बहीण, आई, घर, गुरं-ढोरं आगीत खाक… ती आग प्रशासनानेच लावल्याचा तरुणाचा दावा

उत्तर प्रदेशातल्या कानपूर देहाट जिल्ह्यातल्या एका गावात माय-लेकीचा आगीत जळून मृत्यू झालाय. त्यानंतर आंदोलन उभं राहिलं, ते आंदोलन संपलं. राजकारण सुरू आहे. या बातम्या मागच्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये आपण बघतोय. त्या गावात नेमकं काय झालं होतं? आंदोलन का उभं राहिलं? आंदोलन मागे कसं घेतलं गेलं? हे प्रश्न या प्रकरणात महत्त्वाचे आहेत.

माय-लेकीचा मृत्यू कसा झाला?
उत्तर प्रदेश मधल्या कानपूर देहाट जिल्ह्यातमधल्या मडौली या गावातलं अतिक्रमण हटवण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम त्या गावात पोहोचली. ज्या जमिनीवरचं अतिक्रमण हटवायचं होतं ती जमीन ग्राम समाजाची असल्याचा दावा एका पोलिस अधिकाऱ्यांनी केलाय. पोलिस, जिल्हा प्रशासन आणि दंडाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसह यावेळी जेसीबी सुद्धा होता.

ही कारवाई सुरू असताना  दिक्षीत कुटूंबाच्या झोपडीला आग लागली आणि त्या आगीमध्ये प्रमिला दिक्षीत (वय ४४ वर्षे) आणि नेहा दिक्षीत (वय २० वर्षे) यांचा जळून मृत्यू झाला.

हा झाला त्या दिवशी नेमकं काय घडलं? याचा घटनाक्रम. त्यानंतर काय दावे करण्यात आले? ही आग कशी लागली, कोणी लावली? यासंदर्भात कोणी काय प्रतिक्रिया दिलीये हेही बघुया.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मडौली गावातल्या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की,

“सोमवारी म्हणजे १३ फेब्रुवारीला अधिकारी बुल्डोझर घेऊन आले आणि बांधकामाची मोडतोड करायला सुरूवात केली. या कारवाईबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती.”

आता त्या झोपडीला आग लागली आणि माय-लेकीचा मृत्यू झाला. या संदर्भात स्थानिक प्रशासनाचं असं म्हणणं आहे की, त्यांच्या झोपडीवर कारवाई करत असताना ती रोखण्यासाठी म्हणून या कुटूंबाने झोपडीत जाऊन दार बंद करून घेतलं. त्यानंतर काही वेळानं झोपडीतून धूर यायला लागला. त्यामुळे आम्ही हालचाल केली. यात प्रमिला दिक्षीत यांच्या मुलाला आणि पतीला वाचवण्यात आम्हाला यश आलं. पण प्रमिला आणि नेहा दिक्षीत यांचा मृत्यू झाला.

ही झाली प्रकरणाची एक बाजू, दुसरी बाजू आहे ती दिक्षीत कुटूंबियांची…
या प्रकरणात शिवम दिक्षीत हा वाचला तर, त्याच्या वडिलांना आगीचे चटके, झळ बसलीये. हे सगळं झाल्यानंतर शिवमने तक्रार दाखल केलीये. शिवमचं असं म्हणणं आहे की, आत्मदहनाचा प्रयत्नच झालेला नाही. ज्या आगीत माझ्या आईचा आणि बहिणीचा मृत्यू झालाय ती आग प्रशासनानेच लावलेली. या बाबतीत शिवम म्हणाला,

“माझे आई-वडील घरात झोपले होते. त्यांनी आम्हाला न सांगता घर पाडून पेटवून दिलं. मी कसा तरी घराबाहेर पडलो. पोलिसांनी मला पकडून मारहाण केली. ते मला जळत्या घराच्या आत ढकलण्याचा प्रयत्न करत होते. माझे वडील गंभीररित्या भाजले गेलेत, तर माझी आई आणि बहीण यांचा या आगीत मृत्यू झाला.”

शिवमच्या म्हणण्यानुसार तक्रार दाखल करण्यात आलीये,कलम ३०२ म्हणजे खून, कलम ३०७ म्हणजे खूनाचा प्रयत्न, ४३६ म्हणजे घर जाळण्याच्या उद्दिष्ट्याने आग लावणे, ४२९ म्हणजे पाळीव जनावरांना, गुराढोरांना मारणं किंवा अपंग करणं, ३२३ म्हणजे ऐच्छिक रित्या एखाद्याचं नुकसान करणं या कलमांनुसार ३९ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलीये.
आपल्या कुटूंबाकडे एकूण २० शेळ्या होत्या आणि त्यांचाही या आगीत होरपळून मृत्यी झाला असल्याचा दावा शिवमने केलाय.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंत मडौली गावातल्या गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात आंदोलनाला सुरूवात केली होती. दीक्षित कुटूंबासोबत जे घडलं ते केवळ प्रशासनामुळे घडलं आणि त्याची भरपाई प्रशासनाने करावी असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

या बाबतीत उत्तर प्रदेशचे उममुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी कुटूंबाशी चर्चा करत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.
या मागण्यांमध्ये प्रकरणाची चौकशी ही लवकरात लवकर आणि निष्पक्षपातीपणे व्हावी याशिवाय असलेल्या मागण्या म्हणजे, कुटूंबाचं झालेलं नुकसान हे मोठं असल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून १ कोटी रुपये द्यावेत, जमीन देण्यात यावी आणि कुटूंबातल्या सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्यात.

या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय.
उपमुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉलवर झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. शिवमने या भेटीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय,

“उपमुख्यमंत्र्यांनी संयमीपणे आमच्या तक्रारी आणि मागण्या ऐकून घेतल्या. आरोपींची चौकशी करून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. सरकारच्या आश्वासनावर मी समाधानी आहे आणि म्हणून आमचं विरोध आंदोलन आहोत”

आता तपास कोणत्या दिशेने सुरू राहणार?

पोलिस अधीक्षक मुर्ती यांनी या प्रकरणाचा तपास हा निष्पक्षपातीपणे होईल अशी ग्वाही देताना म्हटलंय की, अनधिकृत बांधकाम हटवण्याची मोहीम ज्यावेळी केली जाते तेव्हा संपूर्ण मोहिमेचा व्हिडीओ तयार केला जातो. या मोहिमेचा व्हिडीओ तपासला जाईल आणि मग पुढील कारवाईची दिशा ठरवण्यात येईल.

त्यामुळे, या प्रकरणातला व्हिडीओ समोर आला की त्यातून कोणतं चित्र स्पष्ट होणार हे पाहणं गरजेचं असणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.