डाव करणारे कितीही आले तरी नरसिंहरावांनी बरोबर आपले विरोधक वेचून संपवले

१९९१ साली लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा काँग्रेस सत्तेत परतणार याची सगळ्यांनाच कुणकुण लागली होती. तत्कालीन अध्यक्ष राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जोरदार प्रचार मोहीम हाती घेतली होती. राजीव गांधी तरुण होते. त्यांनी या निवडणुकीत युवा नेतृत्वाला संधी दिली होती.

याच तरुण रक्ताला वाव देण्याच्या धोरणामुळे काँग्रेसचे जुने जाणते नेते मागे पडले होते. यातलं प्रमुख नाव म्हणजे पी.व्ही.नरसिंहराव 

नरसिंह राव यांना इंदिरा गांधींचा चाणक्य म्हणून ओळखलं जायचं. अनेक भाषांचे जाणकार, विद्वत्तापूर्ण  तीक्ष्ण बुद्धी, राजकारणाचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले नरसिंह राव त्या निवडणुकीत आपल्या वयामुळे व प्रकृति अस्वाथ्यामुळे उतरले नव्हते. त्यांनी पक्षासाठी जाहीरनामा बनवला होता पण आता ते निवृत्त होणार हे जवळपास निश्चित होतं.

पण याच निवडणुकीच्या प्रचारसभेत राजीव गांधींवर अतिरेकी हल्ला झाला व त्यांचं अकाली निधन झालं.निवडणूक जिंकण्याच्या दारावर उभी असलेल्या काँग्रेसवर निर्णायकी अवस्था आली. 

काँग्रेस अध्यक्ष हाच पुढचा पंतप्रधान बनणार हे निश्चित होतं. देशाची आर्थिकच नव्हे, तर सर्व क्षेत्रांतील परिस्थिती गंभीर, चिंताजनक होती. त्यातून बाहेर येण्यासाठी सक्षम आणि खंबीर व्यक्तीची निवड होण्याची गरज होती. या पदासाठी काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून अध्यक्षपदाच्या घोडय़ावर आरूढ होण्यास सज्ज होते.

यात प्रमुख नाव होतं अर्जुन सिंह, एन डी तिवारी, शरद पवार.

या सर्व नेत्यांनी सर्व रसद उभी करून काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण ज्यांना कोणीही गृहीत धरलं नव्हतं त्या नरसिंह रावांनी मागुन येऊन जोरदार झटका दिला. दक्षिणेतील खासदारांचा एकमुखी पाठिंबा घेऊन त्यांनी विरोधकांना अस्मान दाखवलं. अखेर सोनिया गांधींनी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केला.

काही काळापाठीमागे राजकारणातून निवृत्ती घेण्याचा विचार करत असलेले राव कोणाच्या ध्यानी मनी नसताना निकालानंतर देशाचे पंतप्रधान झाले.

सत्तेत आल्या आल्या नरसिंह राव यांनी देशाचं आर्थिक धोरण बदललं. राजकारणाबाहेरच्या मनमोहन सिंग यांना अर्थमंत्रीपद देऊन त्यांना उदारीकरणाचे धोरण आणण्यास प्रोत्साहन दिलं. या पदासाठी इच्छूक असणाऱ्या प्रणब मुखर्जी यांना त्यांनी कट्टा दाखवला. पक्षातील विरोधक असणाऱ्या शरद पवार यांना माझ्या नंतर पुढचा पंतप्रधान तूच असं सांगत संरक्षण मंत्री पद घ्यायला लावलं. पण काही दिवसांनी मुंबईत धार्मिक दंगे उसळल्यावर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदि पाठवून त्यांचे पंख कापले.

नरसिंह राव यांचे दुसरे मोठे विरोधक होते मध्यप्रदेशचे अर्जुन सिंह 

रावांनी त्यांना तुलनेने कमी महत्वाचे असणारे मानव संसाधन मंत्रालय देऊन वचक ठेवलाच होता. पण तरीही अर्जुन सिंह यांना संपवण्यासाठी ते प्रयत्नशील होतेच. ती संधी चालून आली बाबरी घटनेनंतर.  

राम जन्मभूमी आंदोलन शिगेला पोहोचले असताना नरसिंह राव यांनी दाखविलेली निष्क्रियता ही दिल्लीच्या राजकारणातील दंतकथा बनली होती. बाबरी मशीद ढासळणार हे वास्तव ६ डिसेंबर १९९२ च्या पूर्वसंध्येला दिल्लीतील राजकीय वर्तुळाला ठाऊक होते. पण नरसिंह राव त्यापासून शेवटपर्यंत ‘अनभिज्ञ’ होते.

 स्व. प्रमोद महाजन यांच्या सौजन्याने अयोध्येतील ‘आँखो देखा हाल’ बघून दिल्लीत परतलेल्या दोन मराठी पत्रकारांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या एका तरुण नेत्याला बाबरीच्या संभाव्य पतनाची जाणीव संपूर्ण तपशिलांसह ५ डिसेंबरच्या सकाळीच करून दिली होती. या नेत्याने तातडीने थेट नरसिंह रावांची भेट घेत त्यांना सतर्क केले होते. त्याच दिवशी तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यादेखत संधी साधून या नेत्याने नरसिंह रावांपुढे हा विषय पुन्हा उपस्थित केला.

त्या वेळी संतापलेल्या रावांनी ‘पंतप्रधान मी आहे की तुम्ही?’ असा प्रश्न विचारून दोघांनाही निरुत्तर केले. 

तरीही या तरुण नेत्याने आपल्या परीने बाबरी पतनामुळे उद्भवणारी संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी राव यांच्या मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आक्षेप नोंदविण्यासाठी प्रवृत्त केले. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेवटी ठरल्या मुहूर्तावर ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद जमीनदोस्त झाली.

त्या दिवशी नरसिंह राव काय करीत होते, हा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आजही खमंग चर्चेचा विषय ठरला आहे. काहींच्या मते राव त्या दुपारी निश्चिंत होऊन वामकुक्षी घेत होते, तर ‘आतल्या गोटातील’ माहिती ठेवणारे कुलदीप नय्यर यांच्यानुसार ते बाबरी भुईसपाट होईपर्यंत देव पाण्यात बुडवून बसले होते. कुणी तरी कानात येऊन सांगेपर्यंत ते देवपूजेतून उठले नाहीत.

नरसिंह राव यांच्या खास विश्वासातले, आज हयात नसलेले तत्कालीन अ.भा. काँग्रेसचे सर्वशक्तिमान राष्ट्रीय सरचिटणीस बाबरी पतनानंतरच्या घडामोडींचे साक्षीदार होते. बाबरी विध्वंसासाठी उन्मादी कारसेवकांइतकेच जबाबदार ठरलेल्या राव यांचे पंतप्रधानपद ६ डिसेंबरच्या सायंकाळी धोक्यात आले होते. 

या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी अर्जुन सिंह बंडखोरांचे नेतृत्व करीत त्या वेळी केंद्रात सत्तापालट करण्याच्या तयारीला लागले.

पण अशा वेळी नरसिंह रावांनी आपली चाणक्यनीती पणाला लावली आणि अर्जुन सिंहांना आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले. अर्जुन सिंह समोर आल्यानंतर ढासळलेल्या बाबरीपेक्षाही या घटनेमुळे आपण पार खचून गेलो असल्याचे भासविण्यात राव पुरेपूर यशस्वी ठरले. देशाला सामोरे जाण्याची आपली मानसिक स्थिती नसून माझ्याऐवजी सरकारच्या वतीने आज तुम्हीच निवेदन काढा, असे रावांनी सांगितल्यामुळे अर्जुन सिंहांचा भाव वधारला. 

दुराग्रही आणि अहंकारी रावांची जिरविल्याच्या आनंदात अर्जुन सिंहांनी पूर्ण आवेशात भाजपची भर्त्सना आणि सरकारचा बचाव केला. 

एवढय़ा आपत्तीच्या प्रसंगी एका बडय़ा सेक्युलर बंडखोराला आपला प्रवक्ता म्हणून वापरण्याची धूर्त खेळी यशस्वी होताच राव यांच्या चेहऱ्यावरील तथाकथित तणाव व वैफल्य नाहीसे झाले होते. त्यांच्या विश्वासातील दिवंगत सरचिटणिसाने कथन केलेला हा किस्सा येथे उल्लेखनीय ठरतो. राव यांच्या दृष्टीने उपयुक्तता संपताच यथावकाश काँग्रेस सोडायला भाग पाडून अर्जुन सिंहांचा काटा काढण्यात आला. 

नरसिंह राव यांची खेळी अर्जुन सिंह यांना शेवटपर्यंत लक्षातच आली नाही. ताकद, बुद्धी, राजकीय इच्छाशक्ती सर्व काही असूनही अर्जुन सिंह यांचं पंतप्रधान बनण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. याला कारण ठरले नरसिंहराव.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.