कोचला एन्ट्री नाकारली, म्हणून कॅप्टन धोनीनी सगळा इव्हेंटच कॅन्सल केला होता
ठिकाण- मुंबईतलं वानखेडे स्टेडियम, तारीख- २ एप्रिल २०११. लंकेच्या नुवान कुलसेखराला महेंद्रसिंह धोनीनं शानदार सिक्स मारला आणि तब्बल २८ वर्षांनी भारताचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. फक्त ग्राऊंडमध्येच नाही, तर संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण होतं. विजयाचे शिल्पकार ठरलेल्या धोनी, गंभीर आणि युवराज सिंगपासून अनुभवी सचिन तेंडुलकर, नवखा विराट कोहली असे सगळेच खेळाडू उत्साह आणि शॅम्पेनमध्ये न्हाऊन निघाले होते.
या सगळ्या सेलिब्रेशनमध्ये आणखी एक माणूस होता, ज्याच्यावर फारसा लाईट नव्हता. पण त्याला विराट कोहलीनं खांद्यावर घेतलं आणि सगळ्या स्टेडीयममध्ये पुन्हा कल्ला सुरू झाला. त्या माणसाचं नाव.. गॅरी कर्स्टन!
भारतीय टीमचा तेव्हाचा हेड कोच असणारा गॅरी कर्स्टन आजही भारतीय चाहत्यांचा लाडक्या कोचेसपैकी एक आहे. ग्रेग चॅपेलची कोचिंग कारकीर्द नकारात्मक गोष्टींमुळं चांगलीच गाजली. त्याच्यानंतर हे पद कर्स्टनकडे आलं आणि त्यानं ते गाजवलंही. त्याची दोन वर्षांची टर्म पूर्ण झाल्यावरही बीसीसीआयनं त्याला कोचपदी कायम ठेवलं. कारण होतं तोंडावर आलेला वनडे वर्ल्डकप.
कर्स्टननंही हा विश्वास सार्थ ठरवला, त्याचं मार्गदर्शन आणि खेळाडूंची मेहनत फळाला आली आणि भारतीयांचं वर्ल्डकप उचावण्याचं स्वप्न पूर्ण झालं.
कर्स्टन कोच होण्याआधी एक चांगला प्लेअरही होता. त्यानं १०१ कसोटी सामने आणि १८५ वनडे सामन्यात साऊथ आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं. तो १९९३ ते २००४ अशी ११ वर्ष क्रिकेट खेळला. चांगला ओपनिंग बॅटर म्हणून कर्स्टनचा दबदबा होता. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर त्यांनी जगभरातल्या विविध देशांमध्ये आपल्या नावानं क्रिकेट अकादमी सुरू केली.
एक कोच म्हणून कर्स्टनचे सगळ्या खेळाडूंशी चांगले संबंध होते. त्यानं नव्या आणि जुन्या खेळाडूंची मोट बांधली. कर्स्टन सोबतच धोनीची कॅप्टन म्हणून इनिंगही सुरू झाली होती. या दोघांचं ट्युनिंग अगदी परफेक्ट जुळलं आणि भारतीय टीमची हवा होऊ लागली.
धोनी तसा थंड डोक्याचा माणूस. क्रिकेटमध्ये त्याचं बऱ्यापैकी सगळ्यांशी जुळतंच. कर्स्टनच्या डोक्यावरही कायम बर्फ असायचा. त्यामुळं चॅपेलच्या वेळी झाली तशी हाणामारी कधी झाली नाही. उलट सगळा कार्यक्रम हसत खेळत असायचा.
एका शोमध्ये बोलताना, गॅरी कर्स्टननं धोनीचं लय कौतुक केलं होतं. ‘एमएस धोनी हा मी आतापर्यंत भेटलेल्या सर्वांत प्रभावी व्यक्तींपैकी एक आहे. त्याच्याकडे जबरदस्त लीडरशिप स्किल्स आहेत. धोनी सगळ्या टीमला सोबत घेऊन पुढे जातो आणि विशेष म्हणजे तो टीमशी प्रचंड एकनिष्ठ आहे,’ असं कर्स्टन म्हणाला होता.
याच दरम्यान त्यानं २०११ मध्ये झालेला एक किस्साही सांगितला. तो असा-
‘वर्ल्डकप स्पर्धेच्या आधी सगळ्या भारतीय टीमला बँगलोरमधल्या एका फ्लाईंग स्कुलनं भेट देण्यासाठी बोलवलं होतं. प्रॅक्टिसमधून एक विरंगुळा आणि टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी म्हणून सगळे प्लेअर जाण्यासाठी उत्सुक होते. त्याप्रमाणं नियोजनही करण्यात आलं. ज्या दिवशी टीम जाणार होती त्याच दिवशी सकाळी फ्लाईंग स्कुलमधून निरोप आला की, सुरक्षेच्या कारणास्तव साऊथ आफ्रिकन सदस्यांना आम्ही प्रवेश देऊ शकत नाही. त्यावेळी मी स्वतः (गॅरी कर्स्टन), पॅडी अप्टन आणि एरिक सिमन्स असे तीन साऊथ आफ्रिकन भारताच्या सपोर्ट स्टाफमध्ये होतो.’
पुढं हे धोनीला कळालं, तेव्हा त्यानं फ्लाईंग स्कुलला स्पष्ट शब्दांत सांगितलं की, ‘ही माझी लोकं आहेत. जर हे येऊ शकणार नसतील तर आमच्या टीममधला एकही जण येणार नाही.’ असं निक्षून सांगत धोनीनं तो इव्हेन्टच कॅन्सल केला आणि कर्स्टन म्हणतो त्याप्रमाणं आपण परफेक्ट टीममॅन असल्याचं दाखूवन दिलं.
हे ही वाच भिडू:
- दोघेही महान खेळाडू होते पण कॅप्टन आणि कोच म्हणून त्यांचं जमलं नाही
- धोनीअण्णाची चेन्नई सारखीच कशी बरं जिंकत्या?
- पुरंदरच्या ऋतुराज गायकवाडच्या रूपात धोनीला त्याचा दुसरा सुरेश रैना मिळालाय