पर्रीकरांनी तिला १० वर्षात राजकारण सोडतो असं वचन दिलं होतं पण..

मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रिकर. अर्थात गोयंकरांचो भाई. साधेपणा ही पहिली ओळख आणि गोव्याचे आयआयटीयन मुख्यमंत्री अशी त्यांची दुसरी ओळख. ज्यावेळी गोव्यात भाजप नावाला देखील नव्हती अशा वेळी त्यांनी पक्षाच काम सुरु केलं आणि भाजपला रुजवलं. पुढे राज्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री अशी यशस्वी मजल मारली.

पण ज्यावेळी ते १९९४ ला पहिल्यांदा आमदार झाले, त्यानंतर पुढची १० वर्षच सक्रिय राजकारण करणार होते. तसं वचनचं त्यांनी आपल्या पत्नीला दिलं होत. त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावलं तर त्यांची तरल, सुंदर प्रेमकहाणी अनेकांच लक्ष वेधते.

पण आयुष्यभराची साथ देणाऱी त्यांची पत्नी अर्ध्यावरच पर्रिकरांची साथ सोडून गेली. आजरपणामुळेच त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि दुःख विसरण्यासाठी पुन्हा पर्रिकर राजकारणात सक्रिय राहिले.

मेधा आणि मनोहर पर्रिकरांचा प्रेमविवाह. ज्यावेळी ते आयआयटी मुंबईत शिकत होते, तेव्हा घरच्या जेवणाची आठवण आली की पर्रिकर थेट मुंबईत राहणाऱ्या बहिणीच्या घरी जायचे. मेधा या पर्रिकरांच्या बहिणीची नणंद. त्या कॅलिफॉर्निया विद्यापीठामधून शिक्षण घेवून आल्या होत्या.

दोघे ही उच्च शिक्षीत. तिथेच त्यांच्या गाठीभेटी वाढल्या. दोघांचंही पुस्तकांवर प्रचंड प्रेम होतं. पुस्तकांबद्दल बोलता बोलता ऐकमेकांच्या कधी प्रेमात पडले. अभ्यास एके अभ्यास करणारे पर्रिकर प्रेमात पडतील, असं बाकीच्यांना लांब त्यांना स्वतःला देखील वाटलं नव्हतं.

पुढे शिक्षण संपवून पर्रीकर नोकरीला लागले. दोन-एक वर्ष काम केले. पण नोकरीत मन रमत नव्हते. गोव्याला जावून स्वतःचा काही तरी व्यवसाय करायचा होता. त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पण नोकरी सोडण्यापुर्वी १९८१ मेधा आणि मनोहर पर्रीकर साधेपणाने विवाहबद्ध झाले.

दोघेही गोव्यात परतले आणि एक छोटासा उद्योग सुरू केला. गोव्याच्या म्हापशात संसार थाटला. संघकार्यही सुरु होतचं. त्यावेळी गोव्यात भाजपा औषधालाही नव्हतं. कॉंग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांची जनतेवर मजबूत पकड होती. अशा परीस्थितीत संघाच्याच मुशीतून घडलेल्या राजन आर्लेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, श्रीपाद नाईक या तरूणांच्या मदतीने पर्रीकर भाजपाचं काम करू लागले.

यथावकाश उत्पल आणि अभिजात, अशी दोन मुलं झाली. या काळात मनोहर पर्रिकर गोव्यातली फँक्टरी, संघचालक आणि भाजपासाठी काम, या जबाबदाऱ्या सांभाळत होते. त्यानंतर १९९४ मध्ये पर्रिकर पहिल्यांदा गोव्यात आमदार झाले. त्या निवडणूकीच्या प्रचारात आई-वडिल, पत्नी मेधा असे सगळेच होते.

खरं तर मेधा आणि मनोहर पर्रिकर या दोघांनी व्यवसायात यशस्वी होण्याची स्वप्नं पाहिली होती. राजकारणकडे कायमस्वरुपी बघण्याच पर्रिकरांनी ठरवलं नव्हतं. म्हणूनच पुढची १० वर्षंच राजकारण करीन, आणि नंतर राजकारण पुर्णपणे सोडून फक्त फँक्टरीचं काम बघेन, असं वचन त्यांनी मेधा यांना दिलं.

पण, पुढची दहा वर्ष पर्रिकरांच्या आयुष्यात दुःखाने भरलेली होती. १९९८-९९ चा काळ होता. एकीकडे त्यांनी उभारलेल्या फॅक्टरीचं वाढणारं काम तर दुसरीकडे राजकारणात आलेल्या जबाबदार्‍यांमुळे अतिशय व्यस्त दिनक्रम झाला होता.

अशातच मेधा यांना यांना काही दिवसांपासून अधुनमधून ताप येण्यास सुरुवात झाली. बरेच दिवस त्यांनी हे दुखणं अंगावर काढलं. पर्रिकरांना सगळ्या गडबडीत त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणं जमत नव्हतं. त्यामुळे घरातल्या कोणाला तरी बरोबर घेऊन डॉक्टरांकडे जाऊन ये. असा निरोप दिला नं ते पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाले.

मेधा डॉक्टरांकडे जाऊन आल्या पण रिपोर्ट येणं बाकी होतं. एका अतिशय महत्त्वाच्या मिटिंगसाठी गोवा भाजपचे पदाधिकारी पक्ष कार्यालयात जमले. त्यावेळी मिटिंग सुरू असतानाच डॉक्टर शेखर साळकर यांचा पर्रिकरांना फोन आला. त्यांनी गडबडीत फोन घेतला. मेधा यांचे रिपोर्ट चांगले आले नव्हते. पुढच्या चेक अपसाठी मेधाला तातडीने मुंबईला न्यायला हवं, असं डॉक्टररांनी सांगितले.

दुसर्‍याच दिवशी तातडीनं मुंबईला नेलं. मुंबईत गेल्यावर मेधा यांना ब्लड कॅन्सर आहे हे स्पष्ट झालं. पायाखालची जमीन सरकणं म्हणजे काय असतं, हे पर्रिकरांनी त्यावेळी अनुभवले.

तिथेच लगेच उपचार सुरू केले. याच काळात पर्रिकांनी राजकारण सोडण्याचे ठरवले. आणि पत्नीच्या सेवेत राहू लागले. पण आजाराच निदान झाल्यानंतर जेमतेम महिनाभरात त्यांचं निधन झालं. त्यानंतर पर्रिकर अक्षरशः कोलमडून पडले.

दुःख विसरण्यासाठी फॅक्टरीच्या कामात व्यस्त राहू लागले. सोबतच नंतर त्यांनी पुन्हा राजकारणाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक जण त्यांना या मागचं कारण विचारायचे, वचनाची आठवण करुन देवू लागले. तेव्हा ते सांगायचे,

जिच्यासाठी मी राजकारण सोडून देणार होतो, तीच राहिली नाही. आज मेधा असती तर कदाचित मी तिला वचन दिलं; त्याप्रमाणे राजकारण सोडून दिलं असतं. त्यानंतर कदाचित माझं आयुष्य निराळ असतं. पण ती नसल्यामुळे मी राजकारणात स्वतःला झोकून दिलं. सोबतच फॅक्टरीसाठी वेळ देऊ लागलो.

पुढे पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले, रात्री बारा पर्यंत कार्यालयात थांबायचे. पुन्हा सकाळी पाच वाजता उठून कार्यालयात हजर. २०१४ मध्ये देशाचे संरक्षण मंत्री झाले. संरक्षण मंत्री असताना पुन्हा गोव्यात मुख्यमंत्री म्हणून परताव लागलं.

मुख्यमंत्री असताना सकाळी स्कुटरवर जाताना; रस्त्याकडेच्या एखाद्या टपरीवर चहा पिताना, कोणत्या तरी कार्यकर्त्याशी गप्पा मारताना असे पर्रिकर एका पिढीने अनुभवले. अशातच २०१८ च्या मार्चमध्ये त्यांना देखील कर्करोगाचं निदान झालं आणि वर्षभराच्या आतच त्यांचं देखील निधन झालं.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.