…म्हणून मेट गालामध्ये सेलिब्रिटीज भयंकरातील भयंकर ड्रेस घालत असतात

सोशल मीडिया प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. यावर्षीचं मिम मटेरियल तयार होण्याची सुरुवात झालीये. म्हणजे? अहो, न्यूयॉर्कमध्ये मेट गाला २०२२  झाला आहे. अजूनही ज्यांना समजलं नाही त्यांना सोप्यात सांगायचं तर अभिनेत्री प्रियांका चोप्राची ती हेअरस्टाईल आठवा ज्यावर ‘चिमणीचं घरटं’ ‘वीरप्पनच्या मिश्या’ असे मिम्स आले होते.

आता आठवलं? तोच शो सुरु झाला आहे, ज्यामध्ये सेलिब्रिटीज चित्र-विचित्र ड्रेस घालून येतात आणि मिमच्या माध्यमातून प्रसिद्ध होतात.

या शोमुळे ना दोन गोष्टी मिळतात…

एक म्हणजे खळखळून हसवणारे मिम आणि दुसरं म्हणजे डोक्याला शॉट लावणारा प्रश्न – हे सेलिब्रिटी लोक असे भयंकरातील भयंकर ड्रेस घालतातंच का? आम्हालाही हाच प्रश्न पडलेला म्हणून उत्तर शोधलंय आणि तुम्हालाही सांगायला आलोय…

या प्रश्नाचं उत्तर मेट गाला हा शो नक्की काय आहे? हे माहित असलं की आपोआप मिळतं बघा..

Met Gala इव्हेंट म्हणजे कपडे, हेअरस्टाईल आणि मेकअप यांचा शो असतो. सौंदर्य तसेच फॅशन जगतात Met Gala सोहळा खूप महत्त्वाचा असतो. या सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर सेलिब्रिटीज लोकांची चर्चा जगभर होते. 

संगीत, चित्रपट, फॅशन, मॉडेलिंग या क्षेत्रातील प्रसिद्ध लोक या सोहळ्यात सहभागी होत असतात. ज्यामुळे हा सोहळा ग्रँड समजला जातो आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सेलिब्रिटी जय्यत तयारी करतात.

मात्र याही पेक्षा महत्वाची गोष्ट आहे या शो चं उद्दिष्ट. मेट गाला हा खरं तर एक फंड रेजिंग इव्हेन्ट आहे. या शोमधून जमा होणारा निधी कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी वापरला जातो. याची सुरुवात झाली १९४६ पासून. मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूटच्या गालावरून या कार्यक्रमाला नाव मिळालं. 

दरवर्षी या इव्हेंटसाठी एक थीम ठरवून दिली जाते. आणि याच थीमनुसारच सेलिब्रिटीज त्यांचे कपडे, मेकअप, हेअरस्टाईल या सगळ्या गोष्टी ठरवतात आणि त्यानुसार आपल्याला चित्र-विचित्र वेशभूषेत दिसतात. आता थीमनुसार साधी आणि ज्यात सौंदर्य खुलून दिसेल अशी वेशभूषा करता येऊ शकते, मात्र सेलिब्रिटीज अशी ड्रेसिंग करून येण्याचं कारण म्हणजे…

‘अगर कुछ हटकर होगा नहीं, तो उस पर लोगों की नजर पड़ेगी नहीं’

फंड रेजिंगसाठी जास्त संख्येत लोकांनी याकडे आकर्षित होणं गरजेचं आहे. आणि म्हणून लोकांना आकर्षित करण्यासाठी अशी वेशभूषा केली जाते. यामध्ये सेलिब्रिटीज ज्या-त्या वर्षीची थीम लक्षात घेऊन त्यांच्या आवडीनुसार ड्रेस निवडतात. आणि जर एखाद्या ब्रँडकडून जर सेलिब्रिटी आलेला असेल तर त्याच ब्रँडचे कपडे त्यांना घालावे लागतात.

मेट गालाचं तिकीट हवं असेल तर ३० हजार डॉलर म्हणजे तब्बल २० लाख ११ हजार रुपये खर्च करावे लागतात. आणि या इव्हेंटसाठी जर टेबल बुक करायचा असेल तर तुम्हाला २ लाख ७५ हजार डॉलर म्हणजे जवळपास २ कोटी रुपये खर्च मोजावे लागतात बॉस.

फॅशनच्या दृष्टीकोनातून, या शोच्या वेळी डिझायनर्सना पोशाखांवर सेलिब्रिटींसोबत जवळून काम करण्याची संधी मिळते आणि त्यांच्या कल्पकतेला अजून वाव देता येतो. त्यामुळे डिझायनर्स अपारंपरिक आणि हटके आउटफिट्स घेऊन येतात. बहुतेक वेळा, या प्रदर्शनात भूतकाळातील प्रतिभावान डिझायनर्सना श्रद्धांजली वाहिली जाते आणि तेच कपड्यांमध्ये दिसून येते. 

शोची थीम एखादी गोष्ट सांगते किंवा इतिहासातून काही शिकवत असते.

उदाहरणार्थ, २०१८ मध्ये झालेल्या या कार्यक्रमाची थीम होती ‘हेवनली बॉडीज: फॅशन अँड द कॅथोलिक इमॅजिनेशन’. त्यात व्हॅटिकनमधील शेकडो पवित्र वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आलं होतं. त्याचाच भाग म्हणून रिहानाने पोपचा पोशाख परिधान केला होता, तर केटी पेरी या अमेरिकन सिंगरने पंख आणि सर्व असलेल्या देवदूताचे प्रदर्शन केलं होतं.

२०१९ ची थीम होती ‘कॅम्प : नोट्स ऑन फॅशन’. 

या थीमअंतर्गत असे कपडे घालून यायचे होते जे ओव्हर-द-टॉप स्टाइल, विनोदी, आणि नाटकीय दिसतील. म्हणजेच आपल्या ड्रेसिंगने तुम्हाला असं काही सांगायचं होतं जे तुम्ही औपचारिक कार्यक्रमात मोठ्या मंचावर सांगू शकत नाही. सगळ्या सीमारेषा तोडायच्या होत्या. ज्याचा भाग म्हणून प्रियांकाने ‘तो’ वाला ड्रेस घातला होता. आणि तिच्यासाठी फॅशनचा अर्थ हाच असं ती म्हणाली होती.

यावर्षी  शोने १५ मिलियन डॉलर जमा केले होते. 

तर गेल्यावर्षी २०२१ ला “American Independence” ही थीम ठरविण्यात आली होती. ज्यानुसार अभिनेत्री किम कर्दाशियन हिने पूर्ण काळा ड्रेस घालत लक्ष वेधून घेतलं होतं.

दरवर्षी मेट गाला मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी होत असतो. त्यानुसार यावर्षी मेट गाला २ मे ला झाला. या शोमध्ये सामील होणारा कोणताही सेलिब्रिटी स्मोकिंग करू शकत नाही, सेल्फी काढू शकत नाही किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकू शकत नाही.

तर यंदाच्या थीमबद्दल बोलायचे झाले तर, ती होती ‘इन अमेरिका : फॅशन अँथोलॉजी, आणि ड्रेस कोड होता ‘गिल्ड्ड ग्लॅमर अँड व्हाइट टाय’. 

यातून दाखवण्यात आलं १९ व्या शतकाच्या शेवटच्या दशक जेव्हा औद्योगिकीकरणामुळे देशातील संपत्तीची दरी झपाट्याने वाढली. या कार्यक्रमात भारताच्या उद्योजक नताशा पूनावाला यांच्या फॅशनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सोनेरी सब्यसाची साडीमध्ये त्यांनी एंट्री केली होती. 

तर दुसरं अचंबित करणारी गोष्ट केली मॉडेल कारानं. रेड सूटमध्ये आलेल्या कारानं कार्पेटवरच तिचा टॉप उतरवला. ती टॉपलेस झाली पण तिने तिचे शरीर सोनेरी रंगाने रंगवलं होतं आणि सोबतच तिनं गोल्डन चेन गळ्यात घातल्या होत्या.

असा यंदाचा मेट गाला पार पडला आहे. यात अनेक सेलिब्रिटीजने त्यांचं बेस्ट दिलंय. मात्र नेटिझन्सना कोणती ड्रेसिंग जास्त आवडली हे तर मिम्स मधूनच समजणार आहे. 

तेव्हा सगळ्यांचं लक्ष मिम्सकडे लागलंय. तुम्हाला आजपर्यंत कोणत्या सेलिब्रिटींचा ड्रेस कोड आवडलाय किंवा त्यावर हसू आलंय, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा… 

 हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.