हे आजचं नाही, १९८९ पासून सेनेचं बाहेरच्या राज्यात डिपॉझिट जप्त होत आलय..

  • २०२४ मध्ये आपण दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच  : आदित्य ठाकरे (२७ फेब्रुवारी २०२२)
  • २०२४ पर्यंत शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यत पोहचली असेल आणि बरेच लोक बेरोजगार झाले असतील : संजय राउत (१६  फेब्रुवारी २०२२)
  • यात खंत अशी होती की, दुसऱ्या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती. पण त्यावेळी शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने आपले लोक भाजपमध्ये गेले. पण आता भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्त्व नक्की करेल  : उद्धव ठाकरे (२१ फेब्रुवारी २०२१)

शिवसेनेला देशापातळीवर पक्ष पोहचवायचा आहे. सेनेचा हा अजेंडा लपून राहिलेला नाही. आपला हाच अजेंडा पूर्णत्वाला घेवून जाण्यासाठी शिवसेनेमार्फत उत्तरप्रदेश आणि गोवा या दोन राज्यात निवडणूका लढल्या गेल्या. 

पैकी युपीत सेनेने एकूण ६० जागांवर उमेदवार उतरवले होते. त्या पैकी १९ जणांचे अर्ज पडताळणीतच बाहेर पडले. राहिल्या जागा ४१. या एकूण ४१ जागांवर शिवसेना उमेदवारांना जी मते मिळाली आहेत ती नोटा पेक्षा देखील कमी आहेत. वोट मार्जिन ०.०२ इतक आहे. सर्वच्या सर्व उमेदवारांचा डिपॉझिट जप्त झालेलं आहे.

दूसरीकडे गोव्यात शिवसेनेने १२ जागांवरून निवडणूक लढवली. त्यासाठी राष्ट्रवादी पक्षासोबत आघाडी केली. यात सेना आणि राष्ट्रवादीला मिळून १ टक्के मते मिळाली आहे. नोटाला १.१ टक्के मते मिळाली आहे. गोव्यात देखील सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

आत्ता महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेना देशपातळीवर पहिल्यांदा पोहचत आहे का? पहिल्यांदा लढत आहेत का? तर नाही…

अगदी १९८९ पासून शिवसेना राज्याबाहेरच्या निवडणूक लढवत आहे. 

१९८९ साली शिवसेनेनं गोव्याची निवडणूक लढवली होती. यात त्यांनी ४० पैकी ६ जागा लढवल्या होत्या, आणि त्यात त्यांना ४ हजार ९६० एवढी मत मिळाली होती. एकूण मतांच्या तुलनेत विचार करायचा झाला तर ती ०. ९८ टक्के एवढी होती.

त्यानंतर १९९१ मध्ये शिवसेनेने उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक लढवली. यात त्यांनी १४ जागा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. आणि एवढ्यात जवळपास ४५ हजार मत घेतली होती. आणि पवन कुमार पांडे हे उमेदवार निवडून देखील आले होते.

पण उत्तरप्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्यात एकूण मतांच्या तुलनेत ०.१२ टक्के इतकीच मत मिळाली होती.

त्यानंतर देखील शिवसेनेने उत्तरप्रदेश मध्ये निवडणूक लढवली मात्र यात एकदाही यश आलं नाही. पण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे काही उमेदवार निवडून येत राहिले.  १९९३ सालच्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत एकूण ८८ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यात त्यांना ७५ हजार ७८३ मत मिळाली होती.

१९९६ हरियाणा विधानसभा निवडणुकीत १७ उमेदवार उतरवले होते. इथं लोकांनी त्यांना ६ हजार ७०० मत दिली होती. १९९७ साली पंजाब निवडणूक यात ३ उमेदवारांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण या तिघांना मिळून १ हजार मत पण मिळाली नव्हती.

१९९८ सालच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ३२ जागांवर उमेदवार उभे केले होते.  यात त्यांना मिळालेल्या मतांची संख्या होती ९ हजार ३९५. त्याच वर्षीच्या हिमाचल प्रदेश निवडणुक देखील शिवसेनेने लढवली होती. यात ६ उमेदवारांना २ हजार ८२७ मत मिळाली होती.

१९९९ आणि २००२ सालच्या गोवा निवडणुकीत शिवसेनेने अनुक्रमे १४ आणि १५ उमेदवारांना तिकीट दिले होते. मात्र या दोन्ही मध्ये त्यांचा एकही उमदेवार जिंकला नव्हता.

२००० च्या ओडिसा निवडणुकीत देखील शिवसेना उतरली होती. इथं त्यांनी उभं केलेल्या १६ उमेदवारांपैकी एक ही उमदेवार निवडून येऊ शकला नव्हता. पण तब्ब्ल १८ हजार मत घेऊन सगळ्यांचं लक्ष मात्र वेधून घेतलं होतं.  

२००१ सालच्या केरळ विधानसभेत १ उमेदवार उभा केला होता. यात त्याला अवघी २७९ मत मिळाली होती.

त्यानंतर २०१५ आणि त्यानंतर २०२० मध्ये शिवसेनेने बिहार मधील विधानसभा लढवली. मात्र, त्यातही त्यांना यश आले नव्हते. २०२० मध्येही शिवसेनेची पाटी कोरीच होती. २०१५ साली ८० जागा तर २०२० साली २२ जागांवर निवडणूक लढवली होती. यात दोन्ही वेळेला त्यांच्या काही उमदेवारांची डिपॉझिट देखील जप्त झाली होती.

२००७ आणि २०१७ सालच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेना उतरली होती. इथं त्यांना दोन्ही वेळेला उमेदवारांचा डिपॉझिट वाचवायला धडपड करावी लागली होती.

पहिली निवडणूक हरण्यासाठी दुसरी निवडणूक हरविण्यासाठी आणि तिसरी निवडणूक जिंकण्यासाठी हे निवडणुकीच्या राजकरणाचे सूत्र बसपाचे संस्थापक दिवंगत काशिराम यांनी मांडले.

पण राज्याबाहेरच्या राजकारणात शिवसेनेचे वरचे सगळे आकडे बघितले तर त्यांना मात्र हे तत्व लागू होताना दिसत नाही. १९९१ सालचा उत्तरप्रदेश विधानसभेतील शिवसेनेच्या विजयी उमेदवाराचा अपवाद वगळता इतर वेळेस मात्र त्यांची पाटी कोरीच राहिली होती.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.