काल अश्विनने बटलरला आउट काढले त्याला ‘मंकडिंग’ म्हणतात.

काल आयपीएलमध्ये एक थरारक सामना झाला. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्तान रॉयल्स. पंजाब कडून खेळणारा ख्रिस गेल जुन्या स्टाईल मध्ये हातोडा फिरवताना दिसला. त्याच्याचं स्फोटक अर्धशतकामूळ पंजाबने १८४ धावांचे आव्हान राजस्तानसमोर ठेवले.

या धावांचा पाठलाग करत असताना राजस्तानने देखील सुरवात चांगली केली. त्यांच्याकडून खेळणारा जोस बटलर पंजाबची पिसे काढत होता. पंजाबच्या कोणत्याच बॉलरकडे बटलरला कसे आउट काढावे याचे उत्तर नव्हते. तो मॅच कडेला नेऊन सोडणार असेच वाटत होते.

अशातच कॅप्टन आर अश्विन बॉलिंगला आला. आल्या आल्या त्याची आणि बटलरची वादावादी सुरु झाली.

बटलर नॉनस्ट्रायकर ला खेळत होता आणि संजू सॅमसन बॅटिंग करत होता. अश्विन बॉल टाकायला आला, त्याने अॅक्शनही केली आणि अचानक थांबला. तोवर नॉन स्ट्रायकर असलेला बटलर क्रीज सोडून पुढे गेला होता. अश्विनने आपल्या हातातल्या चेंडूने दांड्या उडवल्या आणि बटलर रणआऊट आहे म्हणून अपील केली.

थर्ड अंपायरने बटलरला आउट दिले. अतिशय निराश होऊन आरडाओरडा करत तो पॅव्हेलीय्न मध्ये परतला.

बटलरला ज्या पद्धतीने आउट काढले त्याला क्रिकेटिंग भाषेत मंकडींग असं म्हणतात. गेली कित्येक वर्ष झालं अत्यंत वादग्रस्त असा हा निर्णय असतो. काल सुद्धा अश्विनला जगभरातून या विकेटसाठी शिव्याशाप खायला लागले.

नेमका नियम काय आहे यावर गल्ली पासून दिल्ली पर्यंत चर्चा करण्यात आली. कोण म्हटल अश्विनच बरोबर हाय तर कोण म्हटल अश्विनने जरा जास्तच शानपना केला. कोण म्हणालं लगान सिनेमामध्ये आमच्या टिपुला गंडवलं होतं त्याचा अश्विनने बदला घेतला. चर्चा तर खूप झाल्या पण मेन विषय बाजूलाच राहिला.

तर हे नेमक मंकडींग म्हणजे काय? त्याला हे नाव का दिल गेलं? काय आहे त्याचा इतिहास?

विनू मांकड भारतीय क्रिकेटमधल्या सर्वोत्तम ऑल-राउंडर पैकी एक नाव. स्वतंत्र भारताची क्रिकेट टीम ज्या खेळाडूंनी उभी केली यापैकी विनू मांकड हे प्रमुख खेळाडू. त्यांचं नाव सर्वाधिक चर्चिलं जातं ते १९५६ साली त्यांनी पंकज रॉयसह खेळताना उभारलेल्या ४१३ रन्सच्या ओपनिंग पार्टनरशिपसाठी.

पण आणखी एक गोष्ट आहे ज्यामुळे विनू मांकड यांना ओळखलं जात ते म्हणजे मंकडींग.

१९४७-४८साली भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी एका सराव सामन्यात खेळताना विनू मांकड यांना लक्षात आलं की बिल ब्राऊन हा बट्समन आपण बॉल टाकायच्या आधीच नॉन स्ट्राईकवरून क्रीज सोडतोय.

विनू मांकड यांनी त्याला चारवेळा वॉर्निंग दिली पण बिल ब्राऊनला काही फरक पडला नाही. त्याने पुढच्याच बॉलला परत तसेच केले यावेळी विनूनी नॉनस्ट्राईकवरच्या स्टंप उडवल्या आणि त्याला आउट केले.

पुन्हा सिडनी टेस्टमध्ये देखील मांकड यांनी ब्राऊनला याच पद्धतीने आउट केलं. यावेळी मात्र त्यांनी कसलीच वार्निंग दिली नव्हती.  त्यानंतर ऑस्ट्रेलियन मिडियामध्ये खूप मोठे वादळ झाले होते. त्यांनी या आउट होण्याच्या पद्धतीला मांकड यांचं नाव दिल.

त्यावेळी देखील पूर्ण जग मांकड यांच्या विरोधात होते. फक्त ऑस्ट्रेलियन कप्तान डॉन ब्रॅड्मन मांकड यांच्या बाजूने उभे होते.

त्यांनी आपल्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केला आहे आणि त्यात ते म्हणतात,

“जर क्रिकेटच्या नियमात लिहिले आहे की नॉन स्ट्राईकर फलंदाजाने चेंडू पडे पर्यंत क्रीज सोडायची नाही तेव्हा मांकड यांनी काही चूक केली आहे असं म्हणण देखील चुकीच आहे.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.