फक्त इंग्रजी येत नाही म्हणून राजदीप सरदेसाईने मोदींना न्यूजडिबेट मधून परत पाठवले होते

प्राईम टाईम डिबेट हा आजकाल चेष्टेचा विषय बनला आहे. वेगवेगळ्या न्यूज चॅनलचे आरडाओरडा करणारे अँकर, शिवीगाळ मारामारी करणारे पॅनेलिस्ट, विदूषकी चाळे करणारे पक्ष प्रवक्ते यामुळे न्यूज चॅनलनी विश्वासार्हता गमावली आहे.

एक काळ होता जेव्हा टीव्ही वर चालणाऱ्या चर्चा प्रेक्षक सिरियसली घ्यायचे. या न्यूज डिबेटमध्ये खऱ्या खुऱ्या चर्चा व्हायच्या. त्यातून खरे प्रश्न मांडले जायचे.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली.

केबल टीव्हीचे आगमन अजून होत होते. ऐंशीच्या दशकात भारतात दूरदर्शन हे एकमेव चॅनेल होतं. त्यावर येणाऱ्या सरकारी बातम्या हा एकमेव न्यूजचा सोर्स होता. १९८८ साली न्यू दिल्ली टेलिव्हिजन नावाच्या खाजगी चॅनलची सुरवात झाली. त्यांना दूरदर्शनवरच एक तासाचे कव्हरेज मिळायचे.

हेच आजचे NDTV चॅनेल.

प्रणव रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांनी याची सुरूवात केली होती. इंग्लंडच्या क्विन्स कॉलेजमध्ये शिकून आलेले रॉय यांना अर्धा इंग्रज म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्या टीमचे इतर पत्रकार देखील असेच इंग्लंडच्या ऑक्सफर्ड केंब्रिज विद्यापीठात शिकून आलेले फाडफाड इंग्रजी बोलणारे होते.

यात समावेश होता राजदीप सरदेसाई आणि अर्णब गोस्वामी यांचा.

हे दोघे सुरवातीच्या काळात न्यूज डिबेटच अँकरिंग करायचे. त्याही काळात वेगवेगळ्या पक्षाच्या प्रवक्त्यांना करंट विषयावर चर्चा करण्यासाठी डिबेटमध्ये बोलवलं जायचं.

यात भाजपतर्फे बऱ्याचदा एक चेहरा झळकायचा तो म्हणजे नरेंद्र मोदी.

आता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण मोदींचा दिल्लीमधला पत्रकारविश्वातला पहिला मित्र म्हणजे राजदीप सरदेसाई.

दोघेही गुजराती. राजदीप सरदेसाई यांचे वडील सुप्रसिद्ध क्रिकेटर दिलीप सरदेसाई वाढले गोव्यात मात्र त्यांचं कुटूंब गुजरातच. राजदीप यांचे आजोबा गुजरातमध्ये मोठे पोलीस अधिकारी होते. नरेंद्रभाई मोदींचे त्यांच्याशी चांगले संबंध होते. त्यांच्या मार्फतच राजदीप आणि मोदी यांची ओळख झाली होती.

१९९० साली अडवाणी यांनी रामरथ यात्रा सुरू केली ती गुजरातच्या सोमनाथ मंदिरापासून. या रथयात्रेचे सारथ्य करणाऱ्यामध्ये नरेंद्र मोदी हे महत्वाचे नाव होते. टाइम्स ऑफ इंडियाचा रिपोर्टर म्हणून राजदीप रथयात्रा कव्हर करत होता.

तेव्हा आतल्या खबऱ्या गोळा करण्यासाठी राजदीप मोदींचीच मदत घ्यायचा.

१९९४ साली तो NDTV चा न्यूज अँकर बनला. तो दिल्लीला आला साधारण त्याच दरम्यान मोदी सुद्धा दिल्लीच्या राजकारणात आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत होते.

नरेंद्र मोदीनी रामजन्मभूमी आंदोलनात केलेलं काम पाहून त्यांना गुजरातवरून दिल्लीला पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं.

त्यांचा अभ्यास मोठा होता, बोलण्यात चातुर्य असल्यामुळे मोदींना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

ठगांची दिल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मोठ्या शहरात गुजराती गुजराती या मुद्द्यावर सरदेसाई आणि मोदी यांच्यामध्ये दोस्ती जमली. गप्पांसाठी भेटणे, लंचसाठी एकत्र जाणे अस त्यांचं चाललं होतं. दोघांनाही खाण्याची आवड होती.

विशेषतः आंध्र भवन येथे ते जेवायला जायचे.

कढी-चावल ही त्यांची फेव्हरेट डिश होती.

त्यांच्या मैत्रीची झलक टीव्ही डिबेटमध्ये देखील दिसायची. भाजपमध्ये तेव्हा प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, अरुण जेटली, गोविंदाचार्य हे दिग्गज प्रवक्ते होते. बऱ्याचदा इतर कोणी प्रवक्ता ऐनवेळी येऊ शकत नसेल तर राजदीप हक्काने मोदींना बोलवायचे. मोदी देखील कोणत्याही वेळी चर्चेसाठी तयार असायचे.

बऱ्याचदा एखाद्या महत्वाच्या विषयावर डिबेट असेल तर मोदी स्वतः राजदीप सरदेसाईला फोन करून मला बोलवून घे अस सांगायचे.

एकदा अशाच कुठल्या तरी राष्ट्रीय महत्वाच्या विषयावर डिबेट होणार होती. राजदीप सरदेसाईने भाजप तर्फे मोदींना बोलावले होते. चर्चा सुरू होणार त्याच्या काही वेळ आधी राजदीपला कळले की प्रमोद महाजन डिबेट साठी उपलब्ध होऊ शकतात.

NDTV च्या त्या इंग्रजाळलेल्या वातावरणात रुळलेला राजदीप सुद्धा हळूहळू आढयतेखोर बनला होता.

त्याने सरळ मोदींना कॅन्सल केले व इंग्रजी सहज बोलू शकणारे प्रमोद महाजन यांना चर्चेसाठी बोलवलं. शेवटच्या क्षणाला मोदींना परत पाठवण्यात आलं.

फक्त अस्खलित इंग्रजी बोलू शकत नाही या मुद्द्यावर आपला अपमान केला गेला ही गोष्ट नरेंद्र मोदींना जिव्हारी लागली. ते राजदीपला फक्त एवढेच म्हणाले,

“एकदिन मै अन्ग्रेजी मे भाषण दूंगा “

नरेंद्र मोदींनी मोठ्या मनाने हा अपमान पचवला.

पुढे गुजरातचे मुख्यमंत्री झाले, गुजरातची दंगल ज्याप्रमाणे राजदीप सरदेसाईने कव्हर केली त्यांना व्हिलनच रूप दिलं तेव्हा पासून त्यांची मैत्री कायमसाठी तुटली.

एका प्रचारयात्रेवेळी राजदीपने मोदींच्या गाडीत बसून त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्याला उभा आडवा सोलून काढला.

२०१४ साली मोदींचे नाव भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले तेव्हा राजदीपने मुलाखतीसाठी त्यांचे अनेकदा पाय धरले पण मोदींनी त्यांना दाद लागू दिली नाही.

मध्यंतरी मोदींनी अमेरिकेत इंग्लिशमध्ये भाषण केले तेव्हा राजदीप सरदेसाईने स्वतः हा किस्सा ट्विटरवरून सांगितला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.