नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे ७ आमदार निवडून आले…देशभरात राष्ट्रवादीचं वजन किती आहे ?

चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे नाना काटे पराभूत झाले आणि राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आता पक्षाला चिंचवडची जागा गमावल्याचं दुःखं जरी असलं तरीही एक गुड न्यूज पक्षासाठी आलीये थेट नागालँडमधून… 

राष्ट्रवादीने नागालँड विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जागांवर विजय मिळवला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळण्याची शक्यता आहे.

पण तेच २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, एकाही जागांवर विजय मिळवता आला नाही. सगळ्याच जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते.  मात्र यावेळेस ७ जागांवर विजय मिळवला आहे. 

आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि, नागालँड मध्ये राष्ट्रवादी कशी काय एवढी ताकदवान ? आता या प्रश्नावर उतारा एकच.

राष्ट्रवादीची वाटचाल बघणं!

जेंव्हा जेंव्हा राष्ट्रवादी पक्षाचा विचार येतो तेव्हा डोक्यात एकच पिक्चर येतो, ‘बीस साल बाद’. राष्ट्रवादी पक्षाचा आजवरचा प्रवास बघितला तर नुसताच रहस्यमय वाटतो. म्हणजे पक्षाच्या पडझडी पासून ते पक्षाने अनाकलनीय झेप घेणं फक्त आणि फक्त सिनेमांमध्येच होऊ शकतं असा वाटणारा ही एक समाज आहेच.

साधारण वीस बावीस वर्षांपूर्वी काँग्रेस मध्ये सत्तानेतृत्वासाठी संघर्ष झाला होता. यात सोनिया गांधींना परदेशी करार देऊन शरद पवार, पी ए संगमा आणि तारीख अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नामक सवता सुभा उभा केला.

बहुतेक सर्व ताकद महाराष्ट्रात असूनही शरद पवार यांनी संगमा आणि अन्वर यांच्या रुपाने मेघालय आणि बिहारमध्ये आपलं अस्तित्व तिकडेही जागतं ठेवलं. या सुभ्यात फूट पडली २००४ साली. पवार आणि संगमा यांनी आपले वेगवेगळे मार्ग निवडले. संगमांनी नॅशनल पीपल्स पार्टी काढली तर तारीख अन्वर २०१८ मध्ये काँग्रेसवासी झाले.

आता एवढ्या सगळ्या नंतर ही राष्ट्रवादीची ताकद काय ? तर गोवा, गुजरात, लक्षद्वीप यांसारख्या भाजपचा गड असलेल्या राज्यात राष्ट्रवादीचे खासदार आमदार निवडून येतात. पण त्याआधी…

जेव्हा १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा या पक्षाकडून खूप जास्तीच्या अपेक्षा होत्या. किंबहुना पक्ष स्थापणकर्त्याना सुद्धा स्वतः कडूनच अपेक्षा होत्या. त्याच कारण म्हणजे त्याच दरम्यान काँग्रेस वाईट काळातून जात होतं. त्यामुळे काँग्रेस सोडून इतर राजकीय नेत्यांच आपल्याला समर्थन मिळेल अशी राष्ट्रवादीला अपेक्षा होती.

याशिवाय कोणत्याही पक्षाला जेव्हा स्पष्ट बहुमत मिळणार नाही, तेव्हा आपला पक्ष अधिक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असाही विश्वास होता.

पण ना काँग्रेसचा पाठिंबा मिळाला ना राष्ट्रीय राजकारणात मध्यवर्ती भूमिका बजावण्याची संधी मिळाली. १९९९ मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाल.

राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापनेनंतर लगेचच महाराष्ट्रातील परिस्थिती बघून काँग्रेसशी समझोता केला होता. अधूनमधून वाद झाले मात्र ही युती आजही कायम आहे.

लोकसभेच बघायला गेलं तर, गेल्या २१ वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सुरक्षित आणि लहान राज्यांची निवड केलेली दिसते. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ खासदार निवडून आले त्यात मेघालय आणि मणिपूरच्या एकेक खासदारांचा समावेश आहे.

२००९ च्या लोकसभेत या पक्षाचे ९ खासदार निवडून आले त्यामध्ये मेघालयच्या एका खासदाराचा समावेश होता. २०१४ साली महाराष्ट्रात भाजपच्या लाटेचा मोठा तडाखा संयुक्त पुरोगामी आघाडीला बसला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातून फक्त ४ खासदार निवडून आले परंतु बिहारच्या कटिहारमधून तारिक अन्वर आणि लक्षद्वीपमधून पी. पी. मोहम्मद फैजल निवडून आले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आपले संख्याबळ ६ वर नेता आलं.

२०१९ मध्ये ५४३ पैकी ५ च खासदार राष्ट्रवादीचे आहेत. तर ४ खासदार राज्यसभेत आहेत.

आता इतर राज्यांत विधानसभेत काय परिस्थिती आहे बघूया…

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली आणि काँग्रेस जवळपास संपवून टाकली. तृणमूल काँग्रेस सत्ताधारी पक्ष बनला. तिथे राष्ट्रवादीचा काही विषयच नाही.

जगन मोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशात वाय एस आर पक्षाची स्थापना केली आणि दुसरीकडे काँग्रेस जवळपास संपली. मात्र असा करिष्मा किंवा जादू राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात करता आली नाही.

गुजरात मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशीच आघाडी नेहमी दिसून आली. अलिकडच्याच म्हणजे २००१७ आणि २०१२ ची गुजरात विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी करुन लढवली होती. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ९ उमेदवार निवडून आले होते. २०१७ मध्ये तर फक्त १ चं आमदार निवडून आला.

केरळ मध्ये २०२१ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले. ए. के. शशींद्रन आणि थॉमस के. थॉमस. मणिपूर विधानसभेत याआधी राष्ट्रवादीचे ४ आमदार होते. तर आता नागालँड मध्ये ७ आमदार जिंकून आल्याची माहिती मिळतेय. 

भारतात राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता कायम ठेवण्यासाठी लोकसभा निवडणुकांमध्ये किमान तीन राज्यांमध्ये २ टक्के जागा जिंकून याव्या लागतात किंवा किमान ४ राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये ६% मतं आणि लोकसभेच्या ४ जागा मिळवाव्या लागतात किंवा ४ राज्यांमध्ये त्या पक्षाला राज्य पातळीच्या पक्षाचा दर्जा मिळवावा लागतो.

त्यामुळे नागालँड मध्ये ७ जागा निवडून आणल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस करत असलेल्या प्रयत्नांचा अंदाज येतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.