तीन लाख लोकांची कत्तल करणारा इराणचा सम्राट जेव्हा थोरल्या छत्रपतींचे नाव ऐकताच पळून गेला..

इराण चा शाह आणि अफशारीद साम्राज्याचा संस्थापक तहमस कुलीखान उर्फ नादिरशहा हा हिंदुस्थान वर १७३८ साली चालून आला. पूर्वेकडील ऑट्टोमन साम्राज्य इतर युद्धात गुंतलेले होते. हिंदुस्थान मधील मोगल सत्ता औरंगजेबाच्या अधिपत्याखालील मोगल साम्राज्यापेक्षा क्षीण झालेली होती. याचा फायदा घेत नादीरशाह हिंदुस्थान कडे वळला.

पण नादिरशहा स्वयंप्रेरणेने आलेला नसून, हिंदुस्थान वर आक्रमण करण्याची प्रेरणा त्याला भारतातीलच काही मौलवींनी दिली.

तसेच मोगल दरबारातील काही कडव्या इस्लामी अमीर, उमरावांनी “हिंदुस्थान चा कारभार दख्खनेतल्या हिंदू राजा शाहूकडे गेला असून बादशहाची बाद्शाहत फक्त दिल्लीपुरती उरली आहे. इतर सर्व प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आहे किंवा त्या प्रदेशात युद्ध चालू आहेत. आपण येऊन पुन्हा इस्लामी पातशाही हिंदुस्थानात स्थापन करावी” या आशयाची पत्रे नादिरशहाला लिहून बोलावणे धाडले.

हा केवळ एक युद्धाचा, राज्यविस्ताराचा भाग नव्हे तर हा जिहाद आहे अशी घोषणा त्यावेळेस काही धर्मगुरूंनी केली.

कंदहार जिंकून पुढे सरकत नादिरशहा ने गझनी, काबूल, पेशावर पंजाब आणि लाहोर सुद्धा जिंकले. १७३८ साल संपायच्या काही दिवस अगोदरच त्याने सिंधू ओलांडली. इकडे मोगल बादशाह मुहम्मद शाह ला नादीर येत असल्याची बातमी कळली. त्याने मोगल सेना एकत्र करून नादीरशाह विरुद्ध पाठवली. तसेच छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा त्याने तातडीचा निरोप पाठवला.

२४ फेब्रुवारी १७३९ रोजी मोगल आणि नादिरशहा यांच्यात कर्नाल येथे मोठे युद्ध झाले. त्यात मोगलांचा मोठा पराभव झाला. सुमारे २०,००० मोगल सैन्य मारले गेले आणि जिवंत सापडलेल्या सैन्याचे हालहाल करून अत्यन्त क्रूरतेने त्यांना मारण्यात आले असे लोक सुमारे १५००० होते. नादीर सैन्यासह दिल्लीसमोर उभा ठाकला. बादशाह मुहम्मद शाह ने शरणागती पत्करली आणि दिल्ली नादीर शाह च्या हवाली केली .

नादीर च्या सैन्याने दिल्ली आणि उत्तर हिंदुस्तानात हैदोस घालत सुमारे २ लाख लोकांच्या कत्तली केल्या. अनेक स्त्रिया गुलाम म्हणून ताब्यात घेतल्या. अनेक शहरे जाळली, मंदिरे जमीनदोस्त केली. दरम्यान नादीरशाह ने मोठा दरबार भरवत स्वतःला हिंदुस्थान चा बादशाह घोषित केले. नादिर शाहला हिंदुस्थानात बोलवणाऱ्यांनी त्याला मराठ्यांच्या राजधानीवर म्हणजे साताऱ्यावर चालून जाण्याचे आणि छत्रपती शाहूंना संपवण्याचे सल्ले दिले.

छत्रपती शाहू स्वतः युद्धभूमीवर मिरज ला तळ ठोकून कर्नाटक स्वारीचे नेतृत्व करत होते.

बादशहाचे पत्र हातात पडताच कर्नाटक मोहीम रघुजी भोसल्यांकडे सोपवून त्यांनी साताऱ्याला कूच केले आणि बाजीराव पेशव्यांना नादिरशहा विरुद्ध लढण्यासाठी उत्तरेस पाठवले. इकडे उत्तरेत स्थिती बिकट होऊन सगळीकडे हलकल्लोळ माजला होता. नादीर असेपर्यंत म्हणजे सुमारे ५० दिवस सर्व व्यापार, व्यवहार ठप्प झाले. नादीर दक्षिणेत उतरणार या बातमीमुळे मंदिरांमधील देव सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. प्रजेला सतर्कतेचे इशारे दिले गेले.

चंबळ च्या उत्तरेस पोचून नादिरशहा ला तिथेच गाठण्याचा बाजीरावांचा मानस होता. जेणेकरून नादिरशहा माळव्यात शिरू शकणार नाही.

मराठा आणि मोगल हेरांनी उत्तरेत अफ़वा पेरल्या कि शाहूंनी पूर्व,पश्चिम आणि दक्षिणेतून एकत्रित २ लाखांची फौज बाजीरावांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या रक्षणास पाठवली. या बातमीचा योग्य तो परिणाम होऊन नादिरशहा मराठ्यांच्या भीतीने दिल्ली सोडून इराण ला ५ मे १७३९ ला निघाला.

जाण्यापूर्वी २५ एप्रिल ला त्याने दिल्लीहून शाहू छत्रपती आणि बाजीराव यांना पत्रे लिहिली ज्यात “हिंदुस्थान चा कारभार चालवण्यास हिंदुपती शाहूच योग्य व्यक्ती आहेत. मोहम्मद शाह याला पुन्हा बादशाह नेमले आहे त्यांचे साथीने कारभार चालवावा” असे लिहिले होते.

अहमदशाह अब्दालीचा गुरु असलेला नादिरशहा हा अब्दाली पेक्षा क्रूर, विक्षिप्त आणि जिहादी प्रेरणेने भारलेला कडवा राजा होता. जर नादिरशहा बादशाह म्हणून हिंदुस्थानात स्थिरावला असता आणि दक्खनेत जाऊन त्याने मराठ्यांचा पराभव केला असता तर नादिरशहा च्या कडव्या विचारसरणीने हिंदुस्थानचे इस्लामीकरण नक्कीच झाले असते. मराठे जर उत्तरेत गेले नसते, तर संपूर्ण उत्तर हिंदुस्थान नादिरशहा किंवा अब्दाली अशा धर्मवेड्या प्रवृत्तींच्या हाती गेला असता. एक असे पानिपतचे युद्ध.. जे कधीच घडले नाही.

छत्रपती शाहू – बाजीराव यांनी नुसता देशच नव्हे तर धर्म सुद्धा वाचवला. भारतातल्या मुघल सत्तेचे संरक्षक बनून त्यांनी ‘राष्ट्रधर्मा’ ची निर्मिती केली. ‘राष्ट्रप्रथम’ ही शिकवण देणाऱ्या आपल्या पराक्रमी आजोबांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा थोरल्या शाहू छत्रपतींनी समर्थपणे चालवला.

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.