आत्महत्या, अंधश्रद्धा, सूड की खून? भीमा नदीतल्या ७ मृतदेहांमागचं गूढ…

पुण्यातल्या दौंड तालुक्यातल्या भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातले सात मृतदेह सापडले आणि ही आत्महत्या होती असा संशय व्यक्त केला गेला. या सात जणांमध्ये दोन पुरूष, दोन महिला आणि ३ लहान मुलांचा समावेश होता. मोहन पवार, त्यांची पत्नी, मुलगी, जावई आणि तीन लहान मुलांचे मृतदेह होते.

आत्महत्या करण्यामागचं कारण काय?

तर मुलाने पळून जावून लग्न केलं म्हणून या कुटुंबातल्या लोकांनी आत्महत्या केली असा निष्कर्ष लावण्यात आला. प्राथमिक पातळीवर लावलेला हा अंदाज आता चुकीचा ठरतोय. पोलिसांच्या तपासात ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं समोर आलंय.

खरंतर, मोहन पवार यांच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसल्याचा दावा केला होता. हा खून असू शकतो असा संशयही त्यांच्याकडून व्यक्त केला गेला होता. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आणि नातेवाईकांचा संशय खरा ठरला. या ७ जणांचा खून झाला असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

ही हत्या सुद्धा पवार कुटुंबातल्या लोकांनीच केली असल्याचं वृत्त आहे.

आता प्रकरण असं आहे की, मोहन पवारांच्या चूलत भावांनी एकत्र येऊन ही हत्या केली असल्याचा संशय असल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यत घेतलंय आणि चौकशीसुद्धा सुरू आहे. या चौकशीनंतर या हत्येमागचं नक्की कारण स्पष्ट होईल. सध्या तरी सूड घ्यायचा म्हणून या हत्या करण्यात आल्या असल्याच्या चर्चा आहेत.

खून करण्यामागचं कारण काय?

या सात जणांचा खून करण्यामागं सूडाचं कारण असल्याचा अंदाज लावला जातोय. सूड कसला? तर, मोहन पवार आणि संशयित आरोपींपैकी एका व्यक्तीचा मुलगा धनंजय काही दिवसांपुर्वी दुचाकीवर बाहेर जात असताना त्यांचा अपघात झाला.

या अपघातात धनंजय गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर धनंजय वर रुग्णालयात उपचारसुद्धा सुरू होते. यात झालं असं की, धनंजयच्या घरच्यांना त्याच्या अपघाताबद्दल सांगितलं नाही. त्यात उपचार सुरू असतानाच दुर्दैवाने धनंजयचा मृत्यू झाला.

या अपघातात धनंजयचाच मृत्यू कसा झाला आणि मोहन पवार कसे वाचले ? असा प्रश्न धनंजयच्या परिवारातील लोकांच्या मनात आला. त्यातून मग, हा अपघात नसून मोहन पवार आणि त्यांच्या परिवाराने ठरवून हा घातपात घडवून आणला आणि त्याचा खून केला.

अंधश्रद्धेमुळे खून झाल्याचीही चर्चा सुरू आहे.

यात अंधश्रद्धेचा मुद्दा कुठून आला? तर धनंजयच्या मृत्यूमागे मोहन पवार आणि कुटूंबाने काळी जादू करून त्याचा खून केला असा संशय धनंजयच्या कुटूंबीयांना होता असंही बोललं जातंय. त्यामुळे, अंधश्रद्धेतून हा खून करण्यात आला असल्याचा संशयही बळावलाय.

हा खून कशाप्रकारे करण्यात आला?

गावी जाऊन येऊ असं सांगून मोहन पवार आणि कुटूंबियांना गाडीत बसवलं. गाडी नदीपात्राजवळ आल्यावर गाडी थांबवून मोहन पवार, त्यांची पत्नी, मुलगी आणि जावयाला बेशुद्ध केलं. त्यानंतर तीन मुलांसह या चौघांनाही नदीत फेकून दिलं. नदीत बुडून त्यांचा मृत्यू झालाय असं प्राथमिक तपासात समोर आलंय.

दरम्यान, फक्त बुडून त्यांचा मृत्यू झालाय की आणखीही काही कारण होतं याबाबत, पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीवरून तरी, पवार कुटूंबातल्याच लोकांनी म्हणजे मोहन पवार यांच्या चूलत भावांनीच केवळ संशय होता म्हणून सूड घेण्यासाठी हे ७ खून केले असल्याचं समोर येतंय. आता या प्रकरणात नक्की काय घडलं होतं हे पोलिस तपास पूर्ण झाल्यावरच स्पष्ट होईल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.