इलेक्शन आणि क्रिकेट सुरु असताना त्यांच्यापेक्षा जास्त हिट झालेली गोष्ट… वोडाफोन झूझू

२००९ साल होतं. भारतात एकाचवेळी दोन गोष्टींचा दंगा सुरू होता. लोकसभा निवडणूका आणि आयपीएल. बीसीसीआयनं टी२० क्रिकेटला जाहिरातीच्या सोन्यानं मढवून काढत आयपीएलचं मॉडेल लोकांच्या समोर ठेवलं आणि ते सुपरहिटही ठरलं.

पहिला डाव यशस्वी ठरला असला, तरी दुसरा डाव हिट जातोय का फ्लॉप यावर गणित अवलंबून असतंय. आयपीएलचे तेव्हाचे सर्वेसर्वा ललित मोदी यांनी थेट सरकारला नडत आयपीएल घेऊन दाखवण्याचा चंग बांधला होता.

देशात आयपीएल आणि लोकसभा निवडणूक एकाच कालावधीत येण्याची शक्यता होती. साहजिकच सुरक्षाव्यवस्था पुरवण्यावरुन राडा झाला आणि आयपीएल गेलं साऊथ आफ्रिकेला.

आयपीएल म्हणजे काय फक्त क्रिकेटचाच विषय राहिला नव्हता, खोऱ्यानं पैसा येत होता आणि हे ओळखलेलं जाहिरातदारांनी. या जाहिरातदारांमधलं महत्त्वाचं नाव होतं ‘वोडाफोन.’ भारतातल्या लोकांच्या हातात बटणवाले मोबाईल आले होते. Hi, 143, असल्या मेसेजेसला मार्केट येत होतं. जोक्स पाठवायला व्हॉट्सअप नव्हतं आणि वोडाफोननं हे सगळं हेरलं होतं.

त्यांच्या स्कीमा लोकांपर्यंत पोहोचवल्या होत्या, त्या जाहिरातींनी. Hutch कंपनी टेकओव्हर केल्यानंतरही व्होडाफोननं कुत्रं असलेली जाहिरात करणं सोडलं नाही.

ही जाहिरात इतकी हिट झाली होती, की पग जातीच्या कुत्र्याला लोकं वोडाफोनचं कुत्रं म्हणू लागली होती आणि अजूनही म्हणतात.

सारखं सारखं खाल्ल्यावर जसं बाहेरचं जेवण बोगस लागतं, तसंच जाहिरातींचंही होतं. त्यामुळं वोडाफोन कायतर नवं करण्यासाठी आतुर होती.

यातूनच जन्म झाला तो झूझूचा…

वोडाफोननं जाहिरातींचं काम जगप्रसिद्ध ऑगिल्वी कंपनीला दिलं होतं. यांनीच पगची जाहिरात हिट केली होती, पण आत्ताचं आव्हान मोठं होतं. इलेक्शनच्या धडाक्यात लोकं क्रिकेट कितपत बघणार याचं टेन्शन होतंच, त्यामुळं जेवढे बघतील त्यांच्या लक्षात जाहिरात राहणं गरजेचं होतं.

आयपीएल सलग ४०-४२ दिवस चालणार होती आणि व्होडाफोनची जाहिरात नाही म्हणलं, तरी प्रत्येक ओव्हरच्या नंतर दिसणार होती. विषय गंभीर होता, पण ऑगिल्वीनं खंबीरपणे निर्णय घेतला की, दिवसाला दोन नव्या जाहिराती दाखवायच्या.

ऑगिल्वीचे व्होडाफोनसाठीचे क्रिएटिव्ह हेड राजीव राव यांनी एका ड्रॉईंग बोर्डवर एक ना धड प्राणी आणि ना धड माणूस असणाऱ्या जीवाचं चित्र काढलं. त्यांच्या टीमनं या जीवाला धरुन छोट्या छोट्या कथा लिहिल्या. एक गोष्ट तर ठरली, की याच जीवाशी निगडित ४४ जाहिराती दिसणार… पण खरा टास्क होता या जाहिरातींना मूर्त स्वरूप देण्याचा.

बऱ्याच लोकांना वाटत असेल, की आपल्याला जाहिरातीत दिसणारे झूझू हे ॲनिमेशन आहेत…

तर भावांनो आणि बहिणींनो तुम्ही गंडलाय. सुरुवातीला आपल्याला दिसलेल्या झूझूच्या जाहिरातीमध्ये ॲनिमेशन नव्हतंच. २००९ ची आयपीएल झालेली साऊथ आफ्रिकेत, झूझूच्या जाहिरातींचं शूटिंग करायला ऑगिल्वीच्या कार्यकर्त्यांनीही साऊथ आफ्रिका गाठली.

झूझूच्या उंचीला शोभतील अशी बारीक उंचीची माणसं शोधण्यात आली. त्यांना झूझूचे ड्रेस घालून शूटिंग केलं, पण बाकीच्या गोष्टी ॲनिमेटेड दिसतील याची काळजीही घेतली. आयपीएलची पहिली मॅच काही दिवसांवरच आलेली आणि तेव्हा झूझूची पहिली जाहिरात  तयार झाली.

ही जाहिरात जेव्हा टीव्हीवर झळकली तेव्हा सगळ्यांच्याच पसंतीला उतरली. कारण झूझूला भाषा नव्हती, त्यांना फक्त न समजणारा आवाज होता. 

त्यांचे आकार वैगेरे थोडे वेगळे होते, पण असं वाटायचं की ही माणसं आपल्यातलीच आहेत.

झुझूच्या जाहिरातीमधून वोडाफोननं थेट आपलं प्रॉडक्ट विकत घ्या असं सांगितलंच नाही, जाहिरातीच्या शेवटी त्यांच्या सर्व्हिसचा एक छोटासा मेसेज तेवढा स्क्रीनवर दिसायचा. 

रोज नवीन जाहिरात दिसत असल्यानं आज काय दाखवणार या उत्सुक्तेपोटी लोकं पण टीव्हीसमोर ‘जाहिरात बघायला’ बसू लागली.

पुढच्या काही वर्षांत मोबाईलवर व्हिडीओ दिसायला लागले. डबिंग करुन कॉमेडी करता येऊ शकते हे लोकांना नव्यानं कळलं. मग भाषा नसलेल्या झुझूचा आवाज कुठं हिंदी झाला, तर कुठं गुजराती. काही वाढीव भिडूंनी मराठीत डब करत शिव्यांचा तडका दिला आणि… 

‘रम्याकडं द्या ना फोन’ म्हणणारा झूझू एमपी फोर मोबाईलमधून सगळ्या महाराष्ट्रात फेमस झाला.

झूझूनं मार्केट खाल्लं कारण ते आता टीशर्ट, कप आणि बॅनर्स सगळीकडे दिसू लागले. यांना झूझू म्हणतात हे माहीत नसणारी निम्मी जनता आजही त्यांना वोडाफोन म्हणूनच ओळखते.

पुढं २०१३ मध्ये झूझू रिक्रिएट करताना निमेशन वापरण्यात आलं. पण झूझूची जादू काय कमी झाली नाही. एक भाषा नसलेला, प्रमाणबद्ध आकार नसलेला जीव लोकांना आपला वाटला आणि तो सुपरहिट ठरला. दिवसाला नवी जाहिरात दाखवायचा आणि त्यातही असा काहीतरी प्राणी आणायचा, हि आयडिया लोकांना आवडेल का नाही, ही मोठी रिस्क होती. 

ऑगिल्वीनं ही जाहिरात पडली, तर बॅकअप म्हणून पगच्या जाहिरातीही तयार ठेवल्या होत्या.

पण आयपीएल आणि इलेक्शन या दोघांनाही मागं टाकत झूझूनं सिक्सर मारला जो लोकांना इतका आवडला की, 

फक्त झूझूची जाहिरात बघून लोकांनी वोडाफोनचं सिम घेतलं… ते आजही कायम आहे.

इथपर्यंत आला आहात, तर झूझूच्या मागचे खरे चेहरेही बघून घ्या…

WhatsApp Image 2022 04 21 at 8.08.32 PM
Source: https://techpp.com/2009/05/14/making-of-vodafone-zoozoo-ads-and-the-real-faces-behind-zoozoos/

 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.