गुजराती मारवाडी नाही तर मुंबई उभारण्यात या समाजांचा खरा वाटा आहे

महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव आहे असल्याचे आरोप गेली अनेक केला जातोय. मात्र, आता पुन्हा एकदा हा विषय पुढे येण्याचे कारण म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई संदर्भात केलेले वादग्रस्त वक्तव्य. 

गुरुवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही. मात्र मुंबईचा इतिहास पाहिला तर गुजराती, मराठवाडी समुदायचं नाही कोळी, भंडारी सारख्या अनेक समुदायांनी मुंबई उभी राहण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

कोळी

मुंबईची संस्कृती आणि चव टिकवण्यात ज्या समाजानं महत्त्वाची भूमिका बजावली यात प्रामुख्याने कोळी समाजाचं नाव घेतलं पाहिजे. मुंबईचा आद्य रहिवासी असण्याचा मान कोळी समाजाकडं जातो. मुंबईच्या किनारपट्टीवर ४५ कोळीवाडे आणि १०० गावठाणे असल्याचे सांगितलं जातं.

ब्रिटिशांनीदेखील कोळी समाजाला मान देत गिरगाव चौपाटीवर मोकळ्या जागांवर बोटींचे नांगर टाकायला परवानगी दिली होती. कोळी समाजाच्या संस्कृतीला हात लावायचा नाही हा नियम ब्रिटिशांनी पाळला. कोळी समाजाने १८ व्या शतकापासून मासेमारी करण्यासाठी कर देत मुंबईच्या उत्पन्नात भर टाकत होता.

मुंबादेवी वरूनच मुंबई असे नाव पडल्याचे सांगितलं जात. कोळी समाज या देवीची पूजा करतो. 

५०० वर्षाहून अधिक काळ कोळी समाज मुंबईत राहत असल्याचे सांगितलं जात. मुंबई आणि आसपासच्या भागात ५ लाखांहून अधिक कोळी लोक राहत असल्याचे सांगितलं जात.  मुंबईतील काही सुप्रसिद्ध परिसरांची नावे कोळी समाजातून आली आहेत, जसे की वरळी आणि डोंगरी.

भंडारी

भंडारी समाज हा मूळच्या मुंबईतील एक आहे. भंडारी समाजाच्या अनेक जागा मुंबईत आहेत. काळबादेवी परिसरात भंडारी स्ट्रीट त्यापैकीच एक आहे. तेथे भंडारी समाजाचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. भंडारी सैनिक आणि शेतकरी होते. समाजातील गरीब लोक जे दारूचे दुकान चालवत. काही काळानंतर हळूहळू भंडारी समाजातील इतर लोक वेगेवेगळे व्यवसाय करू लागले. 

एस. एम. अडवर्डस यांनी १७ व्या शतकात बॉम्बे सिटी पोलीस नावाचे पुस्तक लिहले आहे. गव्हर्नर गेराल्ड ऑन्गियर यांनी रात्रीची गुन्हेगारी रोखण्यासाठी एक पथक स्थापन केले होते. त्यात भंडारी समाजातील लोकांना घेण्यात आल्याचा उल्लेख आहे.

डच, पोर्तुगीज, मुघल यांच्या पासून ईस्ट इंडिया कंपनीला संरक्षण मिळावे म्हणून भंडारी समाजाची मदत घेतली असल्याचे यात संदर्भ आहेत. 

भंडारी समाजाची एक बटालियन सुद्धा तयार करण्यात आली होती. त्यात ४८ अधिकारी आणि ४०० कर्मचारी होते. आर्थिक मागासलेपणामुळे या समाजाला ओबीसीचा दर्जा देण्यात आला आहे.

पठारे प्रभू

पठारे प्रभू हा समुदाय लहान असला तरीही १९ शतकाच्या मध्यापर्यंत प्रबळ होता. गावातून शहरात स्थलांतर झाल्यानंतर या समाजाने अगोदर मराठा साम्राज्य आणि नंतर ब्रिटिशांच्या कार्यकाळात प्रशासक म्हणून महत्वाची भूमिका बजावल्याचे पाहायला मिळते. पठारे प्रभू हा समाज कुठल्या व्यवसायात डॉमिनंन्ट नव्हता. मात्र,  कपड्यांच्या ट्रेंड ठरविण्यात यांची मुख्य भूमिका राहिली आहे. त्याचबरोबर परफॉर्मिंग आर्ट आणि सांस्कृतिक ट्रेंड सेट करण्यातही पठारे प्रभू समाज पुढे होता.

१३ व्या शतकात पठारे प्रभू समुदाय गुजरात वरून मुंबईत आला. पळशीकर ब्राह्मण आणि पाचकळशी यांसारख्या इतर गटांसोबत पठारे प्रभू हे मुंबई शहरातील पहिले स्थलांतरित होणर्यापैकी एक आहेत.  

पोर्तुगीजांच्या काळ वगळता पठारे प्रभूंनी इतर सरकार मध्ये प्रशासनात मोठ्या पदावर काम केले. या काळात त्यांनी चांगली संपत्ती जमा केली. भाऊ-चा-धक्का, महालक्ष्मी मंदिर, ठाकूरद्वारचे गोरा राम मंदिर आणि काळा राम मंदिर, दादरचे प्रभादेवी मंदिर, दादरचे कीर्तिकर मार्केट इत्यादी ठिकाण पठारे प्रभू या समाजाने बांधले आहेत आजही अस्तित्वात आहे.

कोकणी मुस्लीम

व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या अरबांनी कोकणच्या किनाऱ्यावर वसाहती केल्या. ते कोकणी मुसलमान म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्थानिक महिलांशी विवाह केल्यामुळे तसेच काही हिंदूंनी धर्मांतर केल्यामुळे मुस्लिमधर्मीयांची लोकसंख्या कोकण किनाऱ्यावर वाढली, मात्र त्यांची आडनावे हिंदूंप्रमाणेच आहेत.

१५३३-३४ च्या सुमारास आलेल्या पोर्तुगीजांनी व नंतर इंग्रजांनी अरबांचा व्यापार बुडविला. मग उपजीविकेसाठी ठाणे, कल्याण, मुंबई येथे आलेले मुसलमान हे खाटीक, शिल्पकारागिरी, रंगारी, लोखंड व्यवसाय, भंगार व इतर व्यवसाय करू लागले.

१८ व्या शतकाच्या सुरूवातीस माहीममध्ये  मुस्लिमांनी स्थायिक होण्यास सुरुवात केली. त्यांनी अगोदर जहाजांची मालकी मिळविली आणि खलाशी म्हणून संपत्ती जमा केली. व्यापारी आणि जहाजमालक म्हणून मुंबईच्या इतिहासात कोकणी मुस्लिमांचे मोठे योगदान आहे. कोकणी मुस्लिम नंतर मुंबईच्या मूळ भागात स्थायिक झाले, जिथे डोंगरी किल्ल्याभोवती जामा मशीद बांधली.

तमिळ

दक्षिण भारतातूनही अनेक समुदाय कामाच्या शोधात मुंबईत आले. त्यापैकी एक म्हणजे तामिळ लोकं. मुंबईतील धारावी, माटुंगा, सायन, चेंबूर सारख्या भागात तामिळ नागरिकांची संख्या अधिक आहे. तमिळ लोकं माटुंगा आणि धारावीला विशेष महत्व देतात.

इथले लहान मोठे उद्योग वाढवण्यात तमिळ लोकांचे मोठे योगदान आहे.  या भागात अनेक तमिळी लोकांनी आपले भविष्य घडविले आहे. त्यांनी मोठी नावे असलेली गावे सोडली आणि मुंबईत स्थायिक झाले.

२५ लाख तामिळ लोक मुंबईत स्थानिक झाल्याचे सांगितलं जात.

पारशी

मुंबई घडविण्यात इतर समुदाय प्रमाणे पारशी समुदायाचा मोठा वाटा आहे. १० व्या शतकात पर्शियाच्या  मुस्लीम शासकाच्या धार्मिक छळापासून वाचण्यासाठी पारशी लोकांनी इराण मधून स्थलांतर करायला सुरुवात केली होती.

इंग्रज सरकारच्या प्रोत्साहनमुळे पारशी लोक १७ व्या शतकात मुंबईत आले. 

या काळात पारशी लोक व्यवसाय करू लागले. इंग्रजी शिक्षण घेणाऱ्यातील ते पहिले होते. कायदेशीर सल्लागार, वैद्यकीय शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात पाय पसरू लागले. मुंबईतील पारशी समुदायात ९८.६ टक्के साक्षरतेचे प्रमाण आहे. 

मुंबईतील दादर पारशी वसाहत ही सर्वात मोठी आहे. तिथे १५ हजार पारशी लोकांचे घर आहेत.  आर्थिक बाबतील पारशी समुदायाचे मोठे योगदान राहिले आहे. मुंबई सारख्या शहराच्या कानाकोपऱ्यात इराणी कॅफे, हॉटेल, बेकरी सारख्या व्यवसायाने शहराच्या विकासाला चालना दिली. 

जहागीर आर्ट गॅलरी, ताज हॉटेल हे ठिकाण मुंबईतील पारशी संस्कृतीची झलक दाखवतात. 

पारशी समाजातील मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे संस्थापक सर सोराबजी नुसेरवानजी पोचखानवाला, राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य फिरोजशाह मेहता, देशातील पहिली बँक स्थापन करणारे कावासजी नानाभॉय दावर यांचा समावेश आहे.

ईस्ट इंडियन

कोळी समाजाप्रमाणेच मुंबईतल्या गावठाणांमध्ये ईस्ट इंडियन समाजही अनेक वर्षांपासून स्थायिक आहे. मराठी-कोंकणी शब्दसंपत्तीचा भरणा असलेली, कोंकणी हेल असलेल्या भाषेत ईस्ट इंडियन समाज संवाद साधला जातो. 

ठाण्यापासून डहाणू, कल्याण, वसई, भाईंदर, उत्तन-गोराई, मालाड, वर्सोवा, कालिना, पार्ले व वांद्रे अशा विस्तीर्ण भूभागात ‘ईस्ट इंडियन कॅथलिक’ हा समाज पूर्वी पासून राहतो.

सोळाव्या शतकात भारतात आलेल्या पोर्तुगीजांच्या काळात हिंदूंमधील कोळी, कुंभार, परीट, सुतार, न्हावी, भंडारी, कुणबी इत्यादी जातींमधून ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या लोकांना  इंडियन नावाने ओळखलं जात. पोर्तुगीजांच्या सान्निध्यामुळे हा समाज शिक्षणाच्या प्रवाहात फार लवकर आला.  इंग्रजांनी आपल्या मुलकी सेवेत या समाजाला प्राधान्य दिले.

गुजराती

मुंबईची स्थापना झाल्यापासून गुजराती लोकं इथं राहत असल्याचे सांगितलं जातं.  आज मुंबई शहरात गुजराती भाषिक लोकसंख्या देशातील पाचव्या क्रमांकावर आहे. मुंबईतील गुजराती समाजातील व्यापाऱ्यांचे शहराशी अनेक पिढ्यांपूर्वीचे संबंध आहेत. अनेक गुजराती लोक तर काही स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे मुंबईत राहतात. बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये गुजरात आणि महाराष्ट्राचा काही भाग एकाच राज्याचे भाग होते.

१९६० मध्ये झालेल्या राज्यांच्या पुनर्रचनेनंतर मुंबई महाराष्ट्रात आली आणि खऱ्या वादाला सुरुवात झाली. आजही आर्थिक क्षेत्राबरोबर मुंबईत मोक्याची ठिकाणी गुजराती समुदायाचे वर्चस्व पाहायला मिळते. 

मुंबईत अनेक भागात गुजराती लोकांचं वर्चस्व आहे. निवडणूक काळात ही व्होट बँक आपल्याकडे वळावी यासाठी प्रत्येक पक्ष लक्ष ठेऊन असतो. मुंबईतील धान्य, कापड, कागद आणि धातूच्या व्यापारात गुजरातींचे वर्चस्व आहे. मुंबईतील ९० टक्के हिरे व्यापारी हे गुजराती समाजाचे आहेत. शेअर मार्केट मध्ये सुद्धा गुजराती लोक पुढे आहेत.

दाऊदी बोहरा

दाऊदी बोहरा समाजाकडे व्यवसायाचा मोठा वारसा आहे. देशातच नाही तर परदेशातील या समाजाचे नेटवर्क आहे. जगभरात १० लाख लोक या मार्फत जोडले गेले आहेत. त्या मार्फतच दाऊदी बोहरा समाज व्यवसाय करत असतात.

दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट मध्ये दाऊदी बोहरा समुदायाचे वर्चस्व आहे.  मुंबईत ६५ हजारांपेक्षा अधिक दाऊदी बोहरा लोक राहतात. 

यावरून समजून येते की, मुंबई घडविण्यात फक्त गुजराती, मारवाडी लोकांचा हात नसून इतरही समाजाचे योगदान मोठे आहे. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.