गुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून यायचा, त्याचं काय झालं माहितीये का ?

भाजप १५६, काँग्रेस १७, आप ५ आणि अपक्ष ४. गुजरात निवडणुकीच्या निकालाची ही आकडेवारी तुम्ही वाचली असेल, कोण कशामुळं हरलं आणि कोण कशामुळं जिंकलं याच्या विश्लेषणाचा ढीग बघितला असेल. पण या सगळ्यात एक बातमी तुमच्याकडून सुटली असेल…

गुजरातमध्ये समाजवादी पक्षाचा एक आमदार निवडून आलाय आणि राष्ट्रवादीची पाटी यंदा कोरी राहिलीये.

२०१२ मध्ये राष्ट्रवादीचे २ आमदार निवडून आले होते, तर २०१७ मध्ये १ आमदार निवडून आला होता. या दोन्ही निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या आमदाराचं नाव होतं, कुतियानाचे कांधल जडेजा.

या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं युती केली. त्यामुळं कुतियानामधून कांधल जडेजा यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळं त्यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवली.

आता कांधल जडेजा यांचा इतिहास बघायचा झाला तर, त्यांनी सलग तिसऱ्यांदा कुतियानाची जागा जिंकली आहे. पक्ष कुठला यापलीकडे कांधल जडेजा यांची वैयक्तिक ताकद या मतदारसंघात महत्त्वाची आहे. राष्ट्रवादीकडून निवडून आले असले तरी त्यांनी राज्यसभा आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या विरोधात मतदान केलं होतं. 

दबंग नेता अशी ओळख असणारे जडेजा यावेळी भाजपमध्ये जातील असा अंदाज वर्तवला जात होता, मात्र त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि ६० हजार ७४४ मतं मिळवत त्यांनी विजय मिळवलाय.

पण पक्षाच्या विरोधात मतदान केलं, निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलला, तरीही कांधल जडेजा निवडून आले याचं कारण म्हणजे 

त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा आणि विशेषत: आई संतोकबेन यांचा इतिहास.

संतोकबेन जडेजा यांना सगळं पोरबंदर गॉडमदर या नावानं ओळखायचं. संतोकबेन यांचे पती सरमन मुंजा जडेजा हे एक साधारण मिल कामगार होते. एकदा मिल कामगारांचा संप झाला तेव्हा हा संप तोडण्यासाठी मिलच्या मालकाने स्थानिक गँगस्टर देवू वाघेर याला बोलवून घेतलं.

सरमन जडेजाने थेट त्या गँगस्टरलाच मारून टाकलं आणि इथून त्याचा शहराचा नवा डॉन बनण्याचा प्रवास सुरु झाला.

आसपासचा सगळा परिसर सरमन जडेजाच्या नावाने थरथर कापायचा तर दुसरीकडे संतोकबेन जडेजा या काहीच फरक न पडल्यासारखं वागायच्या, त्या एक साध्या गृहिणी होत्या.

१९८६ मध्ये स्वाध्याय चळवळीमुळं सरमननं अंतर्गत गुन्हेगारीचा मार्ग सोडला आणि इमानदारीनं काम करायला सुरुवात केली. पण आधीच सरमनने इतका बाजार उठवून ठेवलेला की त्याच्या दुष्मनांनी त्याला एकट्यात गाठलं आणि गोळ्या घालून त्याची हत्या केली.

सोबतच संतोकबेन आणि त्यांच्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. मुलाबाळांच्या संरक्षणासाठी संतोकबेन यांनी पलटवार करायचं ठरवलं आणि पतीला मारणाऱ्या खुन्यांचा बदला घेण्याचा निश्चय केला.

संतोकबेननी हत्यार उचललं आणि आपल्या पतीची जुनी गँग एकत्र केली. काही काळातच त्यांच्या नावाची दहशत शहरभर पसरू लागली. बदल्याच्या भावनेने पिसाळलेल्या संतोक बेनने आपल्या गँगच्या मदतीने पतीला मारणाऱ्या चौदा जणांच्याही हत्या केल्या.

या घटनेमुळे सगळीकडे संतोकबेनच्या नावाचा टेरर पसरला. याच लेडी गँगस्टरच्या इमेजवर १९८९ साली संतोकबेन यांनी निवडणूकीत उडी घेतली आणि जिंकल्यासुद्धा. पोरबंदर जिल्ह्यातून जिंकून येणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या.

संतोक बेनना पहिल्यांदा अटक करणाऱ्या पोलीस ऑफिसरचं नाव होतं सतीश शर्मा. एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी अनेक खुलासे केले होते. खंडणी असो किंवा मर्डर असो, तस्करी असो किंवा वसुली असो सगळ्या क्षेत्रात संतोक बेनचा दबदबा होता.

एवढंच नाही तर पोरबंदर मध्ये होणाऱ्या रियल इस्टेट बिझनेस आणि ट्रान्सपोर्टेशनवर त्यांनी आपली पकड बसवली होती.

हेच कारण होतं की राजकारणात आल्यावर त्यांना समर्थन मिळालं. पण ९० च्या दशकात संतोकबेनची गॅंगवरची पकड ढिली झाली आणि त्याच चुकीमुळे त्यांना अटक झाली.

संतोक बेनने हा खुनी खेळ फक्त पोरबंदर शहरातच ठेवला असं नाही तर अंडरवर्ल्ड सोबतसुद्धा तिचे कनेक्शन होते. करीम लालाच्या सगळ्यात जवळची महिला म्हणून तिची ओळख होती. संतोक बेनने मरण्याच्या आधी जानेवारी २००७ मध्ये आपल्या २३ वर्षाच्या पुतण्याची गोळी घालून हत्या केली होती, २००६ मध्ये आपल्याच सुनेचा जीव तिने घेतला होता, अशा चर्चा आजही रंगतात. २०११ साली हृदय विकाराच्या झटक्याने संतोकबेनचं निधन झालं.

पाठीमागं उरल्या चर्चा, अफवा, दहशत आणि राजकीय वारसा, जो आज त्यांचा मुलगा सलग तिसऱ्यांदा आमदार बनून चालवतोय.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.