मगरीचं पिल्लू आणलं, लाईटच्या खांबावर चढून बसले : मोदींचे लहानपणीचे 7 किस्से..

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस. मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतात चित्ते आणण्यात आले. वास्तविक हे टायमिंग जुळून आलं. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या अनेक अज्ञात गोष्टी समोर आल्या. कशाप्रकारे त्यांच बालपण गेलं, कशाप्रकारे कष्टातून त्यांनी दिवस काढले. प्रसंगी चहा विकून त्यांनी शिक्षण पुर्ण केलं. पुढे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान झाले.. 

आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लहानपणीचे काही अद्भूत प्रसंग, जे ऐकले तर तुम्हाला देखील तुमचे खोडकर बालपण आठवेल. यातील अनेक किस्से स्वत: नरेंद्र मोदींनी सांगितले आहेत तर अनेक प्रसंग त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रकाशित करण्यात आलेले आहेत.. 

प्रसंग 1 

लहानपणी संन्यासी होण्याची इच्छा व्यक्त केली होती.. 

नरेंद्र मोदी लहानपणापासूनच संन्यासी होण्याच्या विचारात होते. गुजरातच्या वडनगर येथे जन्मलेल्या मोदींना संन्यासी साधू लोकांच जीवन आवडत होतं. यातूनच त्यांनी लहानपणातच घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. पण वडिलांनी त्यांना परत आणलं.

मोदींच्या वडिलांचे वडनगर रेल्वे स्टेशनवर चहाच दुकान होतं. लहानपणी मोदी तिथे चहा विकत असत. पण त्यांच्या मनी संन्याशी होण्याचा निर्णय अंतीम झाला होता. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी ठरवल्याप्रमाणे घराचा त्याग केला व भारताची अध्यात्मिक यात्रा करण्यासाठी ते रवाना झाले. 

प्रसंग 2

वक्तृत्व कलेत लहानपणापासून निपुण.. 

नरेंद्र मोदींच्या भाषणाचे चाहते आज जगभरात आहेत. पण मोदींना भाषणाची आवडल लहानपणापासून होती. स्वत: नरेंद्र मोदींची एक्झाम पे चर्चा या लहानमुलांसोबतच्या संवादामध्ये आपल्या वकृत्व केलेच्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यांनी लहानमुलांना कोणत्याही एका कलेत पारंगत होण्याचं मार्गदर्शन केलं होतं. 

प्रसंग 3

आवाजाप्रमाणेच उत्तर पोहणारे विद्यार्थी.. 

नरेंद्र मोदी लहानपणी अभ्यासात हुशार विद्यार्थी तर होतेच शिवाय ते सर्वगुणसंपन्न होते. अभ्यासेतर गोष्टींमध्ये ते पारंगत होते. ते शेरो-शायरी करत, भाषण करत तसेच पोहणे हा त्यांचा छंद होता. लहानपणी ते आपल्या मित्रांसह पोहायला जात असतं. तासन् तास ते पोहायचे. त्यांचा हा छंद पुढे भारताच्या अध्यात्मिक यात्रेदरम्यान देखील त्यांनी जपला. 

प्रसंग 4

लहानपणी मगरीचं पिल्लू पकडून आणलं होतं.. 

नरेंद्र मोदी लहानपणी शर्मिष्ठा सरोवर येथे मित्रांसह पोहण्यासाठी जात असत. इथेच पोहत असताना त्यांना लहान मगरीचं पिल्लू मिळालं. नरेंद्र मोदींनी धाडस दाखवून ते पकडलं. हे मगरीचं पिल्लू त्यांनी घरी आणलं. आई हिराबेन यांनी ते पाहताच आपल्या खोडकर मुलाला त्यांनी समजावलं. एका आईला मुलापासून दूर करणं ही वाईट गोष्ट आहे अस हिराबेन यांनी सांगितलं. नरेंद्र मोदींनी हे लहान मगरीचं पिल्लू पुन्हा तलावात नेवून सोडलं.. 

प्रसंग 5

शहनाई वादकांना चिंच दाखवून पळून जायचे नरेंद्र मोदी..

लहानपणी नरेंद्र मोदी खोडकर स्वभावाचे होते. त्यांनी आपल्या एका भाषणात हा किस्सा सांगितला होता. नरेंद्र मोदींनी लहानपणीच्या आठवणी सांगताना सांगितलं होतं की, त्यांच्या लहानपणी त्यांच्या गावी शहनाई वादक येत. ते शहनाई वाजवत तेव्हा लहान नरेंद्र मोदी त्यांना चिंच दाखवत असत.

चिंच पाहून शहानाई वादकांच्या तोंडाला पाणी सुटत असे. त्यामुळे शहनाई वाजवण्यावरून त्यांच लक्ष्य विचलीत होत असे. मग ते नरेंद्र मोदींच्या मागे धावत असतं व नरेंद्र मोदी पुढे पुढे धावत जात. नरेंद्र मोदींनी आपल्या खोडकरपणाचा हा किस्सा सांगिल्यानंतर मात्र लहान मुलांनी खोड्या जरूर काढाव्यात मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये असही सांगितलं होतं… 

प्रसंग 6

पशू-पक्ष्यांवर खूप प्रेम करत असत नरेंद्र मोदी 

नरेंद्र मोदी आपल्या निवासस्थानी असणाऱ्या मोरांना दाणे भरवतानाचा फोटो मध्यंतरी व्हायरल झाला होता. नरेंद्र मोदींचा असाच एक पक्षीप्रेमी असण्याचा किस्सा कॉमनमॅन नरेंद्र मोदी या किशोर मकवाना यांच्या पुस्तकात सांगण्यात आलेला आहे. शालेय जीवनात नरेंद्र मोदी NCC कॅम्पसाठी गेलेले होते.

रात्री अपरात्री या कॅम्पमधून मुलांना बाहेर येण्यास परवानगी नव्हती. अशा वेळी गोवर्धन पटेल या शिक्षकांना लहान नरेंद्र मोदीं रात्रीच्या वेळी खांबावर चढताना दिसले. त्यांना वाटलं नरेंद्र मोदी कॅम्प सोडून पळून जात आहेत. मात्र त्या खांबावरून पक्ष्यांना आवाज येत होता. एक पक्षी जखमी अवस्थेत खांबास लटकला होता. नरेंद्र मोदी त्या पक्ष्यास वाचवत होते. हे पाहून ते शिक्षक प्रचंड भावूक झाले.

प्रसंग 7

शाळेची भिंत बांधण्यासाठी नाटकाचा प्रयोग 

नरेंद्र मोदी ज्या शाळेत शिकत ती शासकिय शाळा होती. शाळेला पंचवीस वर्ष पुर्ण होत आलेली पण शाळेच्या भिंती पडल्या होत्या. शासनाकडून प्रयत्न होत नव्हते. अशा वेळी नरेंद्र मोदींनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. त्यांनी एक नाटक बसवलं. या नाटकातून जे पैसे आले त्यातून शाळेची भिंत बांधण्यात आली. 

असे होते बालनरेंद्र.. थोडेसे नटखट थोडेसे जबाबदार.. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.