अशोक तुपे बातमीदार नव्हते. ते, जे काही होते, त्याला ‘बातमीदार’ म्हणतात.

कोरोना, तुझे सगळे अपराध मी मान्य केले असते. पण, आज तू जे केलं आहेस ना, त्याला क्षमा असूच शकत नाही.

अशोक तुपेंना तू नेलंस?

अरे, ‘बातमीदार’ म्हणजे काय, हे या नव्या पोरांना कसा दाखवू मी आता? ‘अर्णबायझेशन’ झालेल्या कचकड्याच्या जर्नालिझममध्ये ‘बातमीदार’ हा असा असतो, हे सांगण्यासाठी तो एकमात्र पुरावा होता माझ्याकडे. तोही घेऊन गेलास तू?

अशोक तुपेंना मी सांगायचो, “पेपर कधी मरायचे ते मरू द्या. टीव्ही तर कधीचाच मेलेला आहे. डिजिटल म्हणजे पत्रकारितेचा जन्मापूर्वीचाच मृत्यू आहे. बाकी काही होऊ द्या. पण, तुम्ही मरू नका. बातमीदारीच्या संस्कृतीचे अवशेष तुमच्या निमित्ताने जतन करू द्या आम्हाला. तुम्ही शेवटचे बातमीदार आहात!”

तरीही, हा मूर्ख माणूस असा कसा जाऊ शकतो?

अशोक तुपे हा जात्याच मूर्ख माणूस. महामूर्ख माणूस. तो शहाणा असता, तर अब्जाधीश झाला असता. एकतर, तो नगर जिल्ह्यातला पत्रकार. नगर जिल्ह्यातलेच काय, राज्यातले बडे बडे नेते त्याला टरकून असत. त्याचा संपर्क सर्वपक्षीय आणि दांडगा. बातमीदारीवर पकड आणि समोरच्याला आकर्षून घेईल, असं रांगडं चुंबकीय आकर्षण. 

या बळावर एखादा मालामाल झाला असता..!

राजकीय नेत्यांचा सल्लागार, संपर्क प्रमुखच काय, तो महाराष्ट्राचा प्रशांत किशोर वगैरे झाला असता! ते सोडा, दोन- चार डील वर्षात जमली असती, तरी आतापर्यंत स्वतःच्या हेलिकॉप्टरनं फिरला असता.

पण, हा कर्जबाजारीच. गेल्यावर्षी कांदा गेला, म्हणून कर्ज फिटलं तरी. पोरंही रांकेला लागली. नाहीतर, हा जगातला पहिला बातमीदार, जो आपला पगार लोकांवर खर्च करायचा. आणि, घरातल्या जनावरांचं दूध विकून बायको पोरांना शिकवायची.

अशोक तुपे म्हणजे कायम पत्रकारितेच्या नशेत असलेला प्राणी.

जागतिकीकरणानंतर सगळं बदललं. पत्रकारिता पंचतारांकित झाली. इंग्रजी दैनिकं सोडून ‘करीअरिस्ट’ पत्रकार मराठीत संपादक होऊ लागले. सगळं कसं चकचकीत झालं. पण, जे काही झालं, त्यानं पत्रकारितेलाच हद्दपार केलं. ‘सात-बारा’ आणि ‘आठ अ’ वगैरे काही गंध नसलेले अनेक संपादकराव आले. पत्रकारिता करण्यापेक्षाही नेत्यांना आणि मालकांना सांभाळू लागले. चटपटीत चतुराईनं दिपवून टाकू लागले. चतुरस्त्र नव्हे, तर चतुर पत्रकारांची चलती वाढू लागली.

अशा या वातावरणात अशोक तुपे नावाचा बातमीदार मात्र शेती- मातीतली, माणसांची बातमीदारी शांतपणे करत राहिला.

त्याची नाळ शेती-मातीशी होतीच, पण त्याची समज तेवढीच विलक्षण होती. व्यासंग आणि आवाका प्रचंड होता. बहुआयामी वाचन, समज आणि संपर्क. अशोक तुपे हा माणूस शब्दशः अफाट होता. म्हणजे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू त्याच्याशी बोलताना दहावेळा घसा साफ करत, असा त्याचा दबदबा होता. आणि, एरव्ही शेतीविषयी खास अधिकारवाणीनं बोलणारा शरद पवारांसारखा नेताही अशोकपुढं बोलताना अधिक सावध दिसायचा.

शेतीकडं समग्र विज्ञान म्हणून, समग्र अर्थकारण म्हणून आणि सर्वंकष संस्कृती म्हणून अशोक तुपे पाहू शकायचे, तशी क्षमता मी कोणामध्ये आजवर पाहिली नाही. त्यामुळे अशोक तुपेंचे रिपोर्ट वाचणं ही धमाल असायची. आणि, अशोकसोबत मैफल जमवणं हा भाग्याचा योग असायचा.

अशोक तुपे माझ्यापेक्षा वयाने बरेच मोठे. मी ‘लोकसत्ता’ला सहसंपादक असतानाही, ते बातमीदार होते. आता दोनेक वर्षानी ते निवृत्त झाले असते. नॉर्मली माणूस पत्रकार झाला की सगळ्यात पहिल्यांदा त्याचं कुतुहल संपतं. मग तो सिनिकल होत जातो. हळूहळू त्याला कशाबद्दलही बोलण्याचा आत्मविश्वास येतो आणि नवे काही शिकण्याची इच्छा संपते.

अशोकचं उलटं होतं. त्याचं कुतुहल लहान मुलांच्या वरताण होतं आणि जगातल्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला तेवढाच रस होता. सहकार, शेती, ग्रामीण विकास, राजकारण वगैरे हातखंडा विषय तर सोडाच, मानववंशशास्त्रापासून ते इतिहासापर्यंत सगळ्यात त्याला विलक्षण गती होती.

आपल्या खास ग्रामीण- नगरी टोनमध्ये आणि बुलंद आवाजात तो एकेक मुद्दा उलगडू लागला की विश्वरूपदर्शन घडत असे. मीच काय, कुमार केतकरांसारखे संपादकही अशोकच्या मैफलीत एखाद्या निरागस श्रोत्यासारखे तल्लीन झालेले मी पाहिले आहेत! 

ज्या पैलूचा विचारही आपल्या मनात येऊ शकत नाही, तो पैलू सांगून तो असे काहीतरी सैराट विश्लेषण करत असे की आपण जागीच थक्क व्हावे. तो केवळ रिपोर्टर नव्हता. कार्यकर्ता होता. जगद्विख्यात शेतकरी संप त्याने कसा घडवून आणला, याविषयी तर स्वतंत्रपणेच लिहावे लागेल. एवढा कलंदर असूनही बिलंदरपणाचा त्याच्याकडं पूर्ण अभाव होता.

लोकांचे प्रश्न मांडायचे आणि लोकांसोबत बोलायचे, याच त्याच्या दोन भुका होत्या. कित्येक किलोमीटर पार करून तो त्यासाठी येत असे. त्याच्या या महासागरी ज्ञानामुळं बिचकून असणारे अनेक महानगरी संपादक त्याला टाळत. खरे म्हणजे, माहिती आणि ज्ञानाचा अफाट साठा असूनही अशोकच्या डोक्यात तशी हवा कधीही नसे. उलट एखाद्या लहान मुलाच्या उत्साहाने तो त्याला भावलेले, वाटलेले भडाभडा ओतत असे.

स्वतःला मातीत गाडून घेतलेला हा पत्रकार. जी माती पत्रकारितेत आता कोणाचीच काही लागत नाही, त्या मातीला मुख्य प्रवाहाशी जोडत अनेक अव्यक्तांना आवाज देणारा, ‘आयडिया ऑफ इंडिया’शी जैव नातं असलेला रिपोर्टर. 

नगर जिल्हा हे एक अजब रसायन आहे. धनाढ्य बागाईतदार, शक्तिशाली राजकारणी आणि त्याच जोडीला दुष्काळ, पाणी टंचाईने होरपळणारा सामान्य शेतकरी असे दोन्ही इथे आहे. राजकीय नेत्यांच्या जाहिरातींच्या दावणीला वर्तमानपत्रे बांधली गेली असताना, अशोक तुपे यांनी साधा माणूस या पत्रकारितेत आणला.

दुर्लक्षित विषय पृष्ठभागावर आणले. शेती, माती, पाणी अशा विषयांवर, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानत गेली तीस वर्षे ते त्याच दमदारपणे, न थकता लिहीत राहिले. जर्नालिझम डिपार्टमेंटची पोरं चकचकीत पत्रकारांनाच आयकॉन मानू लागली असताना, या खुर्द-बुद्रुक गावातल्या-शेतात उगवलेल्या पत्रकाराचे हे मोल खूप मोठे. एकूण पत्रकारिता प्रस्थापित व्यवस्थेची पार्टनर झालेली असताना एखादा अशोक तुपे दिसायचा.

मी ‘कृषीवल’चा मुख्य संपादक असताना, त्याला मी अलिबागला बोलावले होते. खास पुरस्काराने गौरव केला होता आणि माझ्या पत्रकारांसाठी कार्यशाळाही घेतली होती. मी सांगायचा अवकाश, अशोक धावत-पळत आला. राहिला. मनसोक्त बोलला. त्यानंतरही आम्ही सतत भेटत राहिलो.

‘दिव्य मराठी’मुळे तर येता-जाता आम्ही ठरवून भेटायचो. श्रीरामपुरात, कधी शनी शिंगणापुरात तो मला घेऊन जायचा. शनीच्या महात्म्याचा आणखी नवा काहीतरी पैलू सांगून, सांस्कृतिक आयामच पार बदलून टाकायचा.

अशोक पत्रकार होता. त्यामुळं त्याला बाकी अनेकांनी विचारूनही लष्कराच्या भाक-या भाजण्याचा धंदा त्यानं नाही सोडला. तो बातमीदार होता. संपादकपदाच्या ऑफर्स तो कसा भिरकावत असे, हे मी स्वतः पाहिलं आहे. तो गावातलाच बातमीदार होता. पुण्या-मुंबईचे मोह त्याला खुणावत नसत. श्रीरामपुरात राहून जगाला गवसणी घालण्याचा त्याचा धंदा होता.

पद, पैसा, प्रतिष्ठा अशा कशातही त्यानं आपली पत्रकारिता मरू दिली नाही. कारण, त्याशिवाय त्याच्याकडं काहीच नव्हतं. त्याशिवाय त्याला स्वतःची ओळखच पटली नसती.

अशोक तुपे बातमीदार नव्हते. ते, जे काही होते, त्याला ‘बातमीदार’ म्हणतात. पत्रकारितेतील उद्याच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही, असा बातमीदार!

– संजय आवटे

लेखक दिव्य मराठीचे राज्य संपादक आहेत. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.