पहिली निवडणूक पर्रीकरांनी साबुदाणा वड्यामुळे लढवली होती.

शेकडो वर्ष गोव्यावर पोर्तुगीजांनी राज्य केलं. स्वातंत्र्यानंतरही गोवन संस्कृतीवर त्यांची छाप कायम राहिली. ठिकठिकाणी असलेले चर्च ख्रिस्ती बांधवावर व एकूणच गोव्याच्या राजकारणावर पकड ठेवून होते.

त्यामुळेच भारतीय जनता पार्टी सारख्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षाला येथे आपली जागा निर्माण करणे हे देखील एक दिवास्वप्न मानले जायचे. पण एक नेता असा होऊन गेला ज्याने या स्वप्नाला प्रत्यक्षात आणलं,

“मनोहर पर्रीकर”

मनोहर पर्रीकर यांचा जन्म उत्तर गोव्याच्या म्हापसा या गावी एका मराठी कुटुंबात झाला.

लहानपणापासून शाळेत हुशार होते. वडीलांचं छोटसं दुकान होत. मात्र त्यांची इच्छा होती की मुलाने डॉक्टर अथवा सीए बनावं. पण मनोहर यांचा ओढा इंजिनियरिंगकडे होता. जेईईची परीक्षा चांगल्या मार्काने पास होऊन आयआयटी मुंबईमध्ये मेटलर्जी इंजिनियरिंगमध्ये प्रवेश केला.

आंदोलनाशी त्यांचा संबंध आयआयटीमध्येच आला.

अन्याय सहन करण्याची सवय पूर्वीपासूनच नव्हती. तिथल्या होस्टेल मेसच्या जेवणावरून एकदा विद्यार्थ्यांनी जोरदार वाद झाले. मनोहर पर्रीकर यांनी विद्यार्थ्यांना गोळा करून मेसवाल्या विरुद्ध जोरदार आंदोलन केलं व आपला हक्क मिळवला. आणि त्यामुळेच पर्रीकर पुढे कॉलेजचे जनरल सेक्रेटरी देखील झाले. 

पण कॉलेजच्या जनरल सेक्रेटरीची निवडणूक लढवण्यासाठी कारण ठरलं होतं साबुदाणा वड्याचं!

तर मुंबई आयआयटीत शेवटच्या वर्षात शिकत असताना निवडून आलेले ते पहिलेच जीएस होते. कारण उत्तीर्ण होऊन बाहेर पडण्याच्या वर्षी ‘जीएस’च्या निवडणुकीला उभं राहता यायचं नाही. पण त्यांना तशी संधी देण्यात आली. एवढी लोकप्रियता कशी मिळाली किंवा नियम कसा बदलला गेला, या प्रश्नावर पर्रीकरांचं उत्तर होतं, ‘कमी पैशांत चांगलं खाणं उपलब्ध केल्यामुळे.’

पर्रीकरांनी निवडणूक लढवायचं काही ठरवलेलं नव्हतं. पण असं झालं होतं, की त्या वेळी कॉलेजच्या मेसमध्ये केरळी आचारी होता. तो दाक्षिणात्य पदार्थ बनवण्यात कुशल असला, तरी त्याला साबुदाण्याचे वडे चांगले करता यायचे नाहीत. ते एखाद्या स्प्रिंग बॉलसारखे असायचे. साहजिकच विद्यार्थ्यांना ते वडे काय आवडायचे नाहीत. पण मेस को-ऑर्डिनेटरला ते स्प्रिंग बॉल सारखे वडे आवडायचे.

तिथं शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी करून, हर तऱ्हेचे उपाय करूनही त्यात काहीही बदल झाला नाही. 

त्यामुळे मेस को-ऑर्डिनेटर बदलल्याशिवाय चांगला बदल होणार नाही, असं सर्वच विद्यार्थ्यांचं मतं पडलं. यात पुढे होते पर्रीकर. मनोहर पर्रीकरांनी ती निवडणूक लढवायचं ठरवलं. दुसऱ्या वर्षाला असताना ते मेस को-ऑर्डिनेटर म्हणून निवडूनही आले. सलग दोन वर्षं ते त्या पदावर निवडले गेले.

मेस को-ऑर्डिनेटर म्हणून काम करत असताना त्यांनी किराणा सामान घाऊक बाजारातून आणायला सुरुवात केली. त्यामुळे मेसच्या महिन्याच्या खर्चात खूपच बचत होऊ लागली. अशा वेगवेगळ्या कामांमुळे त्यांचं वेगळेपण विद्यार्थ्यांना जाणवलं. त्यामुळेच शेवटचं वर्ष असूनही जीएस होण्याची गळ विद्यार्थ्यांनी घातली.

त्या कालावधीतल्या त्यांच्या कामामुळे त्यांना शेवटचं वर्ष असूनही ‘जीएस’च्या निवडणुकीला उभं करण्यात आलं आणि ते निवडूनही आले. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी पुन्हा तिथेच प्रवेश घ्यायचा अशी अट त्यांना घालण्यात आली होती आणि अर्थात, ती त्यांनी पाळलीही. पुढे राजकारणात यायचं काही त्यांनी ठरवलेलं नव्हतं; पण सर्वसामान्यांसाठीच्या त्यांच्या कामाची चुणूक अशी आधीच दिसली होती.

‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या सुविचाराचं अलीकडच्या काळातलं पर्रीकरांहून चांगलं उदाहरण पटकन सापडणार नाही. म्हणूनच असामान्य व्यक्तिमत्त्वाचा हा ‘सामान्य माणूस’ लोकांच्या मनात दीर्घकाळ राहील, यात शंका नाही. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.