नितीशकुमार यांना बिहारच्या राजकारणात पलटूराम अस का म्हणतात?
काल बातमी आली नितीश कुमार यांनी आपल्या जागा घटल्याने मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला आहे. पण भाजप मात्र नितीश यांनीच मुख्यमंत्री व्हावे म्हणून अडून बसले आहेत. मात्र निकाल लागून चार दिवस उलटले तरी अद्याप कोणीही सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही.
त्यामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कविर्तकांना उधान आले आहे. त्याचे कारण नितीश यांचा भाजप सोबतच राहण्याचा मुड आहे की ते पुन्हा पलटी मारुन बिहीरी जनतेचे पलटूराम होणार ठरु इच्छितात? कारण ते कधी कोणाची साथ सोडून कधी पलटी मारतील आणि कोणाची साथ धरतील हे सांगु शकत नाही. इतिहास असेच सांगतो.
आणि ते फक्त पक्षाची साथ सोडतात असे नाही तर पक्षातील नेत्यांची आणि मुख्य म्हणजे ज्यांचे बोट धरुन ते राजकारणात आले अशा जॉर्ज फर्नांडिस यांची साथ सोडण्यासाठी देखील ते विशेष ओळखले जातात.
जॉर्ज यांनी आणले राजकारणात…
देशात जेव्हा केव्हा नितीशकुमार किंवा जॉर्ज फर्नांडिस या दोघांच्या आयुष्यावरती एखादी बायोपिक तयार केली जाईल किंवा एखादे पुस्तक लिहिले जाईल तेव्हा या दोघांच्या दीर्घ सोबतीच्या उल्लेखाशिवाय ते काम नक्कीच पुर्ण होणार नाही.
याचे मुख्य कारण नितीश कुमार ज्यांच्या हाताला धरुन राजकारणात आले ते जॉर्जच होते. सोबतच आज ज्या जेडीयूचे प्रमुख ते आहेत त्या पक्षाचे संस्थापक आणि प्रमुख एकेकाळी जॉर्ज फर्नांडिस हेच होते.
गोष्ट १९७४ मधील आहे. देशातील अनेक पक्ष आणि नेते इंदिरा गांधींच्या विरोधात एकत्र येत होते. त्यावेळी नितीशकुमार हे देखील जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेतून नवीन नवीनच जेपी आंदोलनाशी जोडले गेले आणि इथूनच त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला.
याच आंदोलनादरम्यान नितीश यांची कर्पूरी ठाकूर, राम मनोहर लोहिया, व्हीपी सिंग आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या राजकीय दिग्गजांची भेट झाली. नितीश – जॉर्जची जोडी इथेच जमली. यानंतर नितीश आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या राजकारणाने बिहारची सगळी समीकरणच बदलली.
जॉर्ज फर्नांडिस यांनी आपल्या करियरची सुरुवात एका वर्तमानपत्रातील प्रूफ रीडर म्हणून केली होती. त्यानंतरच्या काळात समाजवादी पक्ष आणि कामगार संघटनांच्या चळवळीत सामील झाले. आणि त्यांचे नेतृत्व आपल्याकडे घेतले. नंतरच्या काळात राजकारणात देखील आले. लोकसभेत खासदार आणि राष्ट्रीय पातळीवरचे नेते झाले.
नितीश यांच्यासमवेत समता पक्षाची स्थापना
१९७५ नंतरच्या काळात हे दोघेही वेगवेगळ्या मंचांवर आणि अनेक ठिकाणी एकत्र दिसू लागले. फरक इतकाच की जॉर्ज राष्ट्रीय राजकारणात होते ते आधी मुंबई आणि नंतर मुज्जफरपुर इथून जॉर्ज लोकसभेवर होते. तर नितीश यांना राज्याच्या राजकारणात इंट्रेस्ट होता. दोन वेळा विधानसभेला पराभूत होवून देखील ते पुन्हा उभे राहून निवडून आले होते.
१९८९ नंतर नितीश देखील लोकसभेत गेले. आणि राष्ट्रीय राजकारणात उडी घेतली. यानंतर दोघांच्यातील सलोखा वाढतच गेला. १९९४ मध्ये प्रथमच या दोघांनी स्वतःच्या पक्षाची स्थापना केली.
नितीश कुमार आणि १४ खासदारांना सोबत घेत जॉर्ज फर्नांडिस जनता दलाशी फारकत घेतली. आणि १९९४ मध्ये जनता दल (जॉर्ज) ची स्थापना केली. त्याच वर्षी या पक्षाचे नाव बदलून समता पक्ष करण्यात आले.
पुढच्याच वर्षी म्हणजे १९९५ च्या बिहार विधानसभेच्या निवडणुका समता पक्षाने स्वबळावर लढविली, परंतु लालू यांच्यासमोर समता पक्ष केवळ ७ जागा जिंकून पिछाडीवर पडला.
पण दोघांना काळाची पावले ओळखली आणि जॉर्ज यांनी १९९६ मध्ये भाजप सोबत युतीसाठी हात पुढे केला. समता पक्षाने एनडीएत प्रवेश केला आणि केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांचा कार्यभार संभाळला.
१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत समता पक्षाला ८ जागा मिळाल्या, तर १९९८ मध्ये १२ जागा मिळाल्या. वाजपेयींनी जॉर्ज यांना संरक्षणमंत्री केले.
संरक्षणमंत्री म्हणून जॉर्ज कधीकधी सियाचीनमध्ये किंवा दिल्लीच्या वातावरणात होते. या काळात नितीश राज्याच्या राजकारणात आपले स्थान घट्ट करत होते.
अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री जे. एच. पटेल यांनी एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पटेल जनता दलाचे नेते होते आणि या निर्णयामुळे पक्षात मतभेद वाढले. त्यामुळे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा जनता दलापासून वेगळे झाले आणि त्यांनी जनता दल सेक्युलर पक्षाची स्थापना केली.
कारण देवेगौडा यांना कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही मोठ्या राष्ट्रीय पक्षांपासून दूर रहायचे होते. यानंतर जनता दलाचे नेते शरद यादव झाले.
१९९९ च्या निवडणूका पुन्हा जिंकल्या.
१९९९ च्या निवडणूका NDA ने पुन्हा जिंकल्या. अटलबिहारी कॅबिनेटमध्ये जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार आणि शरद यादव यांना प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी दिली होती. नितीश कुमार हे रेल्वेमंत्री, कृषीमंत्री तर जॉर्ज संरक्षण मंत्री होते. या तिन्ही नेत्यांची वाजपेयी मंत्रिमंडळात महत्वाची भूमिका होती
नितीशकुमार मुख्यमंत्री झाले
सन २००० मध्ये भाजपाच्या मदतीने नितीश कुमार पहिल्यांदा ८ दिवसासाठी बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर पोहोचले. पण विश्वासमत जिंकू न शकल्यामुळे राजीनामा द्यावा लागला आणि पुन्हा केंद्रातील मंत्रीमंडळात स्थान मिळाले.
नंतर २००३ मध्ये शरद यादव यांच्या नेतृत्वातील जनता दल, जॉर्ज फर्नांडिस आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील समता पक्ष आणि लोकशक्ती पक्ष यांनी एकत्रित येत जेडीयूची स्थापना केली. आणि बघता बघता २००५ च्या निवडणूकांमध्ये सर्वात जास्त जागा जिंकत जॉर्ज यांनी नितीशना बिहारचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनवले.
आता नाण्याची दुसरी बाजू…
काही ठिकाणी असे ही वाचायला मिळते की लालकृष्ण आडवानी यांनी २००५ च्या निवडणूकांमध्ये नितीशना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केले. जे की जॉर्ज यांना खटकत होते. त्यामुळेच नंतरच्या काळात नितीश आणि जॉर्ज यांच्या दरम्यान बिनसायला सुरुवात झाली. वादाचे प्रसंग उद्भवत गेले.
दोन वर्षात एक वेळ अशी आली की ज्या पक्षाला त्यांनी बनवले होते त्याच पक्षाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक ते यादव यांच्या हातून हारले. पण या मागील खरी खेळी नितीश यांचीच असल्याचे बोलले जाते. त्यांनी जॉर्जना पक्षाच्या अध्यक्षपदावरुन दुर करण्यासाठी शरद यादव यांना मदत केली.
तेव्हापासूनच जॉर्ज राजकारणातुन साईडलाईन होत गेले.
पुढे २००९ मध्ये पक्षाने जॉर्जना निवडणूकीचे तिकीट देखील दिले नाही. प्रकरण इथेच थांबले नाही. जॉर्जनी पक्ष सोडत मुजफ्फरपुरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. परंतु जेडीयुच्या उमेदवाराकडूनच पराभव स्विकारावा लागला. यानंतर ते सार्वजनिक आयुष्यातुन देखील दिसेनासे होत गेले.
या पराभवानंतर परिस्थिती अशी आली की दिल्लीमध्ये राहण्याची देखील सोय नव्हती. मित्रांनी भाड्याचे घर शोधण्यास सुरुवात केली. मात्र याच दरम्यान नितीश यांना काय प्रचिती आली त्यांनी जॉर्जना राज्यसभेवर पाठवले. पण त्याच दरम्यान त्यांना अल्जायमरने गाठले. आणि पुन्हा सार्वजनिक आयुष्यातुन दूर होत एकटेपणा वाट्याला आला.
जॉर्ज फर्नांडिस आणि नितीशकुमार यांचे राजकारण जाणणारे पत्रकार मनोज कुमार म्हणतात की,
अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने केंद्र सरकार ज्या पद्धतीने योजना चालवित आहे, तसे बिहारमध्ये नितीश कुमार जॉर्ज यांच्या नावावर कोणतीही योजना का चालवू शकल्या नाहीत.
लोहियाच्या नावावर योजना चालविल्या जातात तर बिहारमध्ये जॉर्ज सायकल योजना, जॉर्ज स्वस्त धान्य योजना, जॉर्ज रूरल बस सेवा का सुरू करू शकले नाहीत. शाळा, महाविद्यालय, पूल, रुग्णालयाचे नाव जॉर्जच्या नावावर का असू शकले नाही?
मात्र ज्या प्रमाणे २०१० मध्ये कोणत्या तरी प्रचिती नंतर जसे जॉर्ज ना राज्यसभेवर पाठविले तसेच मागील वर्षी त्यांच्या मृत्युनंतर नितीशना पुन्हा जॉर्ज यांची आठवण आली. बिहारमध्ये त्यांचा पुतळा उभा करण्याची घोषणा केली. कोरोना काळात याचे ऑनलाईन उद्घाटन देखील झाले.
परंतु एक गोष्ट मात्र खरी की राजकीय जीवनात फर्नांडिस सर्वात जास्त नितीश कुमारांसोबत राहिले आणि त्यांच्यामुळेच ते आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये एकटे पडत गेले. त्यामुळे विश्वासाचा साथीदार म्हणून बिहारच राजकारण त्यांच्याकडे बघत नाही.
हे ही वाच भिडू.
- हार कर भी जितने वाले को नितीश कुमार केहते है
- कंगनाच्या पिक्चरचा हिरोच नितीश कुमार यांच्यासाठी पनौती ठरलाय !!
- भाजप-जेडीयू युती तुटणार होती पण एका माणसाने ठरवलं नितीश कुमार मुख्यमंत्री होतील