मंत्री असलेले गणपतराव देशमुख घर चालवायला ४०० की ५०० रुपये देतो ही गोष्ट विसरले होते…

राजकारणी आणि साधेपणा या दोन गोष्टी अलीकडच्या काळात एकाच ठिकाणी मिळणं हि गोष्ट तशी दुर्मिळच. पण २० व्या शतकातील राजकारणात मात्र हि गोष्ट आवर्जून पाहायला मिळायची. अगदी देशपातळीवर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं नाव साधेपणासाठी अग्रक्रमाने घेतलं जात.

राजकारणातील साधेपणाबाबत जर महाराष्ट्रातील नाव अग्रक्रमाने सांगायचं झालं तर ते म्हणजे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं. 

गणपतराव देशमुख यांच्या साधेपणाच्या बाबतीतील बरेच किस्से सांगोल्यात गेलं कि ऐकायला मिळतात. काही जण त्यांच्या एसटीने प्रवास करण्याच्या आठवणी देखील सांगतात. असाच त्यांच्या साधेपणाच्या बाबतीमधील एक किस्सा म्हणजे गणपतराव या राज्यचे मंत्री असताना ते एकदा आपण घर चालवायला पत्नीला ४०० रुपये देतो कि ५०० रुपये हि गोष्ट सपशेल विसरले होते. त्यामुळे त्यांना रोषाला देखील सामोरं जावं लागलं होतं.

जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी हा किस्सा एकेठिकाणी सांगितला आहे. 

गणपतराव यांचा जन्म झाला तेव्हा घरात देशमुखी. त्यामुळे देशमुखी परंपरेतच ते मोठ्ठे झाले. पण पुण्यात शेकापच्या नेत्यांच्या संपर्कात आल्यावर घरातून देशमुखी असणारे गणपतराव देशमुख या लोकांमुळे खऱ्या अर्थाने लोकांचे झाले. पुढे ते आमदार झाले. मात्र आमदार झाल्यानंतर देखील ते नेहमीच एस.टी ने प्रवास करत. संपूर्ण महाराष्ट्राला एस.टी. ने प्रवास करणारा आमदार म्हणून ते परिचित होते.

दोन वेळा मंत्री होते. मात्र या मंत्रिपदाच्या काळात देखील त्यांना ना पैशाचा मोह झाला, ना सत्तेचा.

मधुकर भावे सांगतात, गणपतराव पुलोदच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यावेळी ते मंत्रालयाच्या समोरच्या छोट्या बी-४ बंगल्यात राहायचे. मंत्रालयात येताना चालत यायचे आणि चालतच घरी जायचे.

एकदा भावेंनी गणपतरावांना सहज विचारलं ‘गणपतराव, आता छोटा का होईना छान बंगला आहे, परिवाराला आणि लेकरांना इथे का नाही आणत?’ त्यावर गणपतराव म्हणाले, ‘मंत्रिपद कायम थोडंच आहे? मुंबईचा खर्च परवडत नाही, या सवयी आम्हाला महाग वाटतात. पत्नीला घर चालवायला महिना ५०० रुपये देतो’

गणपतराव देशमुख यांची हि गोष्ट ऐकून भावेंनी या देशमुखी असणाऱ्या आमदाराच्या साधेपणावर लेख लिहिला. लेखाचं शीर्षक होते, पत्नीला ५०० रुपयांत घर चालवायला सांगणारा मंत्री!

पुढे काही दिवस गेले, साधारण १९७८ मधील गोष्ट. काही महिन्यांनी मधुकर भावे गणपतराव देशमुख यांच्याबरोबर सांगोल्याच्या सूतगिरणीच्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपल्यावर गणपतरावांच्या घरी जेवायला जाण्याचा योग आला.

गणपतराव यांच्या पत्नी रतनबाई या देखील अगदी त्यांच्यासारख्याच साध्या. त्यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी ज्वारीची भाकरी, झुणका, भरीत, ठेचा असा छान बेत केला होता. गणपतरावांनी ओळख करून दिली. ‘रतनबाई, आपल्यावर लेख लिहिणारे हेच ते पत्रकार…’

यावर रतनबाई ताडकन म्हणाल्या…

‘खोट का लिहिता हो’? ‘भावे म्हणाले, काय खोटं लिहिलं? गणपतरावांनी सांगितलं ते लिहिलं’

तसा रतनबाईंनी आपला मोर्चा गणपतरावांकडे वळवला. त्यांच्याकडे फणकाऱ्याने बघून त्या म्हणाल्या, ‘कधी ५०० रुपये पाठवले हो? ४०० रुपये पाठवायचे…’

गणपतराव देशमुख यांनी चुकून ४०० च्या जागी भावेंना ५०० रुपये सांगितल्याने हा घोळ झाला होता. पण गणपतराव आणि रतनबाई यांच्या संसारातील साधेपणाने मात्र दोघेही कायमचं जमिनीशी जोडून राहिले. त्यामुळेच गणपतराव इतक्या वेळा आमदार झाले पण “आमदारकी” त्यांच्या डोक्यात गेली नाही. मंत्रीपद गेल्याच्या क्षणी त्यांनी सरकारी गाडीचा त्याग केला.

कदाचित याच सगळ्या साधेपणा आणि सच्चेपणामुळे त्यांना सांगोला विधानसभा मतदारसंघातली लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिलं असावं….

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.