ते गांधींना म्हणाले, “शाहू महाराजसे मैंने पैसा नहिं लिया, लेकिन उनकां बडा दिल लियां हैं”
कर्मवीर भाऊराव पाटील. महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची चळवळ सुरु केली. गोरगरीब बहुजन समाज, उपेक्षित पददलित समाजाच्या पोरांना शिकायला त्यांनी शाळा वसतीगृहं सुरु केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोरं काखोटीला उचलून आणून शिकवली…
चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केल की, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, शाहू महाराज यांनी भिका मागून संस्था काढल्या. अशा गोष्टी त्याकाळात देखील झाल्या होत्या. खुद्द महात्मा गांधींनीच शाहू महाराजांकडून किती पैसे घेतले असं मिश्किलपणे विचारलं होतं. तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिलेलं उत्तर म्हणजे,
शाहू महाराजसे मैंने पैसा नहिं लिया, लेकिन उनकां बडा दिल लियां हैं”
२२ सप्टेंबर १८८७ साली भाऊराव पाटलांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज मध्ये एका कर्मठ जैन शेतकरी कुटुंबात झाला. वडील मुळचे ऐतवडे बुद्रूकचे मात्र नोकरी निम्मित विट्यामध्ये वास्तव्य होते. त्यांनी पोरांना शिकवण्यासाठी कोल्हापूरला पाठवले. भाऊराव पाटीलांना शाहू महाराजांनी सुरु केलेल्या जैन बोर्डिंगमध्ये ठेवण्यात आलं.
तेव्हा पासूनच शाहू महाराजांच्या विचारांचा त्याच्या कार्याचा भाऊरावावर प्रभाव पडला होता. भाऊरावांच्या अंगी बंडखोरी लहानपणापासूनच होती. जैन बोर्डिंग मधल्या तत्कालीन कर्मठपणाविरुद्ध ते नेहमी आवाज उठवायचे.
शाहू महाराजांनी दलित मुलांसाठी सुरु केलेल्या “मिस क्लार्क” या वसतिगृहाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास भाऊराव उपस्थित राहिले. याबद्दल जैन बोर्डिंगच्या पदाधिकार्यांनी त्यांना खडसावले.
विटाळ झालेल्या भाऊरावाना स्नान केल्याशिवाय जेवण देण्यास मनाई केली. स्पृश्यापृश्य्ता फाट्यावर मारणाऱ्या भाऊरावांनी भोजनगृहाचे कुलूप तोडले आणि जेवण केले. त्यांना बोर्डिंग मधून काढून टाकण्यात आले.
या बंडखोर तरुणाची बातमी ऐकल्यावर शाहू महाराज त्याच्यावर बेहद खुश झाले.
त्यांनी त्यांना आपल्या राजवाड्यावर ठेवून घेतले. भाऊरावांना देखील कुस्तीचा नाद होता. शाहू महाराजांचे ते लाडके बनले. त्याच्या खास पैलवानांना तेल लावून मालिश करण्याची जबाबदारी भाऊकडे होती. सहाजिकच त्यांच अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. ते गणितात नापास झाले. त्यांनी शाहू महाराजांमार्फत वशिला लावून पास होण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्याच्या कुलकर्णी गुरुजी नावाच्या मास्तरांनी त्यांना नकार दिला. साक्षात शाहू महाराजांना हे पोराच्या भवितव्यासाठी ठीक नाही हे मास्तरांनी पटवून दिले.
महाराजांनीही आग्रह धरला नाही. भाऊराव पाटलांना आयुष्यभरासाठी हा धडा लक्षात राहिला. पुढे कधीही यशासाठी सोप्या मार्गाचा अवलंब त्यांनी केला नाही. पण शाहू महाराजांशी त्यांचे नाते असे जिव्हाळ्याचे होते. पुढे डांबर प्रकरणात त्यांचे रस्ते वेगळे झाले. पण शाहूंच्या दाखवलेल्या विचाराच्या वाटेवरच त्यांचा हा पठ्या चालत राहिला.
पुढे भाऊराव किर्लोस्करवाडीत नोकरीला लागले.
किर्लोस्करांच्या नांगराच्या मार्केटिंगच काम त्यांच्या कडे होत. नोकरीत जबरदस्त यश त्यांना मिळत होत. लोक त्यांना नांगऱ्या पाटील म्हणून ओळखायचे. पण भाऊच मन काही नोकरीत रमत नव्हतं. सत्यशोधक चळवळीकडे त्याचं मन ओढून घेत होत.
१९१९ साली काले गावी भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात त्यांनी “रयत शिक्षण संस्थेची” स्थापना केली. वसतीगृहापासून सुरवात करायची आणि नंतर शाळा काढायच्या असं त्यांनी ठरवलं. यापूर्वी दुधगाव ला होस्टेल काढण्याचा अनुभव त्यांना होता. काले आणि नेर्ले येथे बोर्डिंग सुरु झाले. नोकरीचा राजीनामा दिला.
भाऊरावांच्या अखंड पाठीशी असणाऱ्या शाहू महाराजांच तोवर निधन झालं होतं. त्यांनी कुस्तीची जंगी मैदाने भरवून भाऊरावाना वसतिगृहासाठी पैसे उभे करून देण्याची योजना आखली होती. मात्र नियतीला ते मान्य नव्हते.
याच सत्यशोधक समाजात धनजी कुपर नावाचे उद्योगपती होते. त्यांनी भाऊरावाना साताऱ्यात मोठे वसतिगृह काढून देण्याचे आश्वासन दिले. या बदल्यात अट घातली की किर्लोस्करासारखा नांगराचा कारखाना उभारणीसाठी भाऊरावनी मदत करायची. याच धनजी कूपरने आपले आश्वासन पाळले नाही.
संतापलेले भाऊराव बंदूक घेऊन त्यांच्या अंगावर गेले. प्रबोधनकार ठाकरेनी त्यांना अडवले. मात्र भाऊराव पाटलांनी एक प्रतिज्ञा केली.
“माझे वसतिगृह शाहूंच्या नांवे सुरु करीन आणि त्या वसतिगृहात माझ्या दाढीतील केसाएवढी मुले येई पर्यंत दाढी करणार नाही आणि पायात वहाणा वापरणार नाही. “
आधुनिक कपडे तर त्यांनी असहकार आंदोलनावेळी गांधीजीच्या प्रेरणेने टाकून दिले होते. आता तर ते वाढवलेली दाढी खादीवेश हातात काठी असे अनवाणी राज्यभर शिक्षण संस्थेसाठी फिरू लागले. शिक्षणप्रसाराच्या यज्ञात झपाटललेला योगी असं त्याचं रूप होतं.
१९२४ साली दसर्याच्या मुहूर्तावर साताऱ्यात आपल्या घरातच वसतिगृह सुरु केलं. ४ विद्यार्थी होते. यात एक जण दलित होता.
त्याकाळच्या मानाने हे धाडसी पाउल होते. भाऊरावाची पत्नी लक्ष्मीबाई यांनी या कार्यात त्यांना समाजाच्या विरोधात जाऊन साथ दिली. ती साथ अखंडपणे शेवट पर्यंत होती. पुढे एकदा या पोरांना जेवू घालण्यासाठी आपलं मंगळसूत्र गहाण ठेवण्यापर्यंत या माउलीने त्याग केला.
रयतचं असं हे लावलेलं रोपट आकार घेऊ लागलं. पुढे १९२६ साली एका भाड्याच्या इमारतीत हे वसतिगृह हलवण्यात आले.
वसतिगृहाला नामकरण देण्याच्या कार्यक्रमासाठी महात्मा गांधीना आणायचे ठरले. गांधीजींशी पत्रव्यवहार करून तशी वेळ घेण्यात आली. मात्र पुढे काही सनातनी लोकांनी गांधीजीची या वसतिगृहाची भेट रद्द करवली. भाऊराव पाटीलांनी वसतिगृहाची पोरे घेऊन जाऊन कराड सातारा रस्त्यावर गांधीजींची गाडी अडवली. सत्य वृत्तांत कळाल्यावर गांधीजी वसतिगृहाच्या उद्घाटनाला आले.
२५ फेब्रुवारी १९२७ ला “छ.शाहू बोर्डिंग हाउस” असे वसतिगृहाचे गांधीजींच्या हस्ते नामकरण करण्यात आले.
वसतिगृहाचा इतिहास ऐकून ते खुश झाले. संस्कृत मध्ये नंबर मिळवणाऱ्या मांग आणि मुस्लीम मुलांना गांधीजीनी आपल्या गळ्यातला हार घालून त्यांच कौतुक केलं. अठरापगड जातीच्या मुलांना घेऊन यशस्वी झालेला हा प्रयोग पाहून ते आश्चर्यचकित झाले होते. आपल्या भाषणात त्यांनी
“साबरमती आश्रमत मला जे शक्य झाले नाही ते तुम्ही साताऱ्यात करून दाखवलं”
या शब्दात भाऊरावाना शाबासकी दिली.
याच भाषणात मिश्कीलपणे गांधीजीनी विचारणा केली की या नामकरणासाठी राजाकडून कितीची देणगी घेतली?
रांगड्या भाऊरावानी टोला दिला,
“महाराजसे मैंने पैसा नहिं लिया, लेकिन उनकां बडा दिल लियां हैं “
सर्व जातीसाठी एकत्र वसतिगृह सुरु करून शाहू महाराजांचा हा शिष्य त्यांच्या ही दोन पावले पुढे गेला होता. रयतचा वटवृक्ष पुढे फुलतच गेला.
साताराच्या छत्रपतींच्या धनीनीच्या बागेत बोर्डिंग हलवण्यात आले. स्वाभिमानी शिक्षण हेच ब्रीद असलेली ही रयत शिक्षण संस्थेच्या पारंब्या आज महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत.
साडे चारशे शाळा ,त्याच्यासाठी ६८ वसतिगृहे ४२ कॉलेज आणि त्यांची २७ वसतिगृह, ८ आश्रमशाळा अशा विविध ६७९ संस्था आणि तिथे शिकणारे साडे चार लाख मुले आजही कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श फक्त महाराष्ट्रातच नाही तर अख्या देशात गाजवत आहेत.
हे ही वाचा –
- आत्ता परत येईल ते शस्त्र घेऊनच- नागनाथ अण्णा
- शनिवारवाड्यावरचा युनियन जॅक उतरवून तिरंगा कोणी फडकवला…?
- आरं ए नान्या, बायकुला शाळा शिकवायचं हे याड कुठनं काढलंस ?
ब्रीद वाक्य: “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” &
not स्वाभिमानी.
“महारजसे मैने पैसा नही लिया,
लेकिन उनका बडा दिल लिया है..”
व्वाह कर्मवीर..????