साखर सम्राटांच्या नगर जिल्ह्यात एक सायकलवरून फिरणारा आमदारदेखील होता !

अहमदनगर जिल्हा म्हणजे साखर सम्राटांचा जिल्हा. सगळीकड सहकाराच जाळ पसरलेलं आहे. निम्मा जिल्हा दुष्काळाने जळलेला पण इर्षेला पडून तालुक्या तालुक्यात साखर कारखाने उभे केले आहेत आणि ते चांगले चालवून देखील दाखवले आहेत. अख्ख्या राज्यात पहिल्यांदा सहकारी साखर कारखाना नगरमध्येच सुरु झाला.

सहकाराच्या माध्यमातून विकास हे गणित नगर जिल्ह्यानेच राज्याला शिकवलं.

उसाच्या पैशाने गब्बर झालेल्या नगरमध्ये एक आमदार असा होता जो पदावर असताना देखील मतदारसंघात सायकलवरून फिरायचा. नाव वकीलराव लंघे पाटील. नेवासा-शेवगाव मतदारसंघ !!

शेवगाव तालुक्यातील शिरसगावचे कॉम्रेड वकिलराव लंघे म्हणजे ऊंच गोरापान वर्ण,डोळ्यावर जाड काड्याचा चष्मा, मलमलचे कपडे आणि दुटांगी धोतर.

पण त्यांची अख्ख्या तालुक्याला ओळख म्हणजे सायकलवरून फिरणारा आमदार अशीच होती.

सत्तरच्या दशकातला काळ, म्हणजे तस बघायला गेल तर गाड्या मोटरसायकली तेव्हा सुद्धा सर्वसामन्यांच्या आवाक्याच्या बाहेरच होत्या. पण त्याकाळात सुद्धा मुलांच्या लग्नात विहिरीमध्ये बर्फ टाकून सरबत बनवणारे आमदार होतेच की. आमदार झालं की दारात नवी कोरी जीप आणून उभा करणारे तेव्हाही काय कमी होते?

पण वकिलराव लंघे ज्या विचारसरणीचे होते त्यात याला थारा नव्हता. त्यांनी स्वतःसाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी पैसा जमवला नाही. आणि कधी असलेल्या पैशावर चैन केली नाही. माणसांच्यात रमणारा हा माणूस. मुद्दामहून साधेपणा दाखवायचा म्हणून सायकलवरून फिरला नाही. आमदार होण्यापूर्वी सायकल वर फिरायचा आणि आमदारकी गेल्यावरही सायकल सुटली नाही.

इतकच काय सायकल पंक्चर काढण्याच साहित्य कायम त्यांच्या सोबत असायचं. बऱ्याचदा शेवगाव तालुक्याच्या लोकांना आडवळणाच्या गावात कुठल्यातरी खडकाळ रस्त्यावर आपला आमदार पंक्चर काढताना दिसायचा.  

सायकलवर असल की पाय जास्त हवेत जात नाहीत , सायकल मला परवडते मी सायकलीला परवडतो

हे त्यांचं ठरलेलं वाक्य होतं.

याचा अर्थ त्यांची ओळख फक्त सायकलपुरती आहे अस नाही. शेवगाव मतदारसंघात त्यांनी केलेली कामे देखील प्रचंड आहेत. रोजगार हमी योजना ही त्यांच्याच डोक्यातील कल्पना हे शेवगाव तालुक्यात अनेकजण छातीठोक पणे सांगतात. शाळा उभारली.कायम पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे फिरत राहणारा हा भटका लोकप्रतिनिधी.

दुष्काळी भागातील शेतकऱ्याला स्वावलंबी कस करता येईल , ऊस तोडणी कामगाराची पोर कशी शिकतील याच चिंतेत असायचा.

त्यांच्या या जनसंपर्कामूळ सहकाराची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात कम्युनिस्ट पक्षाचा कॉम्रेड वकिलराव लंघे पाटील दहा वर्षे आमदार पदी राहिला. तेही यशवंतराव गडाखांसारख्या तगड्या उमेदवाराला हरवून. त्यांना कॉंग्रेसमध्ये या मंत्रीपद देतो अशी ऑफर झाली होती पण त्यांनी नकार दिला.

आज नगरसेवक जरी झाला तरी बुडाखाली मर्सिडीज, बिएमडब्ल्यूची लाईन लावणाऱ्याच्या जगात वकिलराव लंघे पाटलांची गोष्ट म्हणजे दंतकथाच वाटेल, पण अशीही वेडी माणसं होऊन गेली आणि त्यांनीच महाराष्ट्र घडवला हे ही तितकच खरं आहे.

हा किस्सा जेष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांच्या लौकिक या पुस्तकातून घेतला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.