म्हणून तयारी असूनही पी.व्ही. नरसिंह राव यांनी अणुचाचणी घेतली नाही.
राजीव गांधींच्या हत्येनंतर कॉंग्रेसची सूत्र पी.व्ही.नरसिंह राव यांच्याकडे आली. ते पंतप्रधान बनले. तस बघायला गेलं तर हे अल्पमतातील सरकार होतं. कॉंग्रेसमधले अनेक दिग्गज नेते कुरघोडी करण्यासाठी तयार होते पण नरसिंहराव यांनी चतुराईने सगळ्यांची मोट बांधली होती.
त्यांचे प्रतिस्पर्धी समजले जात असणाऱ्या माधवराव शिंदे, अर्जुनसिंह यांना कमी महत्वाची मंत्रीपदे दिली होती. अर्थमंत्रीपदी तर डॉ.मनमोहन सिंग यांच्यासारखा राजकारणाबाहेरचा व्यक्ती नेमला होता. महाराष्ट्राला दोन महत्वाची मंत्रीपदे मिळाली होती. गृह आणि संरक्षण. गृह खात्याचे मंत्री होते शंकरराव चव्हाण तर संरक्षण मंत्री होते शरद पवार.
यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर त्यांचा मानसपुत्र समजले जात असणारे शरद पवार हे पद सांभाळणार होते.
साल होत १९९१. पवारांनी महाराष्ट्रच मुख्यमंत्रीपद सोडून संरक्षण मंत्रालयाचा कारभार हाती घेतला. पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात शिरकाव करण्याची त्यांना संधी मिळाली होती.
शरद पवार सांगतात,
“माझ तसं संरक्षण खात्याचं ज्ञान मर्यादित होतं. पण माहिती नसेल तर त्या क्षेत्रातील तज्ञांकडून ती करून घेण्याचा शिरस्ता मी यावेळीही पाळला. जुन्या फायली, भारत-चीन युद्धावेळचा हँडरसन अहवाल अशा अनेक गोष्टी नजरेखालून घातल्या. सीमांना भेट दिली.”
त्यावेळी संरक्षण खात्याच्या सल्लागारांनी त्यांना आपण अण्वस्त्रसज्ज देश आहोत आणि अणुस्फोट चाचणी घडवण्यासाठी तयार आहोत ही माहिती दिली. हा अतिशय संवेदनशील विषय होता. पवार लगेच ती गोपनीय फाईल घेऊन पंतप्रधानांच्याकडे गेले.
पी.व्ही.नरसिंहराव हे जुने जाणते व धोरणी नेते होते.
देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्थितीच त्यांना भान होत. परराष्ट्र धोरणातील त्यांचा अनुभव मोठा होता. त्यांनी पवारांनी आणलेली ती फायली वाचली आणि म्हणाले,
“आमच्या आंध्रप्रदेशात अनेक शेतकरी शेतात घर बांधून राहतात. त्यांच्या घरी गेलो की दर्शनी भागात एक रायफल अडकवलेली दिसते. तिचा वापर ते कधी करत नाहीत पण रायफल आपल्याकडे आहे याचा संदेश पोहचवायचा असतो.”
तो काळ भारतापुढील आर्थिक संकटाचा होता. आपण नुकतच जागतिकीकरण स्वीकारलं होत. नरसिंहराव आणि मनमोहनसिंग यांनी धाडसी निर्णय घेऊन देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पावले टाकायला सुरवात केली होती.
अशावेळी आपल्याकडे अण्वस्त्र बनवण्याचे तंत्रज्ञान आहे व आपण अणुस्फोट करू शकतो याची तयारी असण उत्तम होत पण खरोखर तशी चाचणी करून जगाचं लक्ष वेधण्याची कोणतीही गरज नव्हती. कारण अस पाउल उचललं तर संपूर्ण जगाचा रोष पत्करावा लागला असता व आपल्याला वेगळ पाडण्यासाठी काही देशांना निमित्तच मिळाल असत.
म्हणून शरद पवारांचा आग्रह असतानाही नरसिंहराव यांनी अणुस्फोटचाचणी करण्यास नकार दिला.
पुढे काही वर्षांनी आपली आर्थिक स्थिती कोणताही धक्का सहन करू शकेल इतकी मजबूत झाली आणि नरसिंहराव डिसेंबर १९९५ मध्ये अणूचाचणीचे आदेश दिले. त्यांचे विज्ञान विषयक सल्लागार डॉ.अब्दुल कलाम यांनी तयारी देखील केली होती पण अमेरिकी उपग्रहांनी यांसंदर्भातील छायाचित्र टिपले व सगळे प्रकरण बारगळले. लवकरच निवडणुका आल्या आणि नरसिंहराव यांना पायउतार व्हावे लागले.
अनेक वर्ष चाललेल्या भारतीय अणवस्त्र प्रोग्रॅमच्या तयारीच फळ १९९८ ला मिळाल. वाजपेयीजींच्या नेतृत्वाखाली भारत अण्वस्त्रसज्ज देश बनला.
शरद पवार यांनी ‘लोक माझा सांगाती ‘या आत्मचरित्रात हा किस्सा सांगितलेला आहे.
हे ही वाच भिडू.
- नरसिंह राव आणि मनमोहनसिंग यांनी सुद्धा देशाच्या न कळत सोन गहाण ठेवलं होतं.
- जेव्हा विलासरावांच्या एका चुकीनं पवारांचं पंतप्रधानपद हुकलं !!!
- एका रुपायासाठी शरद पवारांची चाणक्यनिती पणाला लागली होती