातीचा म्हणजेच एसटीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी ही रॅली काढण्यात आली. आपल्यालाही आदिवासी जमातीचा दर्जा द्यावा, अशी मागणी मेईतेई समुदायाची आहे तर नागा-कुकी समाज मेईतेई समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात आहे. यावरूनच या रॅलीदरम्यान दोन समुदायांमध्ये हिंसक हाणामारी झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. परिस्थिती हाताबाहेर गेली होती.

काही मीडिया रिपोर्ट्समधून असं सांगितलं जातंय कि, मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी स्थानिक पोलिस प्रयत्न करत आहेत मात्र अनेक पोलिस आपल्या जाती-जमातीप्रमाणे आपापल्या समूहांना मदत करतात असे आरोप केले जातायेत. परिस्थिती आटोक्यात येत नव्हती त्यात मणिपूरचं पोलिस नेतृत्व कमी पडतंय म्हणून सैनिकी नेतृत्व कामाला लावलं गेलं.

लागलीच ४ मे रोजी इंडियन आर्मीकडून आर्मीच्या दोन डिव्हिजन्स आणि आसाम रायफल मणिपूरमध्ये तैनात करण्यात आल्या.

आसाम रायफल्स काय आहे ?

तर आसाम रायफल्स’ हे भारतातील सगळ्यात जुने निमलष्करी दल आहे. ’Para Military Force’ असं या दलाला म्हंटल जायचं. नंतर १९१३ साली ‘आसाम रायफल्स’ हे नाव देण्यात आलं. १९४७ पासून या दलाने अनेक सुरक्षा कारवायांमध्ये भाग घेतला आहे.

याआधी ’आसाम रायफल्स’चा वापर केवळ ईशान्य भारतातील बंडखोरी आणि भारत- म्यानमार सीमा यांच्या संरक्षणाकरिता व्हायचा. मात्र अलीकडच्या काळात या दलाने दहशतवादविरोधी कारवाया आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरी दलांना मदत केली आहे. तसेच चीनच्या वाढत्या आव्हानामुळे सीमा सुरक्षा कार्यात आणि युद्धकालीन परिस्थितीमध्ये देशाच्या सीमेच्या आतल्या भागांत सुरक्षा पुरविण्यासाठी या दलाचा उपयोग होतो.

या दलात ४६ बटालियन असून त्यांत एकूण ६६ हजार सैनिक आहेत. सध्या आसाम रायफल्सची प्रशासकीय जबाबदारी गृह मंत्रालयाकडे आहे, तर कामकाजावरील नियंत्रण हे भारतीय लष्कराकडे आहे. आसाम रायफल्स’चे जवान याआधी ईशान्य भारतातून भरती केले जायचे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून भारतातल्या सगळ्या सीमावर्ती जिल्ह्यातील युवकांना ’आसाम रायफल्स’मध्ये भरती होता येते. तर याचे अधिकारी फक्त इंडियन आर्मीमधले असतात. त्यामुळे या दोन दलांमध्ये चांगले को-ऑर्डिनेशन असते.

आज तिथे इंडियन आर्मीचे आणि आसाम रायफलचे मिळून १४८ कॉलम्स सक्रिय आहेत. एक कॉलममध्ये ८० ते १०० सैनिक २ ते ३ इंडियन आर्मी ऑफिसर्सच्या नेतृत्वाखाली कॉलममध्ये काम करतात.

यांनी आतापर्यंत ४० हजारांहून जास्त नागरिकांना हिंसाचारापासून वाचवल्याचं सांगण्यात येतं. याच दलाकडून मणिपूरमध्ये शरणागती पत्करलेल्या अनेक बंडखोर गटांना त्यांच्या शस्त्रांबरोबर कॅम्पमध्ये ठेवण्यात येतं. मात्र मणिपूरमध्ये होणाऱ्या हिंसाचारात अनेक महिलासुद्धा सामील आहेत.

त्यात काही महिलांनी आणि संघटनांनी आसाम रायफलच्या अनेक ठिकाणच्या बेस कॅम्पसना वेढा घातला आहे; ज्यामुळे आसाम रायफलच्या सैनिकांना आपल्या कॅम्पच्या बाहेर येणे कठीण झालं आहे. कारण महिलांच्या गटांवर फायरिंग करणं सोपं नाही.

काही ठिकाणी आसाम रायफलला इंडियन आर्मीकडून हेलिकॉप्टरच्या मदतीने अन्न पुरवठा आणि दारुगोळा उपलब्ध करून देण्यात येतो. अशा परिस्थितीवर आसाम रायफल आणि इंडियन आर्मी मणिपूरच्या डोंगरांमध्ये तैनात आहे कारण मणिपूरमध्ये डोंगराळ भागांमध्ये लोकं एका मोठ्या गावात राहत नाहीत तर वस्ती करून राहतात. रोजच सैन्याची तिथे वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशन्स सुरू असतात.. ज्या वेळेला हिंसाचार करणारा गट  एखाद्या गावामध्ये शिरतो, तेंव्हा आर्मी आणि आसाम रायफल्स लगेचच कारवाई करते.

मणिपूर पोलीस Vs आसाम राईफल्स वादाचं संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे?

मणिपूर पोलीस Vs आसाम राईफल्समधल्या संघर्षाला कारणीभूत ठरली ती ५ ऑगस्ट रोजी घडलेली घटना.

या दिवशी सुरक्षा दल आणि मेईतेई समुदायामध्ये चकमक झाली होती. यादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. तेरखोंगसांगबी कांगवे आणि थोरबुंग येथे हिंसक संघर्ष झाला होता. हा भाग कुकी-मेतेई मधील सीमा आहे, ज्याला बफर झोन म्हणतात. हल्लेखोर बफर झोन ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. सुरक्षा दलांनी थांबल्यावर त्यांच्यात चकमक झाली. त्यात मेईतेई समुदायाच्या ३ लोकांचा मृत्यू झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.

या दरम्यान कुकी समाजातील सशस्त्र लोकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. पण याच कारवाईदरम्यान आसाम रायफल्सने पोलिसांची वाहने वाटेत उभी केली ज्यामुळे कारवाईत अडथळा निर्माण झाला असा आरोप करत मणिपूर पोलिसांनी आसाम रायफल्सच्या जवानांविरुद्ध तात्काळ आयपीसी कलम- १६६, १८६, ३४१, ३५३, ५०९, ५०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.

एफआयआरमध्ये काय आरोप आहेत? 

मणिपूर पोलिसांनी आसाम रायफल्सच्या विरोधात या FIR मध्ये असे आरोप केले आहेत कि, मणिपूर पोलिसांकडून बिष्णुपूरच्या क्वाक्टा भागात वॉर्ड क्रमांक-८ मध्ये कुकी अतिरेक्यांविरोधात शोध मोहीम राबवण्यात येत होती. त्याच मोहिमेदरम्यान मणिपूर पोलीस फोलजांग रस्त्याकडे जात असताना आसाम रायफल्सने क्वाक्टा गोथोल रोडवर पोलिसांची वाहने रोखली, वाहन थांबवल्याने कारवाईला अडथळा निर्माण झाला.

तितक्यात त्या हत्येत सहभागी असणाऱ्या कुकी समाजातील आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाली आणि यात आसाम रायफल्सची चूक आहे, आसाम रायफल्समुळे आरोपीना पकडण्यात यश मिळालं नाही असा आरोप करत मणिपूर पोलिसांनी आसाम रायफल्सच्या ९ व्या बटालियनच्या जवानांची नावं आरोपी म्हणून या FIRमध्ये नमूद केले आहेत.

यावर लष्कराचे काय म्हणणे आहे?

याच आरोपांवर आसाम रायफल्सनी अशी बाजू मांडली आहे कि, याबाबत आसाम रायफल्सने लष्कराच्या कमांड मुख्यालयाच्या सूचनांचं पालन केल्याचं म्हंटलं आहे. आसाम रायफल्सने सांगितलेय कि, त्यांना बफर झोनची मार्गदर्शक तत्त्वे पाळण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्या मार्गदर्शक तत्वानुसारच मणिपूरमधील दोन समुदायांमधील संघर्ष रोखण्याचे प्रयत्न आसाम रायफल्सकडून होत आहेत. आता आसाम रायफल्स इंडियन आर्मीच्या अखत्यारीत येतं त्यामुळं इंडियन आर्मीने आसाम रायफल्सची बाजू मांडत एक निवदेन जारी केलं आहे.

या निवदेनात आर्मीने असं म्हंटलय कि, हिंसाचार सुरू झाल्यापासून ३ मे २०२३ या तारखेपासून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आसाम रायफल्सची एक बटालियन तैनात केली गेली आहे. मणिपूरमध्ये ग्राउंड लेव्हलला खूप गुंतागुंतीची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत कधी कधी वेगवेगळ्या सुरक्षा दलांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. मात्र असे गैरसमज लगेचच दूर होणं आवश्यक आहे असं स्पष्ट करत इंडियन आर्मीने मणिपूर पोलिसांवर आरोप केलेत कि, आसाम रायफल्सच्या भूमिकेवर आणि हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जातोय, आसाम रायफल्सची प्रतिमा डागाळण्याची प्रकरणं मणिपूर पोलिसांकडून समोर येत आहेत असं महत्वाचं स्टेटमेंट लष्कराने केलंय.

मात्र मणिपूरमध्ये आसाम रायफल्सबाबतला वाद थांबायचा नाव घेत नाहीये.

मणिपूरमध्ये मीरा पाइबी नावाची महिलांची संघटना देखील आसाम रायफल्सला विरोध करत आहे. हि मीरा पाइबी संघटना सुरक्षा दलांना कारवाई करण्यापासून रोखत आहे. जवान बंडखोरांवर कारवाई करण्यासाठी पुढे जातात तेव्हा या महिला भिंतीसारख्या समोर उभ्या राहतात. मग या मॉबमध्ये २ ते ३ हजारांची संख्या असते त्यामुळं आर्मीकडून बळाचा वापर केला जात नाही.

मणिपूर दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी मीरा पैबी या संघटनेतील महिलांची भेट घेतली होती. त्यात आसाम रायफल्स पहिल्या दिवसापासून राज्यात शांतता राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप मणिपूर भाजपने करत आली आहे. आसाम रायफल्स पक्षपातीपणा दाखवत असल्याचा आरोप होतोय, आसाम रायफल्सच्या जागी इतर निमलष्करी दल तैनात करण्याची मागणी मणिपूरच्या भाजप युनिटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

या मागणीनंतर आणि ५ ऑगस्ट रोजी आसाम रायफल्सवर FIR दाखल झाल्यानंतर मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात तैनात असलेले आसाम रायफल्सचे जवान मागे घेण्यात आले आहेत आणि त्यांच्या जागी CRPF आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

 हे ही वाच भिडू :

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.