कॉम्प्युटरमध्ये बाप गेम्स असूनही आपली दुनिया ‘MS Paint’च्या चौकटीतच अडकली होती…

साधारण २००७ नंतरची गोष्ट आहे. भारतात कॉम्प्युटर ही गोष्ट सामान्य झाली होती, म्हणजे अगदी घराघरात कॉम्प्युटर आले नसले, तरी शाळांमध्ये कॉम्प्युटरचा तास असायचा. पोरं शूज-बिज काढून इमानदारीत कॉम्प्युटर लॅबमध्ये जायची. कॉम्प्युटर उघडल्यावर सगळ्यात पहिलं काय ओपन करायचं, तर ‘पेंट’.

आपल्या चित्रकलेच्या वह्यांची पानं रिकामी असायची, जी काय कला ओसंडून वाहायची ती वहीच्या मागच्या पानावर आणि कॉम्प्युटरच्या तासाला पेंट उघडल्यावर. बऱ्याच पोरांच्या आयुष्यात पेंटची एंट्री झाली ती ‘MS-CIT’ च्या क्लासमध्ये. तिथं वर्ड, एक्सेल असं बरंच मटेरियल शिकायला मिळालं पण नाद लागला तो पेंटचाच.

आता हे पेंट काय होतं?

तुम्ही म्हणाल, भिडू आम्हाला माहीत नसेल का? पण एकदा उजळणी करायला काय जातंय. तर पेंट हे मायक्रोसॉफ्ट विंडोजचं इनबिल्ट प्लिकेशन. ज्यात आपण चित्र काढू शकतो, चित्र रंगवू शकतो, लय अंतरंगी किडे करु शकतो. त्यात चौकोनी घर, त्याला चौकोनी खिडकी, मागे डोंगर, पक्षासारखे दिसणारे ४ आकडे, पुढं नदी आणि वारली पेंटिंगला लाजवतील अशी माणसं हे टिपिकल चित्र सगळ्यांनी काढलं असणार फिक्स.

एवढं वाचून नॉस्टॅल्जिक झाला असाल, तर लगेच कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप उघडून बसू नका. आधी सगळं वाचा, मग पेंट उघडण्यात मजा आहे.

पेंटचं पहिलं नाव होतं, मायक्रोसॉफ्ट ब्रश. १९८५ मध्ये पहिल्या विंडोज सोबतच ‘विंडोज पेंट’ लॉंच करण्यात आलं. आपण जसे पहिलीतून दुसरीत गेलो, अगदी तसंच १९९० मध्ये विंडोज पेंट अपग्रेड झालं आणि त्याला नाव मिळालं पेंटब्रश. गाजलेलं विंडोज अपडेट म्हणजे ‘विंडोज ९५’ यातही पुन्हा एकदा नाव बदलण्यात आलं, आता नाव ठरलं पेंट. याच नावानं पेंट सुपरहिट झालं. २००७ मध्ये विंडोज विस्टा सोबतच पेंटमध्ये अनेक बदल करण्यात आले. आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग फुटत होते आणि त्याचवेळी ब्लॅक अँड व्हाईट असणारे टीव्ही, कॉम्प्युटरच्या स्क्रीन्सही रंगीत झाल्या होत्या. साहजिकच आता कॉम्प्युटरवर चित्रं काढताही येत होती आणि रंगवताही.

भारतातल्या एका पिढीतल्या कित्येकांनी टीव्ही आधी शेजारच्यांच्या घरी जाऊन पाहिला आणि मग स्वतःच्या घरी टीव्ही आला. कॉम्प्युटरचंही तसंच झालं, पोरांनी आधी कुठल्यातरी मित्राच्या घरी आणि शाळेत कॉम्प्युटर पाहिले आणि मग ते घरी आले. आता कॉम्प्युटर घरी आल्यावर त्याच्यावर लगेच गेम खेळायला घेतल्या, तर घरातल्यांच्या शिव्या पडल्या असत्या, त्यामुळं पोरं अभ्यासाच्या नावाखाली पेंट उघडून बसायची.

या पेंटमध्ये काय होतं?

तर राखाडी रंगातलं टूलकिट असलेला इंटरफेस, त्याच्या शेजारी आपलं बालपण रेखाटण्यासाठीची  पांढरी स्क्रीन. या टूलकिटमध्ये स्प्रे, ब्रश, पेन्सिल, कलर फिलर, सिलेक्ट टूल, टेक्स्ट बॉक्स असे कित्येक पर्याय होते. पार नुसत्या चौकोनापासून, आपलं आणि शाळेतली पोरं जिच्या नावावरुन चिडवतात तिचं नाव लिहिण्यापासून, अगदी प्रॉपर चित्र काढणंही पेंट वर शक्य होतं. पण निम्म्यापेक्षा जास्त पोरं पेंट वहीच्या मागच्या पानावर जितकी चित्रकला जमते, तेवढीच करायला वापरायची.

पेंट फक्त बारकी पोरंच वापरायची असं नाही, तर फोटो सेव्ह करायला, उगाच फोटो खाली कायतर दवणीय लिहायला मोठी माणसंही पेंटचा वापर करायची. आजही कधी ग्राफिक डिझाईनर शेजारी बसलात आणि त्यानं हजारातून एखाद्या वेळेस पेंट उघडलं की आपल्याला उगाच भारी वाटतं. कारण ते एकमेव ॲप्लिकेशन असं असतंय ज्यातली आपल्यालाही थोडीफार अक्कल असते.

पेंटचा नॉस्टॅल्जिया काय लेव्हलचा आहे, तर राडा होण्याइतका…

बोटांखाली कीबोर्ड आहे भिडू खोटं नाय बोलणार. झालं असं की, २०१७ मध्ये मायक्रोसॉफ्टनं आपल्या लेटेस्ट अपडेटमधून पेंट काढून टाकण्याचा निर्णय घेतला.पण हा निर्णय काय लोकांना रुचला नाही. बातमी जशी बाहेर आली, तसं लोकांनी लावून धरलं की पेंट पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता तुमच्या डेस्कटॉपवर विंडोज टेनच्या अपडेटमधलं पेंट दिसत असेल किंवा त्यानंतर आलेले अपडेट. लोकांना पेंट आवडतं हे मायक्रोसॉफ्टच्याही डोक्यात फिट बसलंय त्यामुळं त्यांनीही पेंटचं श्रीडी व्हर्जन मार्केटमध्ये आणलं.

लिहिता लिहिता आम्हीही जरा पेंट उघडून पाहिलं, नव्या पेंटमध्ये आधीसारखी मजा नाय… म्हणजे वाढीव वाढीव फीचर्स आहेत, पण सिम्पल गोष्टी तेवढ्या नाहीत. पेंट थ्रीडीचं म्हणाल, तर त्यात निम्म्यापेक्षा जास्त गोष्टी हलतानाच दिसल्या आणि आपल्या डोक्याचा पार भुगा झाला. त्यामुळं आम्ही जुनं पेंट शोधून काढलं. तिकडं सगळं जुनं जुनं दिसलं आणि आम्ही जरा जास्तीच नॉस्टॅल्जिक झालो, नेमकं कानावर अल्ताफ राजाचं गाणं पडलं आणि आम्ही डायरेक्ट चित्र काढून मोकळे झालो.

chitra
जज करु नका मनापासून काढलंय

आता आमचं चित्र बघून तुम्हाला वाटलं असेल, की फक्त हौशी कलाकारच पेंट वापरतात, तर हा तुमचा गैरसमज आहे, अनेक वाढीव चित्रकार कार्यकर्ते असे आहेत, जे पेंटचा वापर करुन अगदी विषय खोल चित्रं काढतात. अशी चित्रं आपल्याला साध्या कागदावरही जमायची नाहीत. अगदी बेसिक पर्याय असलेलं पेंट ते इतकं भारी वापरतात, की त्यापुढं फोटोशॉप फिकं पडेल. आता असते एकेकाच्या हाताला कला, त्याचा आपण कशाला लोड घ्यायचा. वाचून चित्र काढायची इच्छा झाली असेल, तर लगेच लॅपटॉप कुठं हुडकायचा म्हणून किंवा उद्या ऑफिसला गेल्यावर नक्की काढू म्हणून इच्छा मारु नका…

हे घ्या- लिंक  (लिंक शब्दावर क्लिक करा) आणि मोबाईलवरच चित्रकला बहरू द्या.

भिडू… अपने अंदर का आर्टिस्ट फटके बाहर आने दे…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.