आईला दिलेलं वचन पोरग्यानं पहिल्याच फटक्यात फौजदार होवून पुर्ण केलं.

मागच्या २ दिवसांपासून एका पोलिस अधिकाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. या फोटोत हा अधिकारी आपल्या आईला आपली पोलिसाची टोपी घालताना दिसत आहे. सोबतच त्याची काठी देखील आईच्या हातात अभिमानानं दिसत आहे आणि त्याला कॅप्शन आहे,

आनंद आनंद म्हणतात तो हाच …याहुन सुंदर ते काय… #mother

पण आपलं यश आईच्या नावे करणारा हा अधिकारी नेमका आहे तरी कोण? काय आहे या फोटोमागची सक्सेस स्टोरी?

सध्या काय करतो ? MPSC,UPSC.

गेल्या चार पाच वर्षात महाराष्ट्राच्या तरुणांमध्ये सर्वात मोठा बदल कोणता बदल झाला असेल तर दिसेल तो मुलगा मुलगी MPSC, UPSC करू लागला. हा ट्रेंड गावागावात रुजला. अभ्यास करायचा, पोस्ट काढायची, आयबापाचं नाव झळकवायचं हे स्वप्न घेवून हजारो पोरं पुण्यात येवू लागली.

कधीकाळी सामाजिक क्रांतीच पुणं आणि खासकरून त्यातल्या पेठा या MPSC, UPSC वाल्यांचा माहेरघर बनल्या.

याच माहेरघरात इतरांसारखा हा पोरगा पण आला, याच नाव सचिनकुमार विठ्ठल तरडे.

मूळचा माळशिरस तालुक्याचा. घरी शेती, पण सगळी कोरडवाहू. कधी तरी ज्वारी, बाजरीचं पीकं. त्यामुळे पोरानं शिक्षणात लक्ष घातलं. नॉर्मली पोरं MPSC कडे वळल्यावर लोकसत्ता वगैरे हातात घेतात, पण सचिन मात्र लहानपणापासून पेपर हातात होता म्हणून शाळेच्या वयातच MPSC कडे वळला.

कमी वयात निर्णय घेतल्याचा फायदा होतो.

बाकी कोणाचं माहित नाही, पण विश्वास नांगरे पाटलांच हे वाक्य सचिनला मात्र परफेक्ट बसतं. शाळेतचं फिक्स झालं होतं MPSC चं.

१० वी पर्यंतचं शिक्षण सदाशिराव माने विदयालय माणकीमध्ये तर अकरावी, बारावी सायन्सनं चांगल्या मार्कांनं पाणीव आणि माळशिरसमध्ये पूर्ण केली. पुढच्या शिक्षणाला आणि नियोजित MPSC करायला म्हणून तो थेट पुण्यात दाखल झाला. पहिल्या वर्षाला सायन्ससाठी सचिनचा नंबर लागला होता कडेगावमध्ये.

पण पुणे सोडायचं नाही म्हणून गाड्यानं एसपी कॉलेजला बीएला ॲडमिशन घेतलं.

आता यानंतर बेसिक प्रश्न तुम्हाला पडला असणार तो म्हणजे क्लास कोणता लावलेला? तर सांगतो, सचिननं कोणताही क्लास न लावता तयारी चालू केली. ३ वर्ष फक्त हजेरीसाठी कॉलेजला गेला, पण लेक्चर बुडवून बाहेर पर्वतीला जा, वेताळ टेकडीला जा, असं फिरण्यापेक्षा लावून धरत अभ्यास केला. आता त्याच्या अभ्यासाचे फंडे काय? हे विचारण्यात काहीच अर्थ नाही. कारण ज्याच्या त्याच्या टेक्निक वेगळे असतात.

याकाळात पैसे लागले कि घरी मागायचं. यायचे देखील. पण त्याला माहित होतं की, हे पैसे आईनं कधी मामा कडून तर कधी मावशीकडून उसने घेऊन पाठवले आहेत. त्यामुळे ते पैसे घेताना सचिनच्या समोर आईचा चेहरा यायचा.

मात्र एक दिवसं पाणाववेलेल्या डोळ्यांनी पठ्ठ्यांनं आईला शब्द दिला. जास्त दिवसं नाही लागणार आता.

कोणत्याही व्हिडीओतुन प्रेरणा घेण्यापेक्षा हिच गोष्ट सचिनची प्रेरणा होती. जसं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं तसं तसं २०१७ साली त्यानं MPSC ची कंबाईन परीक्षेची पूर्व परीक्षा दिली. ती पास झाला. सुदैवानं त्याच वर्षी PSI ची मुख्य परीक्षा झाली, तो इथून पण पुढे निघाला. याकाळात ग्राऊंडची तयारी चालूच होती.

सहकारनगरला रुमच्या शेजारी ग्राऊंडसाठी ॲकॅडमी जॉईन केली. सचिन सांगतो हा माझा पहिलाचं क्लास. पण पुस्तकी ज्ञानासाठी नव्हता. २०१८ साली मुलाखत आणि शारीरिक चाचणी परिक्षा झाली.

या दरम्यानच्या दोन वर्षाच्या काळात अर्थशास्त्र मधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करून घेतलं.

अखेरीस ८ मार्च २०१९ रोजी सचिनच्या PSI पदाचा अंतिम निकाल लागला. पहिल्याच फटक्यात आईला दिलेलं वचन पुर्ण केलं होतं. त्यानंतरच पहिल्यांदाच चार पेक्षा जास्त दिवसांसाठी तो घरी गेला. पाच वर्षात पहिल्यांदाच एखादया लग्नात उपस्थित राहिला. पुढे तब्बल १० महिन्यांनी नाशिकला ट्रेनिंगला बोलावलं.

७ जानेवारी २०२० पासून महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिकला १५ महिन्यांचं प्रशिक्षण झालं. मात्र याच काळात कोरोना पसरला. अशा वेळी सचिन सांगतो, आईच्या काळजीनं जीव कधी कधी खायला उठायचा. पण इलाज नव्हता.

पण शेवटी ३० मार्च २०२१ रोजी सचिनचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये दिक्षांत समारोह पार पडला. संचलन होऊन सेवेची शपथ घेतली. शपथेच्या दिवशीच त्याला आणखी एक आनंदाचा धक्का बसला.

ज्या माहेर घरात MPSC ची बारखडी गिरवली त्याचं पुणे शहरात सचिनला पहिलं पोस्टिंग मिळालं.

त्यानंतर तडक गावाकडं गेला. आईला बाहेर बोलावलं आणि पहिल्यांदा आपल्या डोक्यावरची टोपी सचिननं त्या माऊलीच्या डोक्यावर चढवली. सचिन सांगतो हा आईच्या कष्टाचा सन्मान होता. 

उद्याच्या ७ एप्रिल २०२० ला सीपी ऑफिसला सचीनकुमार तरडेंचं रिपोर्टिंग आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.