राजस्थानी, गुजराती नाही मुंबईला मोठ्ठ करणारा हा माणूस ‘मराठी’ होता

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एका कार्यक्रमात म्हणाले, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”

त्यांच्या या वक्तव्यावरुन चांगलाच गदारोळ उठलाय. विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. आता यावरुन राजकारण तर रंगेलच, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, की मुंबईला मोठ्ठ करणारा, मुंबई घडवणारा माणूस मराठी होता.

त्यांचं नाव, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ.

नाना शंकरशेठ किती मोठ्ठे होते, हे एका वाक्यात सांगायचं झालं, तर सगळ्या भारतावर अंमल असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीला नाना कर्ज पुरवायचे. या मुंबईच्या सावकारापुढं भले भले इंग्रज अधिकारी माना तुकवून उभे राहायचे.

नाना शंकरशेठ यांचं खरं नाव जगन्नाथ शंकर मुरकुटे. मूळगाव मुरबाड, नानांचा जन्म झाला १८०३ मध्ये. त्यांचे वडील मोठे सावकार होते. नाना शंकरशेठ यांनी कधी ठराविक असं शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेतलं नव्हतं, त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक त्यांच्या गिरगावातल्या घरी यायचे.

पण नानांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं होतं.

१८१९ मध्ये मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणून लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनची नियुक्ती झाली. नानांची मोठ्या अधिकाऱ्यांमध्ये उठबस होती, व्यापार होता, त्यामुळं त्यांची एल्फिस्टनशी ओळख झाली, पुढं या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. एल्फिस्टन हा ब्रिटिश गव्हर्नर असला तरी त्याला भारतीय नागरिकांविषयी आपुलकी होती. मुंबईत सुधारणा व्हाव्यात अशी त्याची मनोमन इच्छा होती.

एल्फिस्टन आणि नाना शंकरशेठ हे दोन समविचारी मित्र एकत्र आले आणि मुंबईत ‘मुंबईची हैंदशाळा आणि शाळापुस्तक मंडळी’ या संस्थेची स्थापना झाली. विशेष म्हणजे या शाळेत मराठी, हिंदी आणि गुजराती या मातृभाषांमध्ये शिक्षण मिळत होतं, पहिल्यांदाच या भाषांमधली क्रमिक पाठ्यपुस्तकंही छापण्यात आली. बरं हे सगळं झालं तेव्हा नानांचं वय होतं फक्त १९ वर्ष.

मात्र शिक्षण क्षेत्रातलं नानांचं योगदान इथपर्यंतच मर्यादित नव्हतं, ज्या काळात मुलींनी शिक्षण घेणं हे समाजमान्य नव्हतं, त्या काळात नानांनी आपल्या वाड्यात मुलींसाठी शाळा सुरु केली.

आपल्या घरातल्या मुलींनाही तिकडे शिकायला पाठवलं. काही सनातनी लोकांनी मुलींच्या शिक्षणाला विरोध केला खरा, पण नानांनी आपले अधिकार वापरत सगळ्यांचा विरोध मोडून काढला. पुढं या शाळेत विद्यार्थिनींची संख्या वाढत गेली.

नानांच्या पुढाकारातून एल्फिस्टन कॉलेजची उभारणी करण्यात आली. याच कॉलेजमधून न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी असे विद्वान घडले. १८४५ मध्ये नानांनी सर ग्रँट मेडिकल कॉलेजच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला आणि मराठी मुलांना डॉक्टरकीचं शिक्षण मराठी भाषेत मिळू लागलं.

आज डेक्कन कॉलेज नावानं ओळखलं जाणारं पूना संस्कृत कॉलेज, पहिलं लॉ कॉलेज, मुंबई विद्यापीठ आणि जगाला असंख्य मोठे कलाकार देणारं सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट यांच्या उभारणीत नाना शंकरशेट यांचाच पुढाकार होता. 

थोडक्यात नानांनी मुंबईचंच नाही तर साऱ्या भारताचं भविष्य बदलवणाऱ्या पिढ्या शिक्षणातून उभ्या केल्या.

समाजावर सनातनी विचारांचा पगडा असताना सतीसारख्या अमानुष प्रथेला नानांनी वयाच्या विसाव्या वर्षी थेट विरोध केला. या विषयी ब्रिटिश पार्लमेंटला लिहिलेल्या पत्रात राजा राममोहन रॉय आणि नाना शंकरशेट या दोघांच्या सह्या होत्या.

आर्थिक सुधारणा करण्यातही नाना उजवे होते. मर्कटाईल बँक, सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया, कमर्शियल बँक ऑफ इंडिया अशा एकूण सहा बँकांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. इथूनच मुंबईतला व्यापार वाढत गेला आणि देशाची आर्थिक राजधानी बनण्याकडे मुंबईची पावलं पडू लागली.

सागरी व्यापाराचं महत्त्व ओळखून त्यांनी ‘द बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी’ उभारली, याच कंपनीच्या माध्यमातून पश्चिम भारतात वाफेच्या बोटी उभारण्यात येऊ लागल्या.

आजही मुंबई ही अनेक अभिनेत्यांसाठी कर्मभूमी आहे. मराठीसोबतच हिंदी, गुजराती आणि राजस्थानी नाटकं जिथं रंगण्यास सुरुवात झाली, त्या बादशाही नाट्यगृहाची उभारणी नानांच्या पुढाकारातूनच झाली होती. इतकंच नाही, तर आज मुंबईचं भूषण असणारी राणीची बाग उभी करण्याचं श्रेयही नानांनाच जातं.

नानांनी १८५२ मध्ये स्थापन केलेल्या बॉम्बे असोसिएशनमुळं पश्चिम भारतात पहिली सर्वसमावेशक राजकीय चळवळ सुरू झाली, पुढं याच बॉम्बे असोसिएशनच्या सदस्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली.

मुंबई खऱ्या अर्थानं आधुनिक झाली ती रेल्वेमुळं.

फक्त भारतातच नाही, तर साऱ्या आशिया खंडाच्या इतिहासात पहिली रेल्वे धावली, ती बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर. खरंतर भारतात रेल्वे आणण्यासाठी ब्रिटिश फारसे उत्सुक नव्हते. पण नाना शंकरशेठ यांनी आपले मित्र जमशेठजी जीजीभॉय यांच्या मदतीनं ही मागणी लाऊन धरली. मुंबईत आलेले सुप्रीम कोर्टाचे जज सर थॉमस एरसकीन पेरी यांनीही दोघांना साथ दिली.

नानांनी कंपनी सरकारकडे प्रस्ताव पाठवला, मार्गांची आखणी केली आणि समाजातल्या दिग्गज लोकांना एकत्र आणत ग्रेट इंडियन रेल्वेची स्थापना केली. पुढं लंडनमधल्या ग्रेट इंडियन पेनिनसुलर रेल्वे कंपनीचं ऑफिस मुंबईत उघडण्यात आलं. दोन्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा होती, मात्र नानांच्या सामंजस्यातून ग्रेट इंडियन पेनिनसुलर रेल्वे या नावाखाली दोन्ही कंपन्या एकत्र आल्या, ज्याचं ऑफिस होतं, नाना शंकरशेठ यांच्या बंगल्यात.

याच बंगल्यात खलबतं झाली, आखणी झाली, तज्ञ इंजिनिअर आणून रेल्वे मार्गांचं काम करण्यात आलं आणि १६ एप्रिल १८५३ ला बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर आशियातली पहिली रेल्वे धावली. मुंबईच्या आधुनिकतेचं बीज नानांनी रोवलं आणि भारतीय रेल्वेच्या रुपानं आज त्याचा वटवृक्ष झालाय.

त्याकाळात मुंबईत फणसाचे दिवे पेटवलेले असायचे, म्हणजे खांबाला फणस लटकावून त्याच्या खोबणीत तेलाचे दिवे असायचे, जे लवकर विझुनही जायचे. जगभरातल्या मोठ्या शहरांमध्ये गॅसचे दिवे पेटवले जात होते, तेव्हा मुंबई अंधारात होती.

मुंबईला या अंधारातून बाहेर काढण्याचं पहिलं स्वप्न नानांनीच पाहिलं.

त्यांच्या प्रयत्नातून १८६२ मध्ये मुंबईच्या चिंचपोकळीमध्ये भारतातली पहिली गॅस कंपनी उभी राहिली, तिचं नाव बॉम्बे गॅस कंपनी. याच कंपनीच्या माध्यमातून ४ वर्षांनी ७ ऑक्टोबर १८६६ ला मुंबईच्या चर्चगेट रोड, भेंडीबाजार या भागात गॅसचे दिवे पेटले आणि मुंबई उजळून निघाली. मात्र हे बघायला नाना या जगात नव्हते, ३१ जुलै १८६५ ला त्यांचं निधन झालं.

उणंपुरं ६२ वर्षांचं आयुष्य त्यांनी या मराठी मातीला दिलं. आपल्याकडं असलेली मोक्याच्या ठिकाणांवरची जमीन सरकारला दान केली आणि त्या जागांवर महत्त्वाच्या इमारती उभ्या राहिल्या, ज्यातून आजची मुंबई घडत गेली. मुलींची शाळा, कला, वैद्यकीय आणि कायदेविषक महाविद्यालय, हॉस्पिटल, बँका, बाग, गॅस लाईट, रेल्वे, व्यापार आणि जगण्याची दिशा अशा अनेक गोष्टी नानांनी मुंबईला दिल्या.

आजही ग्रँट रोडच्या नाना चौकातून कधी जाणं झालं, तर नाना शंकरशेठ यांचा पुतळा लक्ष वेधून घेतो आणि ही मुंबई एका मराठी माणसानं उभी केल्याची साक्ष देतो, हेच खरं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.