गडचिरोलीत सापडलेले डायनासोरचे अवशेष धरणामुळे गेले, आता पुरामुळे पण जात आहेत

मुंबई पासून सगळ्यात दूर असलेला तालुका म्हणजे सिरोंचा!! 

असं सामान्य ज्ञानाच्या पुस्तकात वाचायला मिळतं. परंतु त्या सिरोंचा तालुक्यात जगातील सर्वात प्राचीन वर्षांपैकी एक असलेल्या डायनासोर, झाडे, मासे यांचे अवशेष सापडतात हे आजही लोकांना माहित नाही.

हे अवशेष महाराष्ट्रात आहेत हेच माहित नसल्यामुळे त्या अवशेषांची हेळसांड होत असली तरी त्याची कुणाला कानोकानी खबर लागत नाही. सिरोंचा तालुक्यात आलेल्या पुरामुळे या फॉसिल्स साईटला आणखी धोका निर्माण होत आहे. या भागात पूरस्थिती सामान्य असली तरी नव्याने बांधण्यात आलेल्या  मेड्डीगट्टा धरणामुळे ही पूरस्थिती आणखी गंभीर होत आहे. 

महाराष्ट्राच्या राजधानी आणि उपराजधानीपासून दूर गडचिरोली जिल्ह्यातील सगळ्यात शेवटच्या टोकावर एक छोटंसं गाव आहे. ज्याचं नाव आहे वडधम.  

या वडधममध्ये जगातील सगळ्यात जुने असलेले ज्युरॉसिक फॉसिल्स म्हणजेच ज्युरॉसिक काळातील अवशेष आहेत. १९५९ आणि २०१४ मध्ये या ठिकाणी संशोधन झालेय. दोन्ही वेळेस इथे मोठ्या प्रमाणावर अवशेष आढळले आहेत. तसेच हे अवशेष ६५ ते १५० दशलक्ष वर्षापूर्वीचे आहेत असं तज्ज्ञांच्या वतीनं सांगण्यात आलेलं.

१९५९ मध्ये गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या कोथापल्ली आणि पोचमपल्ली या दोन गावांच्या दरम्यान झालेल्या खोदकामात डायनासोरचा सांगाडा सापडला होता. जेव्हा हा सांगाडा सापडला तेव्हा तो कोलकात्याच्या म्युजिअममध्ये पाठवण्यात आला. डायनासोरचा सांगाडा कोलकात्याच्या म्युजिअममध्ये पाठवल्यांनंतर या भागात फारसे संशोधन झाले नाही.

२०१४ मध्ये डॉ. प्रभुनाथ शुक्ला हे वडधम भागाचे वनाधिकारी म्हणून रुजू झाले. डॉ शुक्ला यांनी उत्सुकतेपोटी या भागात शोध घेतला होता.

स्थानिक रहिवासी या जीवाश्मांचा उल्लेख राक्षसबंदी म्हणून करायचे त्यामुळे यावर संशोधन सुरु झालं.

वनाधिकारी प्रभुनाथ शुक्ला यांनी डिसेंबर २०१४ वडधमच्या आसपासच्या जंगलात शोध सुरु केला. त्यांनी अनेक जागा शोधल्यांनंतर अखेर गोदावरी नदीच्या पात्राच्या अगदी ८०० मीटर अंतरावर या अवशेषांचा शोध लागला. 

वनाधिकारी प्रभुनाथ शुक्ला यांनी भंडाऱ्याचे पॉलिओबॉटॅनिस्ट दशरथ कापगते यांच्याशी संपर्क साधला. पॉलिओबॉटॅनिस्ट दशरथ कापगते यांनी हे फॉसिल्स असल्याचे सांगितले. 

डेक्कन इंट्रापियन फ्लोरा या विषयावर संशोधन करणाऱ्या दशरथ कापगते यांनी हा महत्वाचा शोध असल्याचं सांगितलं. सापडलेले अवशेष ज्युरासिक काळातले आहेत. ज्याचा कालखंड ६५० ते १५०० लाख वर्षापूर्वीचे आहेत. हे अवशेष सोरोपॉड डायनासोरच्या काळातील ग्लोसोप्टेरीस आणि डॅडाक्सीलॉन कॉनिफर जंगलाचे अवशेष आहेत.

इतक्या प्राचीन काळातील जंगल जमिनीमध्ये गाडल्या जाण्याच्या दोन थिअरी सांगितल्या जातात.

पहिली थिअरी ज्वालामुखीची आहे.

पहिल्या थिअरीनुसार जुरासिक युग संपल्यानंतर सुरु झालेल्या क्रेटेशियस कालखंडात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्या ज्वालामुखीमुळे ८० लाख वर्षांपेक्षा अधिक काळ लावा आणि विषारी वायू पसरत राहिले. त्यामुळे हे अवशेष जमिनीखाली गाडले गेले होते.

तर दुसरी थिअरी उल्कापाताची आहे.

दुसरी थिअरी असं सांगते कि त्या काळात मोठा उल्कापात झाला होता. त्या उल्कापातामुळे हे सगळे अवशेष जमिनीखाली गाडले गेले होते. 

इतके जुने जीवाश्म सापडल्यानंतर सुद्धा फॉसिल पार्कच्या शेजारी बांधलेल्या मेडीगट्टा धरणामध्ये अनेक जीवाश्म पाण्याखाली गेले. 

वडधम आणि शेजारच्या अनेक गावांमध्ये जीवाश्म आढळलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि एकाच ठिकाणी वेगवेगळे जीवाश्म आढळणारे हे दुर्मिळ ठिकाण आहे. या जीवाश्मांमध्ये डायनासोरचे अवशेष, फुलांचे अवशेष, वनस्पतींचे अवशेष, मासे, समुद्री जीवांचे अवशेष सापडले आहेत. 

२०१४ मध्ये वडधम मध्ये अवशेष आढळल्यानंतर सुद्धा फॉसिल पार्कच्या अगदी ८०० मीटर अंतरावर धरण बांधण्यात आले. धरण बांधतांना अनेक जीवाश्म त्या धरणातच चालले गेले. मात्र धरणामुळे सिरोंचा भागात येणाऱ्या पुरामध्ये वाढ झालेली आहे. १९८० च्या दशकातला रेकॉर्ड यंदाच्या पुरामुळे मोडला आहे. 

वाढत चाललेल्या पुरामुळे धरणाच्या मागील बाजूंच्या अनेक गावांमध्ये गाळ साचतोय. या गाळामुळे जमिनीत असलेले अवशेष आणखी दुर्लक्षित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुळात अवशेष शोधणे हे फार जिकरीचे काम आहे. त्यात आता पुरामुळे जो गाळाचा थर साचतोय त्यामुळे या अवशेषांचे संशोधन करतांना आणखी अडचणी वाढतील. 

पुराच्या पाण्यामुळे इथल्या पायाभूत सुविधा सुद्धा नष्ट होतात. रस्ते आणि पुलांची पडझड होते. या ठिकाणी जाणे आणि फॉसिल पार्कला भेट देणाऱ्यांचे प्रमाणही वाढत नाहीये. त्यामुळे हे ठिकाण दुर्लक्षितच राहतेय. 

यासोबतच जीवाश्म आढळणारी अनेक गावं नदीच्या पूरक्षेत्रात येतात. 

राज्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागात मोठ्याप्रमाणावर हानी झाली होती. अनेक ठिकाणची जमीन खरडून गेली होती. तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ साचला होता. जीवाश्मांना धोका उत्पन्न होईल अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

जगातील सगळ्यात जुने जीवाश्म महाराष्ट्रात सापडले तरी सुद्धा हवे तितके लक्ष न दिल्यामुळे हा बहुमूल्य वारसा मातीत गडप होऊन जाईल. त्यामुळे या जीवाश्म साईटकडे लवकरात लवकर लक्ष देणे गरजेचे आहे. 

गोदावरी-प्राणहिता वॅली मध्ये सापडलेल्या जीवाश्मांबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी बोल भिडूने वडधम फॉसिल पार्कवर संशोधन करणाऱ्या नुसरत शेख यांच्याशी संपर्क साधला.

नुसरत शेख बोल भिडूशी बोलतांना सांगतात कि,

जीवाश्म आढळणारं हे ठिकाण जगातील सगळ्यात जुनं आहे हे कार्बन डेटिंगवरून सिद्ध झालं आहे. एवढंच नाही तर डायनासोर, वनस्पती, फुलं, रोपटे, मासोळ्या यांचे अवशेष एकत्र सापडणारं हे जगातील एकमेव दुर्मिळ ठिकाण आहे. वडधमच्या जवळच अनेक गावांमध्ये अवशेष सापडलेले आहेत. परंतु लोकांमध्ये अवेअरनेस नसल्यामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे ठिकाण अजूनही विकसित झालं नाही.”

या जीवाश्मांबद्दल अधिक माहिती देतांना शेख सांगतात, “मेट्टीगड्डा धरणामुळे पार्कला फारसा धोका नाही. परंतु पुरामुळे गाळ साचल्यामुळे अनेक फॉसिल्स जमिनीत आणखी जातील. त्यामुळे त्यांना शोधून काढणे आणखी कठीण होईल. या धरणाचं बांधकाम होतांना अनेक जीवाश्म धरणात चालले गेले. मी जमेल तितके जीवाश्म शोधून काढले आणि संग्रहात ठेऊन घेतले.” असे नुसरत शेख यांनी सांगितलं.

या साईटला विकसित करण्यासाठी हवे तितके प्रयत्न होत नाहीयेत. त्यामुळे ही साईट महत्वपूर्ण असून सुद्धा जगाच्या समोर येत नाहीये. येथे ज्युरासिक पार्क उभं करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु शासनाकडून याकरिता निधी येत नसल्यामुळे येथे जुरासिक आणि मूलभूत सुविधा निर्माण झालेल्या नाहीत.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.