काटेंना उमेदवारी, कलाटेंची नाराजी, मनधरणीचे प्रयत्न… चिंचवड विधानसभेत काय सुरू आहे?

चिंचवड विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक लागलीये. या निवडणुकीमध्ये पुढे काय होणार असा प्रश्न होता कारण, आतापर्यंत महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला नव्हता. त्यात राज ठाकरे यांनी एक पत्र लिहीत महाविकास आघाडीला उमेदवार न देण्याबाबत विनंती केली होती. त्यामुळे, महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला जाणार का? दिली गेली तर कुणाला दिली जाणार हे चित्र स्पष्ट नव्हतं.

आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यामुळे चिंचवड विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक लागली आहे. भाजपकडून लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिलीये. त्यामुळे, चिंचवड मतदार संघात आता जगताप विरूद्ध काटे अशी लढत होणार आहे.

नाना काटे कोण आहेत?

विठ्ठल कृष्णाजी काटे उर्फ नाना काटे. नाना काटे हे राष्ट्रवादीचे अतिशय निष्ठावंत समजले जातात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ते राष्ट्रवादीचा एक बुलंद आवाज म्हणून ओळखले जातात. आता त्यांना महाविकास आघाडीकडून पोटनिवडणुकीचं तिकीट देण्यात आलंय.

२००७ साली काटे पिंपरी चिंचवडमधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१७ साली नाना काटे व त्यांच्या पत्नी हे दोघेही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून निवडून आले होते. त्यावेळी ४ पती पत्नींनी निवडणूक लढवली होती त्यापैकी फक्त काटे जोडपंच निवडून आलं होतं. त्यामुळे, पिंपरी चिंचवडमध्ये काटेंची असलेली ताकद लक्षात येते.

२०१९ साली काटेंना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचं विरोधी पक्षनेते पद सुद्धा देण्यात आलं होतं.

राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत नाराजी देखील झालीये.

या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून १०-१२ उमेदवार इच्छूक होते असं बोललं जातंय. दरम्यान, या सगळ्यांशी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी बंद दाराआड चर्चा केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी बराच वेळ घेऊन मग उमेदवार जाहीर केलाय.

दरम्यान, सर्व १० ते १२ इच्छूक हे आमच्या सोबतच आहेत आणि आम्ही एकत्र निवडणूक लढवून जिंकून येऊ असं म्हटलंय. पण, नाराजी आहे ती राहूल कलाटेंच्या मनात. आता राहूल कलाटे कोण? तर, २०१९ साली त्यांनी राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती.

२०१९ साली शिवसेनेचे नगरसेवक असताना बंड करून राष्ट्रवादीमध्ये येत त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपच्या जगतापांविरूद्ध निवडणूक लढवताना त्यांनी एक लाख बारा हजार मतं मिळवली होती. त्यामुळे, जगतापांसमोर इतकी मतं मिळवली असल्यामुळे आता पोटनिवडणुकीत त्यांना तिकीट मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता आणि त्यांनाही तशीच अपेक्षा होती.

कलाटे यांना तिकीट का मिळालं नाही?

राहूल कलाटे हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले आहेत. ते मूळचे शिवसेनेचे नाहीत. त्यामुळे, त्यांना तिकीट दिलं जाऊ नये असं स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे कलाटेंना तिकीट दिल्यास स्थानिक पातळीवरील कार्यकर्ता नाराज होईल आणि संघटना कमकुवत होईल अशी चर्चा होती.

या सगळ्याचा विचार करता कलाटे यांना उमेदवारी न देता काटेंना संधी देण्यात आली.

त्याचा परिणाम असा झालाय की, कलाटे यांनी बंड करण्याची तयारी केलीये. आता राष्ट्रवादीकडून कलाटेंच्या मनधरणीचे प्रयत्नही सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी आमदार सुनिल शेळके यांनी कलाटेंची भेटही घेतलीये. दरम्यान, कलाटे यांची नाराजी दूर झाली आहे का? याबाबत अजून तरी स्पष्टता नाही.

या सगळ्यात कलाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला तर, २०१९ साली एक लाख बारा हजार मतं मिळवणारे कलाटे हे निवडणुकीचा निकाल बदवलू शकतील असंही बोललं जातंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.