आर्यन खान प्रकरणामुळं फेमस झालेल्या त्या क्रुझवर पुन्हा मॅटर झालाय…

२०२१ हे वर्ष सरलं. काही लोकांसाठी ते अविस्मरणीय ठरलं, तर काही लोकांना वर्ष कधी आलं आणि कधी गेलं हे कळलंच नाही. आता तुम्ही दोन्ही पैकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये असलात तरी २०२१ मध्ये झालेल्या काही घटना विसरणं अशक्य आहे. उदाहरणार्थ, टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारतानं मिळवलेलं घवघवीत यश, क्रिकेट वर्ल्डकपमध्ये निघालेली लाज आणि आर्यन खान प्रकरण. आपल्या लक्षात राहणार म्हणजे राहणार.

आर्यन खान हा शाहरुख खानचा पोरगा. त्यामुळे आधीच तो बातम्यांमध्ये असायचा. पण एका क्रुझवरच्या पार्टीमधून ड्रग्स घेतल्याच्या संशयावरुन आर्यनला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याला झाली अटक. सोशल मीडिया, टीव्ही, लोकांच्या गप्पा, वर्तमानपत्रं आणि पत्रकार परिषदा सगळीकडे एकच टॉपिक होता, तो म्हणजे आर्यन. पुढं काही दिवस आर्थर रोड जेलमध्ये काढल्यानंतर, त्याची सुटका झाली. कोर्टानं आर्यननं ड्रग्स घेतले नसल्याचं स्पष्ट केलं. पण तरीही प्रकरण गाजायचं थांबलं नाही.

आर्यननं खरं ड्रग्स घेतले का? घेतले असतील तर कुठले आणि किती? त्याच्यासोबत कोण होतं? ड्रग्स नाही घेतले तर त्याला का गंडवण्यात आलंय? असे लई प्रश्न लोकांना पडले होते. या सगळ्यासोबत आणखी एक प्रश्न होता, तो म्हणजे एवढ्या मोठ्या सुपरस्टारचं पोरगं कुठल्या क्रूझवर पार्टीला गेलेलं?

आणि ती क्रूझ सध्या काय करते?

तर आता आलेला आहे, मेन पॉईंटाचा मुद्दा. सध्या आर्यन खान बातम्यांमध्ये अजिबात नाहीये, बातम्यांमध्ये आहे ती क्रूझ. नाय, नाय क्रूझवर कुणी काय चुकीचं करताना घावलेलं नाय, तिथं एक पेशंट घावलाय ज्यानं थोड्या नाही, तर दोन हजारपेक्षा जास्त लोकांचं टेन्शन वाढवलंय. कसं ते सांगतो…

विषय असा झाला की, ही आलिशान कार्डेलिया क्रूझ मुंबईवरुन गोव्याला निघाली होती. क्रूझवर जवळपास दोन हजार प्रवासी आणि १६ क्रू मेंबर्स आहेत. नवं वर्ष सुरू झालंय, लोकं गोव्यात चाललीयेत अर्थात सेलिब्रेशनच्या मूडमध्ये; मात्र या प्रवासात माशी शिंकली. चालकांच्या ग्रुपमधला एक कार्यकर्ता कोविड पॉझिटीव्ह आढळला. साहजिकच सगळ्याच्यांचेच धाबे दणाणले. क्रूझ गोव्याच्या मोरमुगाओ पोर्टच्या जवळ आहे, पण जहाज बंदरात उतरवण्याची परवानगी मिळालेली नाही.

जोवर क्रूझवर असलेल्या प्रवाशांचे आणि क्रू मेंबर्सचे कोविड अहवाल येत नाहीत, तोवर सर्वांना क्रूझवरच थांबावं लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल, जर रिपोर्ट निगेटिव्ह आला तर निवांत क्रूझवर राहता येतंय की.

पण तसं नाहीये भिडूलोक, या क्रूझवर राहायचा खर्च सामान्य लोकांना उगं पण परवडणारा नाही. इथं एका छोट्या फॅमिलीला दोन दिवस राहायचा खर्च ४० हजारापर्यंत आहे, तर तुम्ही थोडं जास्त रहायचं ठरवलं तर खर्च जातो पाच लाखांपर्यंत. थोडक्यात काय, तर सेलिब्रेटी नसाल तर खिसा डायरेक्ट हलका होणार.

ही जहाजवाली लोकं एवढे पैसे घेतायत म्हणजे, काहीतरी भारी असणारच की. या क्रूझला एकूण ११ मजले आहेत, तर ७९६ कॅबिनेट्स. या क्रूझवर जिम आहे, सलून आहे, शॉपिंग सेंटर आहे, एवढंच नाही तर स्वतःची अकादमीदेखील आहे. समुद्र दिसेल, आकाश दिसेल अशा रुम्स आहेत. खायच्या बाबतीत तर वडापावपासून चाटपर्यंत आणि पंजाबी जेवणापासून ते जगातल्या जवळपास सगळ्या प्रकारचं जेवण इथं मिळतं.

एवढी भारी क्रूझ आणि एवढ्या भारी सुविधा असूनही चांगल्या बातम्यांमुळं चर्चेत रहाणं तेवढं हुकतंय, हे मात्र खरं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.