एका घटनेनं बुधानी आयुष्यभरासाठी नेहरूंची बायको झाली..

गोष्ट आहे पन्नासच्या दशकातली. ब्रिटीशांनी देशाला सोडून गेलेल्याला जवळपास दहा वर्षे झाली होती. भारताची स्वतःच्या पायावर उभे राहण्याची धडपड सुरु होती. इंग्रजांनी लुटलेल्या देशात उद्योगधंदे शेती प्रत्येक गोष्ट नव्याने मजबूत करायचे प्रयत्न सुरु होते. मोठमोठी धरणे बांधून शेतीला पाणी पुरवणे हे सर्वात मोठे टार्गेट सरकारने ठरवलं होतं.

ठीकठिकाणी धरणे उभी रहात होती. असच एक धरण पश्चिम बंगाल मध्ये दामोदर नदीवर उभे राहिल होतं. या नदीच्या उद्घाटनाला स्वतः पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू येणार होते. सगळी तयारी झाली होती. माळावर कोंक्रीटचं गोलाकार व्यासपीठ उभारण्यात आलं होतं. हजारो लोक यासोहळा पाहण्यासाठी गोळा झाले होते. यात धरण बांधण्यासाठी राबलेले कामगार देखील होते.

अचानक कोणी तरी साहेब त्या गर्दी मध्ये आला आणि त्याने कामगारांच्या गर्दीतून एका लहान मुलीला बोलावलं आणि तिला तिच्या भाषेत सांगितलं,

“राजाबाबू आणे वाले है. तूम्हे उन्हे हार पेह्नाना है”

त्या पोरीचं नाव होतं बुधनी मेझान. सावळी तरतरीत चेहऱ्याची. वय चौदा पंधरा वर्षे असतील. गरीब आदिवासी संताळ समाजाची. झारखंडमधल्या एखोडबोना या गावातून आई सोबत धरणावर बांधकामाच्या कामासाठी आली होती. बुधनीला नेहरू कोण आहेत हे सुद्धा माहित नव्हत. तिला कोणी तरी राजा येणार आहे त्याचं हार घालून स्वागत करायचं आहे एवढच ठाऊक होतं.

थोड्याच वेळात नेहरू आले. जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. झपझप चालत ते व्यासपीठावर पोहचले. बुधनी समोर आली तिने एक छोटासा हार नेहरूंच्या गळ्यात घातला. नेहरूंनी नेहमीच्या स्टाईलने तो हार काढला आणि तिच्याच गळ्यात टाकला. एवढच नाही तर धरणाच्या उद्घाटनाच बटन देखील तिलाच दाबायला लावलं. जमलेल्या पत्रकारांनी फटाफट फोटो काढले. जनसमुदायापुढे एक जोरदार भाषण ठोकून नेहरू निघून गेले.

सगळ झालं. आपल्याला एवढा मोठा सन्मान मिळाला म्हणून खुश झालेली बुधनी घरी आली. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. त्याच दिवशी रात्री संथाल समाजाची जात पंचायत बसली. जुने शहाणे पंच मंडळी बुधनीच्या विषयावर चर्चा करत होती.

त्यांच्या समोर विषय होता की बुधनीने परपुरुषाच्या गळ्यात हार घातला, त्या पुरुषाने देखील तिच्या गळ्यात हार घातला. याचा अर्थ बुधनीचं लग्न झालं. साध्या शब्दात सांगायचं झालं तर बुधनी मेझान ही देशाचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंची बायको झाली होती. त्यांनी तिला सांगितलं,

“तुझ लग्न एका ब्राम्हणाबरोबर झालं आहे. त्यामुळे तू आमची राहिली नाहीस. तुझ आता आपल्या जातीत लग्न होणार नाही.”

नेहरूंच वय जवळपास सत्तरवर्ष होतं. बुधनी बिचारी चौदा वर्षांची. तिला लग्न म्हणजे काय हे देखील अजून ठाऊक नव्हतं. तिकडे नेहरुंना देखील पत्ता नव्हता की दूर झारखंडमध्ये आपल लग्न डीक्लेर करण्यात आलंय. आदिवासी मुलीला धरणाच उद्घाटन करायची संधी दिली म्हणून मिडियाकडून पाठ थोपटून घेण्यात ते मश्गुल होते.

इकडे बुधनीच्या डोक्यावर आभाळ कोसळलं. तिच्या आईने पंचासमोर पदर पसरल. पोरगीची चूक पोटात घ्यायची विनंती केली. त्यावर काही उतारा आहे का हे विचारलं पण जातीतल कोणी ऐकून घ्यायला तयार नव्हत. बुधनीला जातीतून बाहेर काढण्यात आलं होतं.

समाजाने वाळीत टाकल्यावर गावात देखील तिचा छळ सुरु झाला. कोणी काही काम देत नव्हतं. तिच्या सावलीला देखील कोण उभे राहत नव्हतं. अशा परिस्थितीत फार दिवस तग धरणे बुधनीला शक्य झाले नाही. तिने एखोडबोना गावातून पळ काढला. लांबच्या एका गावी आली. साल्तोर म्हणून एक कोळशाची खाण आहे तिथे रोजंदारीवर काम करू लागली.

तिथेच एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या सुधीर दत्त या बंगाली तरुणाशी लग्न करून तिने संसार थाटला. दोघानाही एक मुलगी झाली. पण ही पोरगी पदरात आली तेवढ्यातच सल्तोरची खाण बंद पडली. परत एकदा हालअपेष्टा सुरु झाल्या. बुधनीच्या समाजाने तिला कधीच परत घेतलं नाही. ती त्यांच्यासाठी नेहरूंची बायकोचं होती.

वर्षामागून वर्षे अशीच अर्धपोटी काढली. तिच्या कष्टानी उभे राहिलेल्या, तिने उद्घाटन केलेल्या धरणामुळे अनेक संसार उभे राहिले पण बुधनीच्या घरात वीज किंवा पाणी देखील पोहचल नव्हतं.  मग कोणत्या तरी वर्तमान पत्रात बुधनीची सगळी माहिती छापून आली. मग तिला प्रसिद्धी मिळाली. लोक मुलाखती घेण्यासाठी तिला शोधत शोधत येऊ लागले. असं करता करता ही माहिती त्यावेळचे पंतप्रधान आणि नेहरूंचे नातू असलेल्या राजीव गांधीना मिळाली.

आपल्या आजोबांची चूक भरून काढण्यासाठी त्यांनी तिला नोकरी दिली. पण काही वर्षांनी ती नोकरी देखील सुटली. आजही बुधनी साठ वर्षापूर्वी घडलेली ती घटना आठवून आपल्या नशिबाला शिव्या घालत असते. तिच्या मागे लागलेलं दुष्टचक्र अजूनही सुटलेलं नाही. 

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.