मिनाक्षी शेषाद्रीने अचानक फिल्म इंडस्ट्री का सोडली होती?

खरं  नाव शशिकला. मुळची तामिळ मात्र वडिलांच्या नोकरीमुळ जन्मली वाढली झारखंडमध्ये. गाव सिंद्री. तेव्हा तिथे एक मोठा खताचा कारखाना होता. भारतातला पहिला रासायनिक खताचा कारखाना. जिल्हा धनबाद. वासेपूर सिनेमामध्ये दाखवला आहे तसच वातावरण.

मात्र टिपिकल दाक्षिणात्य संस्कारात ती वाढली. तिची आई नृत्यांगना असल्यामुळे वयाच्या तिसऱ्या वर्षी शशीने शास्त्रीय नृत्य शिकायला सुरवात केली. 

भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी आणि ओडीशी अशा चार नृत्य प्रकारात ती पारंगत झाली. चिन्ना सत्यम आणि रामा राव असे तिचे दोन गुरु होते. शाळेतही ती हुशार होती. बारावीच्या सुट्टीत तिने वर्तमानपत्रात मिस इंडिया कॉन्टेस्टची जाहिरात वाचली आणि गंमत म्हणून अर्ज पाठवून दिला.

दिसायला तर ती छान होतीच पण नृत्य शिकल्यामुळे चेहऱ्यावर एक्स्प्रेशन सुद्धा चांगले देता येत होते. त्याकाळात ती स्पर्धादेखील खूप जीवघेणी नव्हती, आणि म्हणूनच कोणतीही तयारी नसलेली अवघी १७ वर्षाची शशिकला शेषाद्री भारताची सर्वात कमी वयाची मिस इंडिया झाली.

तिची मिस इंटरनॅशनलसाठी देखील निवड झाली होती.

ती स्पर्धा काही तिला जिंकता आली नाही. पण मिस इंडियाच्या यशामुळे एक झालं, तिला सिनेमाच्या ऑफर येऊ लागल्या. खरंतर तिने स्वप्नातही आपण अभिनय करू अस पाहिलं नव्हतं. पण एकदा कठोर देशभक्त मनोजकुमार च्या ऑफिस मधून फोन आला की भेटायला बोलावल आहे.

ती तेव्हा मुंबईतच बहिणीकडे आली होती. मनोज कुमारना भेटायला गेल्यावर त्यांनी तिला बघता क्षणीच सांगितलं,

“तुमही मेरे अगले फिल्म की हिरोईन होगी.”

ऑडिशन नाही, स्क्रीनटेस्ट नाही, काही प्रश्न नाहीत. थेट सिनेमा ऑफर. मनोजकुमार आपल्या भावाला लॉंच करण्यासाठी पेंटर बाबू नावाचा सिनेमा बनवत होते.

आता एवढा मोठा स्टार आपल्याला सिनेमा ऑफर करतोय म्हटल्यावर तिने नकार देणे शक्यच नव्हतं.

पेंटर बाबू बनला. राजेंद्र गोस्वामी म्हणजे आपल्या मनोजकुमारच भ्रष्ट व्हर्जन आहे असच वाटत होतं. कोणताही एक्स्प्रेशन नसलेला मख्ख चेहरा, एकदम थंड डायलॉग म्हणायची पद्धत, डान्स तर खूप लांबची गोष्ट. त्याच्या पुढे अवघी अठरा एकोणीस वर्षाची भरतनाट्यम करणारी शेषाद्री एकदमच चमकणाऱ्या बिजली सारखी तेजतर्रार दिसली.

पेंटर बाबू पडला. राजेंद्र गोस्वामीच करीयर संपल.

पण शेषाद्रीला पिक्चर ऑफर सुरूच राहिले. पण तिला त्यात कोणताही इंटरेस्ट नसल्यामुळे ती आपल्या शास्त्रीय नृत्याकडे परत गेली. तिथे काही शोज करत होती. नवीन शिकत होती. तिचं सगळ बरं चालेलं. 

अचानक एक दिवस तिला कळाल कर्ज, विश्वनाथ सारखे सुपरहिट सिनेमे बघवणारे सुभाष घई नवीन सिनेमा बनवत आहेत आणि त्यांना शेषाद्रीच हवी आहे.

वर्ष होतं १९८३. रेखा, हेमामालिनी, जया प्रदा सारख्या दाक्षिणात्य हिरोईन बॉलीवूड गाजवत होत्या. एकतर त्या दिसायला देखण्या होत्या पण शिवाय डान्स हा त्यांचा प्लस पॉंइंट होता.  त्यामुळे त्यांना शेषाद्रीला जाऊ द्यायचं नव्हतं.

आणखी एक शेवटचा प्रयत्न म्हणून ती अभिनयासाठी तयार झाली.

सुभाष घई नव्या हिरोला लॉंच करत होते. सिनेमाच नावसुद्धा हिरोच होतं. त्याच नाव होतं जयकिसन श्रॉफ.

जगातला पहिला भिडू. अस्सल मुंबईकर गल्लीतला टपोरी. स्वतःला हिऱ्यांचा जोहरी समजणाऱ्या घईनी त्याला मोठा ब्रेक द्यायचा ठरवला होता. त्याच्या समोर शशिकला शेषाद्रीला हिरोईन केलं. दोघेही नवीन होते. सुभाष घईनी त्यांच्याकडून रगडून काम करवून घेतल.

या हिरोच्या निमित्ताने त्यांनी या दोघांच नवीन नामकरण देखील केलं होतं,

जयकीसनचा झाला जॅकी श्रॉफ आणि शशिकला झाली मिनाक्षी शेषाद्री.

बच्चनच्या कुलीबरोबर घईंचा हिरो रिलीज होत होता. अॅक्सिडेंटनंतर अमिताभची कमबॅक फिल्म असलेली कुली सुपरहिट होणार यात कोणालाही शंका नव्हती. मग तिच्यासोबत नव्या अभिनेत्यांचा सिनेमा सिलीज करायचा मुर्खपणा घई का करत आहेत हा प्रश्न अनेकांनी त्यांना विचारला पण सुभाष घई नेहमीप्रमाणे गालातल्या गालात हसत गप्प राहिले.

हिरो रिलीज झाला. लक्ष्मीकांत प्यारेलाल च म्युजिक, जग्गू दादाची फाईट, त्याची ती बासरी सगळ गाजलं.

यासगळ्या गर्दीत तू मेरा जानु है म्हणून जग्गू दादा सोबत लडिवाळ पणा करणारी हिरोईनसुद्धा भाव खाऊन गेली. सारखं सारखं तेच ते चेहरे पाहून कंटाळून गेलेल्या पब्लिकला हे दोघेही फ्रेश अॅक्टर्स खूप आवडले होते.

मिनाक्षी शेषाद्रीवर ऑफर्सचा पाऊस सुरु झाला. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, रजनीकांत सगळ्यांच्या बरोबर तिचे सिनेमे येऊ लागले. मोठमोठे प्रोड्युसर्स तिला साईन करण्यासाठी धडपडत होते. अनिल कपूर बरोबरचा मेरी जंग, बच्चन सोबतचे गंगा जमुना सरस्वती, शहेनशहा हे सिनेमे गाजले. मीनाक्षीच नाव घराघरात पोहचल.

ती होती दाक्षिणात्य पण वाढली होती बिहार मध्ये त्यामुळे तिची हिंदीवर व्यवस्थित कमांड होती. ती इतर साउथ अभिनेत्रीपेक्षा मॉडर्ण दिसायची. कोणताही रोल असो त्यात सहज फिट होणे तिच्यासाठी डाव्याहातचा मळ होता. फक्त शोभेची बाहुलीवाले रोल करण्यापेक्षा दामिनीसारखे वेगळ्या धाटणीचे रोल सुद्धा तिने केले.

रेखानंतर भारताची सुपरस्टार म्हणून तिच्यात आणि श्रीदेवीच्यात स्पर्धा होती. पण मुळात मिनाक्षी खूप कॉम्पिटेटिव्ह नसल्यामुळे स्पर्धा फक्त त्यांच्या फॅन्सपुरती उरली. 

अचानक धकधक माधुरी आली आणि श्रीदेवी, मिनाक्षी दोघीही  मागे पडल्या. तरी त्यांचे स्थान दुसरे तिसरेच होते. १९९० साली आलेल्या घायलमुळ दिग्दर्शक राजकुमार संतोषी, अभिनेता सनी देओल बरोबर तिची जोडी जमली. घायल सुपरहिट झाला.  दामिनी सुपरहिट झाला. तिसरा घातक देखील सुपरहिट झाला.

पण घातक नंतर मिनाक्षीने जाहीर केलं की ती सिनेमाचा संन्यास घेत आहे.

कोणालाच कळेना की मिनाक्षी शेषाद्रीने हा टोकाचा निर्णय का घेतला?

त्याकाळात एक अफवा फेमस झाली होती की मिनाक्षीचं आणि सुपरस्टार सिंगर कुमार सानूच अफेअर सुरु आहे. महेश भट्टच्या जुर्म सिनेमामध्ये सानूने जब कोई बात बिगड जाये हे गाणं गायलं होतं आणि ते चांगलच गाजलं देखील होतं. जुर्मची हिरोईन होती मिनाक्षी. तिथल्या सेटवर दोघांची ओळख झाली. पुढे ओळख वाढत जाऊन सानू मिनाक्षीच्या प्रेमात पडला.

खरं तर कुमार सानूच लग्न झालेलं होतं. पण तरी मिनाक्षीच्या सौंदर्यापुढे त्याचा टप्पा पडला.

आशिकीच्या यशापासून त्याचे सितारे सुद्धा जोरात चमकत होते. एकापाठोपाठ एक फिल्मफेअर पटकवून त्याने आपण बेस्ट आहे ते सिद्ध देखील केलं. अख्खा भारत कुमार सानू रागात गात होता. मिनाक्षीसुद्धा त्याच्या टलेंटच्या प्रेमात पडली. जवळपास तीन वर्षे त्यांचे अफेअर चालले.

पण जेव्हा सानूची त्याच्या बायकोसोबत भांडणे सुरु झाली तेव्हा मात्र गोष्ट बिघडायला सुरवात झाली. दोन्ही दगडावर हात ठेवून जाणे कुमार सानूला झेपत नव्हते. एकदा त्याच्या बायकोने रागाच्या भरात जोरदार मुलाखत दिली. एकदा सानुच्याच सेक्रेटरीने चुकून मिनाक्षीबद्दलच सिक्रेट सांगितलं. खूप राडा झाला. सानूने त्याच्या बायकोसोबत घटस्फोट देखील घेतला.

मात्र मिनाक्षी या सगळ्याला वैतागली होती. तिने सुद्धा कुमार सानुला टाटा बायबाय केलं.

फक्त एव्हढच नाही तर हरीश मयसुर नावाच्या एका अमेरिकेत राहणाऱ्या इन्व्हेस्टमेंट बँकर बरोबर लग्न केलं आणि थेट बॉलीवूडला टाटा करून तिकडेच राहायला गेली. तिच्या लाखो फॅन्सच ब्रेकअप झालं.

आता मिनाक्षी अमेरिकेतच राहते. तिला दोन लेकरं आहेत. मिनाक्षीने तिथे सुद्धा फावल्या वेळात लहान मुलांना डान्स शिकवून आपला छंद जोपासला होता. मध्ये सनी बाबा घायल2 बनवत होते तेव्हा तिने त्यात काम करण्यास नकार दिला. आज तिचा वाढदिवस. दरवर्षी तिच्या वाढदिवसादिवशी मिडियामध्ये ती सध्या काय करते प्रश्न विचारला जातो, तिचे अमेरिकेतले फोटो टाकून हिला ओळखलत का असे प्रश्न विचारतात.

माधुरीने अमेरिकेतला संसार मुंबईला आणून दुसरी इनिंग सुरु केली, श्रीदेवीने देखील कमबक केलेलं तस नव्वदीची एक गोड आठवण असणारी मिनाक्षी परत कधी येणार हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.