राजकीय पुढाऱ्यांनी विरोध केला तरी यशवंतरावांनी एस.टी. महामंडळ सुरु करुन दाखवलंच
मागच्या महिनाभरापासून एसटीचे कर्मचारी संपावर गेले आहेत. संपाची पार्श्वभूमी पाहता सरकार आपल्या हेक्यावर ठाम होतं तर कर्मचारीही आपल्या मागण्यांच्या पूर्ततेवर अढळ होते. एकतर ‘शेंडी तुटो की पारंबी’ अशा दृढ निश्चयाने ते निर्वाणीच्या युद्धात उतरले होते. तळहातावर शीर घेऊन रणात उतरलेले हे उपाशी जीव मरणाच्या तयारीनेच पुढे सरसावल्याचा प्रत्यय आला.
पण आज जे एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन सुरू आहे त्या एसटी महामंडळाला फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आज जी एसटी आहे ती फक्त यशवंतराव चव्हाण यांच्यामुळचं.
एसटी अशी अस्तित्वात आली…
सार्वजनिक प्रवासी वाहनाची सुरुवात महाराष्ट्रात १९३२ पासून म्हणजे ब्रिटिश काळात झाली. ही खाजगी वाहतूकच होती. पुढं काही वर्षांनी या वाहतुकीचे नियम व कायदे करण्यात आले. १९४७ मध्ये ब्रिटिश राजवट संपली आणि भारतात प्रांतरचना अस्तित्वात आली. मुंबई, मद्रास अशी ही प्रांतरचना होती.
१९४८ मध्ये मुंबई स्टेट रोड कॉर्पोरेशन नावाची सरकारी कंपनी प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन करण्यात आली. प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा एकाधिकार या कंपनीला देण्यात आला.
बीएसआरटीसीची पहिली बस १ जून १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. ही कंपनी सुद्धा खाजगी व्यवसायिकांद्वारे चालवली जायची. त्यावेळी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर.
मद्रासमध्ये अशीच प्रवासी वाहतूक सुरू होती. तिथं डी.डी. साठे या अधिकाऱ्याने अवघ्या एका वर्षात संपूर्ण नागरी परिवहनाचे राष्ट्रीयीकरण केल होत.
तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी डी. डी. साठेंना असच राष्ट्रीयीकरण महाराष्ट्रात व्हावं म्हणून मद्रासहून मुंबईत आणले. साठेंनी राज्य परिवहन अधिकारी आणि मोटार वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यभार स्वीकारला. साहजिकच ते विभागीय परिवहन कार्यालयाचा प्रमुख होते. पेट्रोल व सुट्या भागांचे वितरण इत्यादीवर त्यांच नियंत्रण होते.
त्यांनी मद्रास प्रांतात जस प्रवासी वाहतुकीचा राष्ट्रीयीकरण केलं होत अगदी तसंच प्रवासी रस्ते, परिवहन आणि बेस्ट (बी.इ.एस.टी) यांच राष्ट्रीयीकरण करण्याची योजना आखली.
या योजनेला बऱ्याच जणांकडून विरोध झाला. बस मालकांकडून तसेच राजकीय पुढाऱ्यांकडून विरोध होऊ लागला. काही ऑपरेटर्स आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या संमतीने काही ठरावीक रस्ते घेऊ नयेत किंवा ते लांबणीवर टाकावेत अशा प्रकारचे अर्ज घेऊन बाळासाहेब खेरांना भेटले.
त्या वेळी साठेंनी ते रस्ते का निवडले त्याचे स्पष्टीकरण खेरांना द्यावं लागलं. त्यांना मोरारजी देसाई आणि श्री. बाळासाहेब खेर यांच्याकडून अनेक बाबींसंबंधी सतत सल्ला घ्यावा लागे.
या काळात, यशवंतराव चव्हाण मोरारजी देसाई यांचे संसदीय सचिव होते. आणि वाहतूक विभाग त्यांच्या नियंत्रणात होता. या काळात संबंधित बाबीवर त्यांना यशवंतराव चव्हाणांनी मदत केली. साठेंच्या राष्ट्रीयीकरणाच्या पद्धतीचे त्या वेळी चव्हाणांनी समर्थन केलं. साठे ३० वर्षांचे तरुण होते. यशवंतराव त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. चव्हाणांनी मोरारजी भाईंना साठेंचा उद्देश नीट पटवून सांगितला. त्या वेळी यशवंतरावजींनी आपल्या विनोदी शैलीत साठेंना पाठिंबा देताना म्हंटले की,
आपण दुसरे रस्ते निवडले असते तरीही ऑपरेटर्सनी विरोधच केला असता. कारण विरोधाला अंत नसतो.
१ जून १९४८ रोजी ही योजना कार्यान्वित करण्यात आली व १९५३ च्या सुमारास संपूर्ण प्रवासी परिवहनाचे राष्ट्रीयीकरण झाले.
तद्नंतर पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निजाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्यामुळे या आधीच्या वाहतूक कंपन्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एमएसआरटीसी कंपनीत विलीन करण्यात आल्या.
अशी हि सर्वांच्या जिव्हाळ्याची येष्टी यशवंतराव चव्हाणांच्या प्रयत्नामुळे अस्तित्वात आली.
हे ही वाच भिडू:
- बाहेरगावी शिकणाऱ्या पोरांना घरचा डब्बा एसटीमुळे मिळू लागला. कारण ठरले वसंतदादा !
- एसटी आंदोलनाचा नक्की काय राडा झालाय?
- मोहितेंनी फक्त २३ वर्षांच्या पोराला महामंडळावर घेतलं आणि त्याने गावोगावी एसटी पोहचवली..