छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीचा तख्त जिंकण्याची प्रतिज्ञा केली होती..

शिवाजी महाराजांनी दिल्ली जिंकण्याची प्रतिज्ञा केली होती.

अतिशय महत्वकांक्षी गोष्ट.. दिल्लीच्या तख्तावर बसून संपूर्ण हिंदुस्थानाचा कारभार हाकण्याचा मनसुबा.. दिल्लीपती छत्रपती शिवराय.. शिवरायांच्या आयुष्यात हा प्रचंड मोठा विजय ठरला असता.

या दिल्ली स्वारीची एक झलक आपल्याला कर्नाटक स्वारीमधून सहज दिसते. शिवाजी महाराज दक्षिणेत उतरले ते एक सम्राट म्हणून. सार्वभौम चक्रवर्ती राजा म्हणून. राज्याभिषेकानंतर महाराजांनी काढलेली ही पहिलीच मोहीम.

याचे स्वरूप अतिशय भव्य होते. या स्वारीत महाराजांच्या फौजेत 20,000 घोडदळ आणि 40,000 पायदळ सैन्य होते. हा आकडा किती खरा-किती खोटा माहीत नाही. पण यावरून आपल्याला शिवरायांच्या फौजेची भव्यता सहजपणे दिसून येते.

याच स्वारीचे वर्णन इंग्रजांनी ‘तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले’ या शब्दात केले आहे.

इसवी सन 1678 साली मुंबईवरून इंग्रजांनी एक पत्र लिहिले. त्यात इंग्रज अधिकारी म्हणतो,

“शिवाजी सध्या बंकापूर नजीक आला आहे. आल्या आल्या आपल्या पक्ष्यासारख्या भरारणाऱ्या सैनिकांच्या सहाय्याने त्याने हां हां म्हणत सारा मुलुख काबीज केला. राजा जयसिंगाच्या स्वाधिन केलेले 23 दुर्गम किल्ले 8 महिन्यांच्या आत त्याने परत जिंकून घेतले. विजापूर काबीज करून पुढे दिल्लीवर चाल करून औरंगजेबाला दिल्लीत कोंडून ठेवीपर्यंत आपले खड्ग म्यान करणार नाही, अशी या राजाने आपल्या देवाजवळ प्रतिज्ञा केली आहे.”

या पत्रात दिलेली बातमी अतिशय स्पष्ट आहे. इंग्रज इतिहासकारांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची तुलना सिकंदर आणि सीझर सोबत केली होती. त्यांच्या मते शिवाजी महाराजांना संपूर्ण देशावर आपले नियंत्रण हवे होते. सन 1677-78 पर्यंत संपूर्ण दख्खनेवर त्यांचेच वर्चस्व प्रस्थापित झाले होते.

हे काय कमी होते, की शिवाजी महाराजांनी दिल्लीवरच चालून जाण्याची प्रतिज्ञा घेतली. ही अतिशय महत्वकांक्षी योजना होती.

एवढेच कशाला, सन 1678 याच वर्षी लंडनला लिहिलेल्या पत्रात इंग्रज अधिकारी म्हणतात,

“एखाद्या चमत्काराप्रमाणे शिवाजी अजूनही विजयामागून विजय मिळवीत चालला आहे. हिंदुस्थानातील आणि दक्षिणेतील प्रबळ राजांवर तर त्याने विजय मिळवलाच आहे आणि पुढे सुद्धा हे घडत राहील, अशीच आम्हाला भीती वाटते.”

अनेक इतिहास अभ्यासकांच्या मते इंग्रजांनी ही हकीकत ऐकीव माहितीवर लिहिली आहे. पण ही गोष्ट तथ्यहीन नाही हे नक्की. यातून शिवरायांचे स्वराज्यविस्ताराचे गहिरे उद्दिष्ट आपल्याला दिसून येते.

दक्षिणेच्या स्वारीत शिवरायांना प्रचंड मोठे यश लाभले. त्यांचा सर्वत्र विजय होत होता. शिवाजी महाराजांचा आत्मविश्वास सुद्धा प्रचंड वाढला होता. दक्षिणेत जर आपल्याला विजय मिळत असेल तर उत्तरेत सुद्धा आपले वर्चस्व असायला हवे, हेच महाराजांना सतत वाटत असावे. आग्राभेटीत औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कैदेत ठेवले होते. याचा बदला घ्यावा, औरंगजेबाला दिल्लीतच कोंडून ठेवावे, अशी इच्छा महाराजांच्या मनात येणे साहजिक आहे.

या सर्व गोष्टींमधून एक मात्र जाणवते. जर हा मराठा राजा खरोखरच दिल्लीवर चालून गेला असता, तर त्या शत्रूप्रदेशातूनही या राजाला चांगला भरीव पाठींबा मिळाला असता आणि जादुई यशसुद्धा महाराजांच्या पदरी पडले असते.

पण शिवरायांच्या अकस्मात निधनामुळे हे स्वप्न अपूर्णच राहिले.

अनेक परकीय अभ्यासकांच्या मते,

‘शिवाजी महाराज दिल्लीवर चालून गेले असते तर ती त्यांच्या आयुष्यातील फार मोठी चूक ठरली असती’

पण हे शिवरायांच्या सामर्थ्याचे अवमूल्यन करणारे मत आहे, असेच म्हणावे लागेल.

इसवी सन 1670-71 पासूनच मराठ्यांच्या फौजा मुघलांशी उघड्या मैदानावर तोंड देत होत्या. मराठे फार मोठ्या प्रमाणात विजयी होत होते. साल्हेरच्या पायथ्याला झालेल्या लढाईत पन्नास हजारांपेक्षा जास्त मराठ्यांनी मुघलांच्या सेनेशी उघड्या मैदानावर युद्ध केले होते. विशेष म्हणजे, या युद्धात मराठ्यांचा फार मोठा विजय झालेला. मराठे अतिशय प्रबळ झाले होते. छोट्या-मोठ्या चकमकी सोडल्या तर दक्षिणेत सुद्धा शिवाजी महाराजांना म्हणावा तसा विरोध कुणी करण्याची हिंमत सुद्धा दाखवली नाही.

पुढे शिवरायांचे स्वप्न त्यांचे नातू हिंदुस्थानाधिपती थोरल्या शाहू छत्रपतींनी पूर्ण केले.

  • भिडू केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.