नरसिंह राव आपल्या अखेरच्या भेटीमध्ये सोनिया गांधींना काय म्हणाले होते?

१९९१ च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान घडलेल्या काही घटनांवर नजर टाकता हे लक्षात येईल कि, या काळात अनेक राजकीय उलथा-पालथी झाल्या. त्यातील एक म्हणजे, याचदरम्यान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.व्ही. नरसिंह राव हे सक्रीय राजकारणातून जवळजवळ निवृत्त झाले होते. पण राजीव गांधींच्या हत्येनंतर भारतीय राजकारणाचे चित्रच बदलले आणि त्यातला एक मोठा बदल म्हणजे,

निवृत्त झालेले नरसिंह राव राजकारणात पुन्हा एन्ट्री झाली आणि त्यानंतर ते पंतप्रधान झाले आणि कॉंग्रेसचे अध्यक्षही !

१९९१ च्या या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा कॉंग्रेस पक्ष ठरला. आणि याच पक्षाला सरकार बनविण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती आर.व्यंकटरमण यांनी राव यांना आमंत्रित केले. त्या वेळी सोनिया गांधी राजकारणात सक्रीय नव्हत्या. आपल्या पतीच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे सोनिया यांनी हाती घ्यावी असे काही कॉंग्रेस नेत्यांना वाटत होते मात्र तेंव्हा सोनियांनी त्यास नकार दिला. त्यानंतर पंतप्रधान पदाची माळ नरसिंह राव यांच्या गळ्यात पडली.

नेहरू गांधी परिवारा व्यतिरिक्त आपली सत्तेची पाच वर्षे पूर्ण करणारे पहिले पंतपधान म्हणून नरसिंहराव यांना ओळखलं जातं.

१९९१ मध्ये राव सरकार सत्तेत आले तो काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत कठीण होता. अर्थमंत्री अनुभवी अर्थतज्ञ मनमोहन सिंह यांना जोडीला घेऊन देशाच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा रथ खुल्या अर्थव्यवस्थेकडे वळवणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले.

त्यांना आर्थिक सुधारणांचे जनक म्हणलं जातं ते काही उगीच नाही, गेल्या २५-३० वर्षांत ज्या वेगाने भारताचा आर्थिक विकास झाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वाची सत्ता या अर्थाने उदय झाला, त्याचे सर्व श्रेय जाते ते १९९१ च्या दरम्यान झालेले अर्थव्यवस्थेमधील आमूलाग्र बदल. आणि हे बदल करणारी जोडी म्हणजे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ.मनमोहन सिंग हे होय. 

इतक्या मोठ्या स्वरुपात योगदान दिले आणि जवळपास सहा दशके कॉंग्रेस सोबत एकनिष्ठ राहून राजकारण केलं तरीही कॉंग्रेस पक्षाने त्यांना कायमचंच साइडलाईन केल्यागत जमा आहे आणि हे कदापि समर्थनीय नसणार आहे.

त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप लागले त्यातून ते निर्दोष सुटलेही परंतु अनेक आरोपांपैकी एक आरोप त्यांच्या जिव्हारी लागला होता, जो शेवटपर्यंत त्यांना सलत होतं. 

तो आरोप म्हणजे बाबरी मशिद पाडण्याचा आरोप !

गांधी घराण्याशिवाय कॉंग्रेस चालवणारे नरसिंहराव म्हणून देश ओळखू लागला आणि इथेच सगळं बिनसत गेलं. सोनिया गांधी आणि राव यांच्यातली दरी वाढतच गेली. सोनिया यांनी सीताराम केसरी यांना अध्यक्ष केलं , ज्येष्ठ म्हणून राव यांच्याशी होणारी सल्लामसलत बंद केली, आदर-सत्कार बंद झाले, भेटीगाठी कमी झाल्या. आणि हळहळू नरसिंहराव यांना इतकं डावलण्यात आले कि, आजतागायत कॉंग्रेसच्या लिखित इतिहासात त्यांना विशेष स्थान नाही ना, ना कॉंग्रेस च्या कोणत्या होर्डिंग वर, कुणाच्या भाषणात त्यांचा उल्लेख आढळत नाही.

गोष्ट आहे २००४ सालची.

राजकीय घडामोडींपासून दूर नरसिंह राव आपल्या कुटुंबासोबत आयुष्याचा उत्तरार्ध जगत होते, तेही आजारपणात जीवन कंठत होते. त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी वाढतच होत्या. दिवसेंदिवस ते आजारपण गंभीर होत चालल्यामुळे त्यांचा स्वभाव ही चिडचिडा झाला होता. सर्वांनाच त्याचे नवल वाटायचे. कारण राव यांचा मूळ स्वभाव असा होता कि, प्रत्येक परीस्थितीत ते खूपच शांत, संयमी असायचे.

परंतु आजारपणात त्यांची साथ न सोडणारे त्यांचे काही सहकारी म्हणजे, मनमोहन सिंग, महेंद्र्जीत सिंग बिट्टा इत्यादी नेते, जे नेहेमी त्यांना भेटायला हॉस्पिटल्स चे दौरे करीत असायचे.

त्या दरम्यान राव यांच्या मुत्रनलीकेच्या दरम्यान इन्फेक्शन मुळे डॉक्टरांनी त्यांना हाय डोस दिले होते. त्याचा परिणाम त्यांच्या झोपेवर, शरीरावर तसेच मनावर देखील झाला होता. त्यांना त्या हॉस्पिटल्स आणि औषधींचा उबग आला होता.

एक दिवस तर ते खूप अस्वस्थ झाले आणि हॉस्पिटल च्या त्या स्पेशल वार्डमधील आपल्या बेड वरून उतरले आणि शेजारील खुर्चीवर जाऊन ‘सत्याग्रहाला’ बसले. संपूर्ण दिवस त्यांनी अन्नत्याग केला, औषधेही घेतली नाही. आणि आपल्या मुलीला म्हणाले कि,

“आता माझ्या जाण्याची वेळ झाली आहे, जबरदस्तीने तुम्ही मला थांबवू शकत नाही”

तेवढ्यात ह्या सत्याग्रहाची बातमी दिल्लीत सोनियांच्या कानावर गेली आणि त्यांनी तात्काळ हॉस्पिटल मध्ये धाव घेतली.

सोनिया यांच्यासोबत तत्कालीन शिवराज पाटील आणि अहमद पटेल ही होते. ते राव यांना पाणी पिण्याची विनवण्या करीत राहिले पण राव काही केल्याने ऐकेना. आजारी असतांना ही संपूर्ण आवेशाने राव यांनी रागात उत्तर दिले कि,

तुम्ही लोकं माझ्यावर मशिद पाडल्याचा आरोप करताय अन आता कसले पाणी पाजताय ? प्रत्येकांकडून चुका होत असतात. परंतु हि चूक केलीच नव्हती तर त्याचा जबाबदार मला का ठरविण्यात आले ? मला मी न केलेल्या चुकीची शिक्षा का दिली गेली !

बराच वेळ नरसिंह राव बडबडत राहिले. सोनिया गांधींनी शांतपणे त्यांच्या रागाला सामोऱ्या गेल्या आणि ते शांत झाल्यावर निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी राव यांना आपण रात्री फार बोललो याची जाणीव झाली. पण चुकीच्या आरोपांची शिक्षा भोगावी लागत असल्यामुळे आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये नरसिंहराव कटू बनले होते हे नक्की.

त्यानंतर महिनाभरात २३ डिसेंबर २००४ शेवटी त्यांचे आजारपणात निधन झाले.

नरसिंह राव यांची उपेक्षा त्यांच्या मृत्यूनंतर देखील तशीच सुरु राहिली. रावांच्या पार्थिवाला काँग्रेस मुख्यालयाच्या दारातून परत पाठवण्यात आलं. दिल्लीत इतर पंतप्रधानांचे व मुख्य नेत्यांचे समाधीस्थळ जिथे आहेत तिथे नरसिंहराव यांच्या समाधीस्थळाला जागा दिली गेली नाही. दिल्लीच्या ऐवजी नरसिंह राव यांच्या गावी आंध्रप्रदेशमध्ये त्यांचे अंतिम संस्कार करून तिथेच त्यांचे स्मृतिस्थळ उभारण्यात आलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.