आमदार कांदे, ज्यांच्यामुळे राऊत आणि भुजबळ आमनेसामने आले आहेत.

राज्यातल महाविकास आघाडीचं सरकार जास्त दिवस टिकणार नाही अशा चर्चा एखादं दिवस सोडला तर रोजच होत असतात. आता त्या अफवा असो व नसो, आपल्याला स्थिर सरकार पाहिजे. पण या महाविकास आघाडीतल्या एका नेत्याचं दुसऱ्या नेत्यासोबत वाजलंय अशा गोष्टी मात्र सारख्याच घडतायत.

हे सांगायचा विषय म्हणजे, आता शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यामुळे सेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यात जुंपलीय. भुजबळ म्हणतायत,

शिवसेना खासदार संजय राऊत महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. त्यांनी हे सुंदर शिल्प तयार केले आहे. त्याला तडा जाऊ नये याची काळजी शिल्पकारानेच जास्त घ्यावी.

ते असं का म्हणतायत, तर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ वाद आता विकोपाला गेलाय. 

काही दिवसांपासून नाशिक मध्ये एका विचित्र वादाने उग्र स्वरूप धारण केल्याचं चित्र निर्माण झालं होतं. हा वाद नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी तसा अकारण निर्माण केलेला वाद होता. हे प्रकरण पुढे एवढं मोठं होईल आणि त्यातून आपणही मोठे होऊ, असं कांदे यांना कदाचित वाटलं नसेल. म्हणजे सुहास कांदे- छगन भुजबळ या वादाने राजकीय पत वाढवून घेण्यात कांदे यांना काही अंशी नक्कीच यश मिळालंय.

सुहास कांदे तसे नाशिक जिल्ह्यात अनोळखी म्हणजे चर्चेत नसणारे आमदार आहेत. त्यांच्यातल्या आणि भुजबळांच्या तथाकथित वादाला एक किनार आहे. सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांचा पराभव करून आमदारकी मिळवली आहे. त्यामुळे आता भुजबळ कुटुंबीयांपैकी कोणीही नांदगाव परिसरात येऊ नये, ही कांदे यांची भूमिका असल्याचं तळागाळातील सूत्र सांगतात.

मध्यंतरी अवकाळी पावसाने, नांदगावला आलेल्या पूरस्थितीनंतर पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी नांदगावला दौरा केला. पालकमंत्री तिथे गेल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. कामाला लागली. लोकांना तातडीने मदत उपलब्ध झाली. भुजबळ आणि कुटुंबीय या भागात सक्रिय झाल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष राज्यात सत्तेत असले, तरीदेखील आपापल्या पक्षाच्या विस्ताराचा प्रत्येकाला हक्क आहे, यावर तिन्ही पक्षांचे एकमत आहे. त्यामुळे कांदे यांच्या मनात जर भुजबळांनी नांदगावात येऊ नये, अशी भावना असेल, तर ती गैरवाजवी आणि गैरलागू आहे.

त्या पूरपरिस्थिती वेळी निधी उपलब्ध होण्यासंदर्भात कांदेंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेत असलेला निधी परस्पर विकल्याचा आरोप केला होता. त्यात काहीही सत्यता नसल्याचं कळाल्यानंतर हा प्रकार पुढे वैयक्तिक पद्धतीच्या आरोपांच्या दिशेने गेला. आणि वाद चिघळला.

आमदार सुहास कांदे थेट पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर राजकीय वार करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे घडामोडी नाट्य शिवसेनेतील किंवा राष्ट्रवादीतील अन्य कोणीतरी कांदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून घडवलं असावं, असाही अंदाज राजकीय विश्‍वात लावला गेला. 

आणि पुढं यात एंट्री मारली संजय राऊतांनी…  नांदगाव मतदारसंघात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यावेळी राऊत म्हंटले, 

‘नाशिकला लाल दिवा आहे. उद्या नांदगावला लाल दिवा मिळू शकतो’, भुजबळांनी नांदगाव मतदारसंघ जिंकण्याचा विचार आता सोडून द्यावा. शिवसेनेच्या पुण्याई मुळेच भुजबळ राजकारणात टिकून आहेत असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळांना दिला होता.

यावर छगन भुजबळ भडकले, आणि त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

संजय राऊत यांनी नांदगाव मतदारसंघाबद्दल केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी बोलावं लागेल. यापुढे जिल्हा परिषद आणि इतर निवडणुका आहेत त्याला जावे की नाही हे त्यांना विचारावे लागेल. नांदगाव मध्ये मी जे काम केलं ते त्याना माहित नसावं, कारण त्यांना गल्लीपासून दिल्ली पर्यंत कामं करावी लागतात. त्यामुळे मी त्यांना आमंत्रित करतो त्यांनी या मतदार संघात परत परत यावं.

शिवसेना खासदार संजय राऊत महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. त्यांनी हे सुंदर शिल्प तयार केले आहे. त्याला तडा जाऊ नये याची काळजी शिल्पकारानेच जास्त घ्यावी, पाहुणचार देण्या-घेण्याची सवय आहे, आपली मराठी भाषा आहे. कोण कोणत्या आवजाच्या पट्टीत बोलतो हे बघितले पाहिजे. शिवसेनेत मुख्यमंत्री झालो असतो असं म्हटलं हे मान्य, मात्र कुणालाही पक्षात काम केल्याशिवाय जबाबदारी मिळत नाही. .

दोन्ही बाजूंनी घमासान सुरु आहेच. एक मात्र नक्की नाशिकच्या जनतेने कांदे-पोहे आणि खमंग चर्चा अशा वातावरणाचा आनंद घेतला असावा. कारण सध्याच्या रुक्ष काळात असे मनोरंजनाचे प्रसंग हल्ली दुर्मिळ झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.