माझा मित्र MPSC करत होता, तेव्हा तो बुधवार पेठेत प्रेमात पडला. त्यांची हि लव्ह स्टोरी.

बुधवार पेठ, परवा काय झालं या पेठेत पोलीस घुसले. इथे असणाऱ्या गिऱ्हाईकांना रस्त्यावर बसवण्यात आलं. तोंड झाकून गिऱ्हाईक रस्त्यावर बसलेली. पोरींना कागदपत्र मागितली. ज्यांच्याकडे कागदपत्र नव्हती त्यांना सोडून जायला सांगण्यात आलं. पुढे काय झालं माहित नाही. तशा त्या मुली गेल्याच तर चार आठ दिवसांच्या सुट्टीवर जातील. पोलिसांच्या भितीमुळे चार आठ दिवस बुधवार पेठेतल्या फेऱ्या कमी होतील. त्यानंतर पुन्हा बाजार भरेल.. 

चुक की बरोबर यावर चर्चा होतील आणि विषय संपुन जाईल, पुढच्या वेळी असच कधीतरी बुधवार पेठ चर्चेत येईल आणि पुन्हा चुक बरोबरचा खेळ खेळला जाईल. पण त्या मुलींना यातलं काहीच कळत नाही. चूक की बरोबर या संकुचित विचारांच्या पलिकडे गेलेल्या असतात. 

असो, तर या घटनेनंतर आमच्या बोलभिडू कार्यकर्त्यांना एक स्टोरी आठवली, चार पाच वर्षांपुर्वीची. भिडू तेव्हा सदाशिव पेठेतल्या एका हॉस्टेलमध्ये राहून MPSC करत होता त्याने लिहलेली हि “लव्हस्टोरी” त्याच्यात शब्दात. 

आम्ही सदाशिव पेठेतल्या कुमठेकर रोडवर असणाऱ्या एका होस्टेलवर रहायचो. रुममध्ये टोटल सहा मुलं होती. मध्ये पार्टिशन आत तीन आणि बाहेर तीन. बाहेरच्या रुममधल्या मुलांचा वेगळा ग्रुप आणि आतल्या मुलांचा वेगळा ग्रुप अस चित्र होतं. नांदेडवरुन आलेला एक मुलगा तिथच रहायचा. म्हणजे तो माझ्यापण अगोदर आलेला. कोणाबरोबर बोलायचा नाही. सकाळी जायचा रात्री यायचा. दोन चार दिवस गेले की रात्रभर गायब असायचा. पण त्याच काहीच विशेष वाटतं नव्हतं. 

त्याच्याबरोबर बोलणं होतं नव्हतं पण एकदा रिझल्ट लागला आणि मला रडू आलं. रुमवर एकटाच रडत बसलेलो तेव्हा हा अचानक आला. त्याच्याकडे टू व्हिलर होती. म्हणला बाहेर जावू. त्याच्याबरोबर सगळ्यात लांबचा पल्ला म्हणून सेन्ट्रल मॉलला गेलेलो. सदाशिव पेठेतल्या मुलांना पत्रकार भवनांच्या पुढे जाणं देखील एक अॅचिव्हमेंट असते. त्या पुलावर तो आणि मी बोलत बसलो आणि त्याच दिवशी तो आपला दोस्त झाला. कुणाशीच न बोलणारा तो आपला खास दोस्त झालेला. 

पोरगा नांदेडचा होता. घरच सगळं चांगल. पण एकटक कशात तरी असायचा. आपल्याला काय करायचं म्हणून आपण विषय सोडून द्यायचो. एका गणपतीत आम्ही दोघं भटकत बुधवार पेठेच्या दिशेला गेलो. म्हणजे ABC आणि दगडुशेठ गणपती झाला की दोन चार पावलं जास्त टाकायला लागतात.

दोघांनी मुद्दामच रस्ता चुकवलेला. दगडुशेठ गणपती मंदिरापासून स्वारगेटच्या दिशेने ५-५० मीटरवर डाव्या हाताला वळलं की बोळीतून रस्ता जातो. तसे इथे तीन रस्ते होते पण एका बाजूला पोलीस चौकी असल्याने आम्ही छोट्या रस्त्यातून आत गेलेलो. लाल भडक रंगाच्या लिपस्टिक लावलेल्या, नेपाळी डोळ्यांच्या, चकमकीत कपडे घातलेल्या मुली रस्त्यावर उभा राहून खुणवत होत्या.

वातावरणात कुबट वास येत होता. एका दारात पाच, दहा, पंधरा वीस मुली. तिथच ऑनलाईन लॉटरी. कोणतरी मार खाणारा दारुडा. साध्या जुनाट वाड्यापासून ते मोठ्या RCC बिल्डींगपर्यन्त तेच ते. कोणी दारातून खुणवत होतं तर कुणी वरुन. 

पण धाडस झालं नाही. कधी एकदा इथून बाहेर पडतो अस झालेलं. मित्र मात्र मुरलेल्या माणसासारखा चालत होता. फिरुन सिटी पोस्टच्या तिथून बाहेर पडलो. तेव्हा हा दोस्त म्हणाला त्या कोपऱ्याच्या वाड्यासमोरची पाहिलीस का? मी गळपटून गेलेलो त्यामुळ काही बघावं अस वाटलं नाही. माझ्या डोक्याच वेगळच चक्र चालू होतं.

गर्दीत एखाद्या मुलीकडे वखवखलेल्या नजरेनं पाच पन्नास मुलं पाहू शकतात पण अशाच मुली आपल्याकडे पाहू लागल्या. खुणवू लागल्या तर त्यासारखी भिती दूसरी कोणतीच नसते. 

रात्री रुमवर आलो. गणपतीमुळे आमच्या रुमवर आम्ही दोघेच. रात्रभर मित्राला तेच विचारत राहिलो तर मित्र म्हणला खरी जन्नत वरती असते. उद्या बिल्डिंगच्या आत जावू दाखवतो तुला. 

रात्र झाली आणि पुन्हा तेच दूसऱ्या दिवशी आम्ही दोघं थेट बिल्डींगमध्ये होतो. जिन्यावर चढताना हमाल, काम करणारे, ऑफिसची माणसं, कॉलेजची पोरं आणि आमच्यासारखे तोंडाला रुमाल लावलेले सगळे एकमेकांना धडकत होते. त्या गर्दीत एखादा पोरींचे तुळशीबागेत जे मिळतं ते डोक्यावर पाटी घेवून प्रत्येक प्लॅटमध्ये शिरत होता. 

एका प्लॅटमध्ये आम्ही शिरलो, दारावरच एक छडी घेवून बाई बसलेली. आमच्याकड बघून पहिला ती खवळली पण मित्र मुरलेल्या माणसासारखा आत शिरला. त्याला बघताच एक मुलगी तडक आत गेली.

बाहेरच्या हॉलमध्ये छोट्यामोठ्या कपड्यात मेकअप करुन बाकड्यावर मुली बसलेल्या त्यांच्या शेजारी वेगवेगळी माणसं होतं. कोणतरी कानात बोलायचं तर कोणतरी थेट डोळ्यानं खुणवून आत घेवून जात होतं. आम्ही गेलो तेव्हा ती मुलगी आत वळली. एकदा मागं बघून तिने मित्राकडं बघितलं… 

त्या रात्री पुन्हा आम्ही गप्पा मारत बसलो, दारूला तो देखील शिवत नव्हता आणि मी पण. पण आमच्या गप्पांना रात्र पुरायची नाही.

रात्री तो म्हणला तिच नाव XYZ. बिहारची आहे. घरात खायला काही नाही म्हणून काही वर्ष कोलकत्यात धंदा केला आणि हितं आली. तिची रक्कम त्या बाहेर बसलेल्या बाईनं मोजलेली. चार पाच लाख दिलेले. त्यातले किती मध्यस्थ्याने घेतले आणि किती घरात गेले तिलापण माहित नाही. पण कलकत्यातून चार वर्षांचे पैसे फेडून ती इथं आलेली. 

तूला कस माहिती विचारल्यावर त्यांन सांगितलं. असच एकदा मित्रासोबत तिथं गेलो. धाडस करुन पुन्हा एकदा गेलो. पुढच्या वेळी धाडस करुन तिला विचारलं. पैसे दिले आणि तिच्यासोबत गेलो. आमच्यात काहीच झालं नाही, पहिल्यादिवसापासून आजतागायत.

पहिल्या वेळेस काहीच करणार नाही तर टाईम खावू नको म्हणून तिनं कॉलर धरुन मला हाकलून लावलेलं. त्यानंतर मात्र अक्का म्हणते म्हणून ती माझ्यासोबत पैसे घेवून पाच दहा मिनिट आत थांबू लागली. मी फक्त बोलायचा प्रयत्न करायचो आणि ती प्यार करतां हैं करुन शिव्या हासडायला सुरवात करायची. वेळ मिळेल तस मी जात राहिलो आणि आमचा वेळ वाढू लागला. 

नंतर काहीच नाही नुसतं बसून रहायचो. मग ओळख झाली प्रेम झालं. मग तिला इथून काढायचा प्लॅन डोक्यात खेळू लागला. रात्रनंदिवस तोच विचार करायचो. या मुली जास्तीत जास्त तुळशीबागेत येतात. तितकच त्या बाहेर पडू शकतात. बुधवार पेठेतून बाहेर जायला बंदिच असते.

गावाकडे जायचा प्रश्न नसतो कारण ते कधीच तुटलेलं असतं. इथून जायचं झालं तर जस कलकत्यातून आले तसच. नाहीतर मिळणाऱ्या शे पन्नास रुपयातून अक्काचं कर्ज फेडायचं. हे सावकारांच्या कर्जापेक्षा भयंकर असत. बर इथे आत्महत्या करायचा पर्याय नसतो. तुमच्या आजूबाजूला नेहमी कोण ना कोणतरी असाचं.

मग तिला बाहेर कस काढायचा हा विचार तो करत होता. तुळशीबागेत आल्या की तिला हळूच घेवून जायचं. पुढे त्याला कळालं अशी कोणतीच मुलगी गायब होतं नसते. प्रत्येक स्टेशनवर टिपर असतात. जागेवर फोन फिरतात आणि कुठल्याही स्टेशनवरुन मुलगी पुढच्या क्षणाला आहे तिथं आणली जाते. 

तरिही या पोरानं तिच्यापुढे एक प्लॅन करुन मांडला. त्या दिवशी त्या मुलीने याची कॉलर धरली आणि बाहेरच्या हॉलमध्ये आणलं. शिव्या दिल्या आणि हाकलून दिलं…. 

अचानक तिची ओळख अनोळखी झाली. तिला काय वाटत होतं का हा प्रश्न पण पडू लागला. संपल्यासारखा मी पण एका ब्रेकअपचा त्यौहार साजरा केला. पेपर आले आणि भानावर आलो. पण ती नजर छळते. कधी वाटलं तर तिला फक्त हॉलमध्ये बघायला जातो. इतकच यात नाटकं नाही का इतर काही नाही आवडली आणि संपलं…

त्या रात्रीनंतर विषय निघाला नाही. आज मित्र पोलिस खात्यात आहे. 1800 जणांच्या पोलीस उपनिरिक्षकच्या भरतीत तो निघाला ते पुण्यात पोस्टिंग घेणार नाही हे स्वत:शी ठरवूनच. बाकी आज ती आहे का नाही मला माहित नाही. तसही फक्त चेहरे बदलत राहतातच की.. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.