महाराष्ट्रातील लाल कांदा उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना मालामाल करतोय

कांदा म्हटलं की अक्ख्या देशभरात आपल्या लासलगावचं नाव घेतलं जातं. यामागचं कारण सांगण्याची गरज तशी नाही. कारण भारतातील सर्वाधिक ३३ टक्क्यांहून कांद्याचं उत्पादन एकट्या महाराष्ट्रात घेतलं जातं. आणि या कांद्यासाठी लासलगावची बाजारपेठ ही आशिया खंडातील सगळ्यात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.

परंतु लासलगाव आणि एकंदरीत महाराष्ट्रातील कांदा निव्वळ यामुळेच प्रसिद्ध नाही. तर यामागचं आणखी महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे कांद्यांमध्ये सर्वात उत्तम समजला लाल कांदा महाराष्ट्राचं सर्वात मोठं वैशिष्ठ्य आहे. पण आजपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पसंती असलेला हा लाल कांदा उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना देखील फायद्याचा ठरत आहे. 

उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील शेतकरी लाल कांद्याची लागवड करून तिप्पट नफा मिळवत आहेत.

उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड भागातील हमीरपूर आणि इत्तर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील लाल कांद्याचं उत्पादन कार्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून प्रोत्साहन दिलं जात आहे. यामुळेच २०२१ मध्ये १२५ एकर जमिनीवर सुरु झालेलं कांद्याचं उत्पादन एका वर्षातच ८००-९०० एकर जमिनीपर्यंत पोहोचलं आहे.

लाल कांद्याच्या शेतीसाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्ज, बियाणं आणि कांद्याच्या शेतीचं तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं जात आहे. त्यामुळे बुंदेलखंड विभागातील सर्व शेतकऱ्यांनी ८० हजार टन लाल कांद्याचं उत्पादन घेण्यात आलं आहे. कांद्याच्या शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ झाली आहे, पूर्वीच्या तुलनेत आता शेतकऱ्यांचं उत्पन्न तिप्पट झालं आहे असं सांगितलं जात आहे.

पण आजपर्यंत पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेश सरकार लाल कांद्याची शेती का करायला लावत आहे?

तर उत्तर प्रदेशात कांद्याचं उत्पादन फार कमी आहे. सध्या उत्तर प्रदेशात एकूण २८ हजार ५३८ हेक्टर जमिनीवर कांद्याची शेती केली जात आहे. एवढ्या क्षेत्रावरून दरवर्षी ४.७० लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. मात्र उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी १५ लाख मेट्रिक टन कांदा गरजेचा असतो. राज्यातील एकूण कांदा उत्पादनापेक्षा विक्री ही तिप्पटीहून जास्त आहे, त्यामुळे ही गरज भागवण्यासाठी उत्तर प्रदेशाला इतर राज्यांकडून कांदा खरेदी करावा लागतो.

परंतु इतर राज्यांमधून कांदा खरेदी केल्यामुळे कांद्याची किंमत वाढते तसेच वेळेवर कांदा उपलब्ध होत नाही.

यांच्यावरच तोडगा काढण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने २०२१ मध्ये राज्यात महाराष्ट्रातील लाल कांद्याच्या उत्पादन प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. कृषी तज्ज्ञांनी बुंदेलखंड विभागातील झांसी, हमीरपूर, ललितपूर, जालौन या जिल्ह्यांसोबतच गंगेच्या मैदानातील वाराणसी, जौनपूर, मिर्झापूर, कौशाम्बी, कानपुर, इटावा, कन्नौज जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या उत्पादनाठी उपयुक्त जमिनीवर अभ्यास केला.

त्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना कांद्याचं उत्पादन घेण्यासाठी एकरी १२ हजार रुपयाचं कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे. डार्क रेड, भीमा सुपर, लाईन ८८३ सारखे कांद्याचे वाण, आणि तज्ज्ञ कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं जात आहे. यातुमचं २०२१ मध्ये ५० हेक्टर आणि २०२२ मध्ये ३५० हेक्टर जमिनीवर लाल कांद्याची लागवड करण्यात आली आहे.

उत्पादनाचं प्रमाण आणि शेतकऱ्यांचा वाढणारा प्रतिसाद बघून पुढील वर्षी हेच क्षेत्र २ हजार हेक्टरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

परंतु उत्तर प्रदेशाला आवश्यक असलेल्या कांद्याची गरज पूर्ण करायची असेल तर एकूण १ लाख हेक्टर म्हणजेच अडीच लाख एकरवर कांद्याचं उत्पादन घ्यावं लागेल. सध्या उत्तर प्रदेशात जवळपास २९ हजार हेक्टर जमिनीवर कांद्याची लागवड केली जात आहे. त्यामुळे आणखी ७१ हेक्टर जमिनीवर लागवड वाढवावी लागणार आहे.

उत्तर प्रदेशपाठोपाठ इतर राज्यांमध्ये देखील कांद्याची लागवड करण्याचं प्रमाण वाढत आहे.

२०२२ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण ९ लाख ४५ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. यासोबतच गुजरात आणि मध्य प्रदेशात देखील कांद्याच्या लागवडीचं क्षेत्र वाढवण्यात आलंय. यामुळेच २०२१ च्या तुलनेत कांद्याचं उत्पादन २६६.४१ लाख टनावरून  २०२२ मध्ये  ३११,२९ लाख टन झालं आहे. महाराष्ट्रात कांद्याचं एकूण ३ हंगामांमध्ये उत्पादन घेतलं जातं त्यामुळे यात महाराष्ट्राचा वाट ३३ टक्क्याहून अधिक आहे.

पण यावर मात करून उत्तर प्रदेश सरकार स्वतःच्या राज्यातच कांद्याचं उत्पादन वाढवण्याचं लक्ष देत आहे. उत्तर प्रदेशातील जमीन ही गाळाची आणि रेताड आहे तसेच कांद्याच्या उत्पादनासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे इथे कांद्याचं उत्पन्न देखील जास्त आहे.

ज्याप्रमाणे राज्यात उसाचं उत्पन्न वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशाने बंगलोरमध्ये उसावर संशोधन केलं आणि साखरेच्या उत्पादनात देशात पहिला क्रमांक पटकावला होता. त्याचप्रकारे कांद्याच्या उत्पन्नावर देखील लक्ष देण्यात आलं तर युपी कांद्याच्या बाबतीत देखील नक्कीच समोर येईल.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.