दोघेही महान खेळाडू होते पण कॅप्टन आणि कोच म्हणून त्यांचं जमलं नाही…

क्रिकेटमध्ये कोच आणि त्याचं खेळाडूंशी जुळणारं चांगलं समीकरण हे आपण अनेक ठिकाणी पाहत असतो. २०११ च्या वेळी गॅरी कर्स्टन आणि महेंद्रसिंग धोनी या कोच आणि कॅप्टन जोडीने विश्वचषक जिंकवून दाखवून दिलं. कोच आणि कॅप्टन यांच्या गेम प्लॅननुसार टीम चालली तर विजय निश्तित असतो. असाच आजचा किस्सा आहे पण तो त्यावेळी संघात चाललेल्या कुरबुरी आणि त्यामुळे भारतीय संघाला झालेला तोटा याबद्दल.

कपिल देव ज्यावेळी संघाच्या कोच या पदावर आला त्यावेळी सचिन तेंडुलकर कॅप्टन होता. आता कपिल देव आणि सचिन तेंडुलकर हि महान जोडगोळी भारताला चांगल्या प्रकारे पुढे नेतील अशा आशा निर्माण झाल्या होता. त्यावेळी विश्वचषक जिंकलेला कपिल देव चांगलाच फेमस झालेला होता आणि सचिन तेंडुलकर सुद्धा तेव्हा चांगल्याच फॉर्मात होता. पण तसं घडलं नाही. 

सचिन तेंडुलकरने आपल्या प्लेयिंग इट माय वे आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केला आहे. तर तेंडुलकर लिहितो कि, मी कॅप्टन होतो तेव्हा कपिल देव आमचा कोच म्हणून आला होता. मला कपिल कडून खूप अपेक्षा होत्या. तो भारताकडून खेळलेला खूप मोठा खेळाडू होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मात्र कपिलने माझी निराशा केली होती.

कोच म्हणजे सगळ्या संघाची जबाबदारी आणि चुकीच्या घडणाऱ्या गोष्टींवर मार्ग काढणे. संघाची रणनीती आखण्यात मदत करणे. पण इथं कपिल देव सचिनला टाळू लागला होता. जेव्हा महत्वाचे निर्णय घ्यायचे असत तेव्हा कपिल देव सचिनला चर्चेत सामील करत नसायचा. कपिल कडे पाहून कायम वाटत असायचं कि तो सचिनला पर्याय म्हणून खेळाडू शोधतो आहे. 

पण जेव्हा सचिन कर्णधार म्हणून खेळाडूंसोबत मैदानात उतरत असे तेव्हा तो परत एक नवीन स्ट्रॅटर्जी बनवत असे आणि गेम पुढे चालवत असे. १९९७ साली शारजाह मैदानावर सामना सुरु होता. तेव्हा सचिनने रॉबिन सिंगला तिसऱ्या नंबरवर बॅटिंगसाठी पाठवलं. पण तो तिथे सपशेल अपयशी ठरला. मॅच संपल्यावर त्याला प्रचंड टीका सहन करावी लागली आणि सचिनलासुद्धा बरेच सल्ले दिले गेले.

१४ डिसेंबरच्या पाकिस्तान विरुद्धच्या एका मॅचमध्ये सचिनच्या मनासारखं काहीच घडत नव्हतं. निवड समितीने त्याला ४ नंबरवर खेळायला सांगितलं होतं, कपिल देव मात्र महत्वाच्या चर्चा करताना सचिनला विश्वासात घेत नसे आणि सचिन सुद्धा कपिल देव सोबत चर्चा करताना रस दाखवत नसे. या दोघांच्या कुरबुरीमुळे संघाचं नियंत्रण कोलमडलं जात होतं. 

नवजोत सिंग सिद्धू आणि सौरव गांगुली ओपनर म्हणून खेळत होते, ३ नंबरवर पुन्हा सचिनने रॉबिन सिंगला पाठवलं. मागच्या वेळी अनेक सल्ले सचिनला मिळाले होते कि स्वतः सचिन ३ नंबरवर खेळला पाहिजे पण वरून आदेश आल्याने सचिन चार नंबरवर खेळत होता.

पाकिस्तानी स्पिन बॉलरविरुद्ध रॉबिन सिंग चांगला खेळू शकतो हे सचिनला माहिती होतं  म्हणून त्याने सिद्धू बाद झाल्यावर पुन्हा रॉबिनलाच पाठवलं. त्याने दोन तीन मोठे शॉट मारले आणि तो लगेचच बाद झाला. भारताचा पराभव झाल्यावर या निर्णयासाठी परत एकदा सचिनला ग्राह्य धरलं गेलं. 

कपिल देव आणि सचिनची अंतर्गत फाईट इतर खेळाडूंना जाणवू लागली होती. असेच निर्णय घेतले तर प्रभाव निश्तित होता. कपिल देवने सचिनला चांगलंच अडचणीत आणलं होतं.

कपिलचे सल्ले सचिन ऐकत नव्हता आणि सचिनचे निर्णय कपिलला पटणारे नव्हते. या वादामुळे जिथं असे दोन दिग्गज खेळाडू संघात होते तेव्हा भारताने मोठी मजल मारायला हवी होती तिथं मात्र भारतीय संघ वादात आणि कुरबुरीत अडकून पडला.

याचा मोठा तोटा भारताला झाला होता. पुढे कोच बदल, कॅप्टन बदल झाल्यावर सचिन फक्त खेळाडू म्हणून खेळत राहिला आणि सौरव कॅप्टन झाला. आज कोच आणि कॅप्टन यांचं एकमत असेल तर संघ व्यवस्थित असतो असं मानलं जात मात्र तेव्हा सचिन कपिल वादामुळे खेळाडू सुद्धा वैतागले होते. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.