ताजमहल विकणाऱ्या “नटवरलाल” नं न्यायाधीशांना मात्र एक रुपयालाच फसवलं.

भारताच्या इतिहासात ठगांची काही कमी नाही, पण आज आम्ही तुम्हाला ज्या माणसाचा किस्सा सांगतोय तो ‘महाठग’ होता.

देशातल्या सगळ्या ठगांनी त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे एक से एक पराक्रम त्या माणसाने  करून ठेवलेत. त्याच्याबद्दल असं सांगितलं जातं की त्याने नकली सहीच्या जोरावर ३ वेळा ताजमहाल, २ वेळा लाल किल्ला आणि एकदा राष्ट्रपती भवन विकायला काढला होता.

महानायक अमिताभ बच्चनचा ‘मि. नटवर लाल’ चित्रपट जर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट अशी की हा चित्रपट याच माणसाच्या हेराफेरीच्या कारनाम्यावर आधारित होता.

आजचा किस्सा,

मिथिलेश कुमार श्रीवास्तव उर्फ ठग नटवर लालचा.  

मिथिलेश कुमार मूळचा बिहारचा. चांगला वकिली शिकल्या-सवरलेला. पण वकिलीत काही त्याचं मन लागायचं नाही. काहीतरी कुरापती करून लोकांना मूर्ख बनवण्यात या माणसाला भारी इंटरेस्ट. लोकांच्या नकली सह्या करण्यात तर त्याचा हातखंडा होता. याच जीवावर तो कुणालाही ठगू शकायचा.

नटवर लालने आपल्या उभ्या आयुष्यात ४०० पेक्षा अधिक लोकांना चुना लावला होता. लोकांना कितीतरी कोटींमध्ये गंडवलं होतं. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याच्यावर अनेक केसेस होत्या. सगळ्या प्रकरणांमध्ये मिळून त्याला जवळपास १५० वर्षांची सजा सुनावण्यात आली होती.

नटवर लाल जसा लोकांना चुना लावण्यात पटाईत होता, तसाच तो पोलिसांना गुंगारा देण्यासाठी देखील ओळखला जायचा. त्याचा असा दावा असायचा की कुठलाच तुरुंगात  त्याला १ वर्षापेक्षा अधिक काळासाठी जेरबंद केलं जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे आपल्या या दाव्याप्रमाणेच अटकेत असताना तो अनेकवेळा सात ते आठ महिन्यात जेलमधून फरार झाला होता.

सगळ्यात शेवटी पोलिसांना गुंगारा देऊन तो फरार झाला तो १९९६ साली. असं सांगतात की त्यावेळी त्याचं वय होतं ८४ वर्षे. पोलीस त्याला न्यायालयात सादर करायला घेऊन जात होते. त्यावेळी त्याच्या सोबत ३ पोलीस होते. या तिघांनाही त्याने गुंगारा दिला होता. त्यानंतर मात्र तो कधीच पोलिसांच्या हाती लागला नाही.

जीरादेई  इथला जन्म असलेला नटवर लाल मात्र स्वतःला ठग मानायचा नाही. तो आपण एक चतुर कलाकार असल्याचं सांगायचा. नटवर लाल म्हणायचा की,

“जीरादेईच्या मातीने २ महान लोकांना जन्म दिलाय. एक म्हणजे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि दुसरा मी”

नटवर लालने आपली प्रतिमा देखील रॉबिनहूड सारखी केली होती. त्याच्यामते तो श्रीमंतांना ठगायचा आणि त्यातून जे काही पैसे मिळायचे, ते तो गरिबांना वाटून द्यायचा. त्याचा अजून एक दावा असायचा की त्याने कधीच हिंसा केली नाही किंवा कुणाची हत्या केली नाही. फक्त आपल्या बोलण्याच्या चातुर्याच्या जोरावर तो लोकांना विश्वासात घ्यायचा.

नटवर लालकडे आत्मविश्वास तर इतका होता की विचारू नकात. एक किस्सा असा की एकदा न्यायालयात हजर झालेला असताना.

खुद्द न्यायाधीशांनीच त्याला विचारलं की,

“तुला हे जमतं तरी कसं..?”

त्यावर नटवर लाल न्यायाधीशांना म्हणाला,

“ जरा तुमच्याकडची १ रुपयांची नोट द्या”

न्यायाधीश साहेबांनी त्याला आपल्या खिशातली १ रुपयाची नोट काढून दिली. नटवर लालने नोट घेतली आणि आपल्या खिशात घातली अन तो न्यायालयाबाहेर जायला निघाला.

न्यालायलाबाहेर जाताना तो न्यायाधीश साहेबांना म्हणाला,

“बिलकुल अशाच पद्धतीने”

हे ही वाचा.