पक्ष प्रवेश, डावललेल्यांना बळ: उद्धव ठाकरे ४० बंडखोरांचा करेक्ट कार्यक्रम आखत आहेत

मुख्यमंत्रीपद गेलं. सत्ता गेली. उद्धव ठाकरेंना ६२ पैकी ४० आमदार सोडून गेले. १८ पैकी १२ खासदार एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले. त्यानंतर पक्षाचं चिन्ह गोठवलं गेलं आणि आता पक्षाचं नाव देखील-उद्धव बाळासाहेब ठाकरे असं बदलून घ्यावं लागलं. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात इतका मोठा राजकीय सेटबॅक कदाचितच कोणत्या नेत्याला सहन करावा लागला नसेल.

मात्र हे सर्व आता वास्तव आहे हे लक्षात घेउनच उद्धव ठाकरे यांना त्यांचा पक्ष किंवा गट पुन्हा उभारावा लागणार आहे. गेल्या काही दिवसातील ठाकरे गटाच्या हालचाली बघितल्या तर पुन्हा पक्ष उभारणीचं काम उद्धव ठाकरे यांनी जोमाने सुरु केल्याचं दिसतं.

यातील पहिली स्ट्रॅटेजी त्यांनी वापरली आहे ते म्हणजे बंडखोरांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार तयार करायचा.

गेल्या काही दिवसातील बातम्या बघितल्या तर मातोश्रीवर रोज कोणचा ना कोणाचा प्रवेश होता. मात्र यातील जर काही महत्वाची नावं बघितली तर उद्धव ठाकरे गट हे प्रवेश पद्धतशीरपणे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेलेल्या आमदारांच्या विरोधात पद्धतशीरपणे घडवून आणल्याचं लक्षात येतं.

आज याच दृष्टीने एक महत्वाची भेट मातोश्रीवर झाली.महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आल्या होत्या.

स्नेहल जगताप यांची भेट यासाठी देखील महत्वाची आहे कारण एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या त्या कट्टर विरोधक आहेत.

सुनील प्रभू यांना हटवून शिंदे गटाने शिवसेनेचे विधिमंडळ मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली होती. भरत गोगावले हे रायगडमधील महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर तीन टर्म आमदार आहेत. २००९ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांचा पराभव करुन ते आमदार झाले आणि याच माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांना पक्षात घेण्यासाठी मातोश्रीवरून जोरदार प्रयत्न चालू असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यासाठीच स्नेहल जगताप यांची उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

बांधोखोरांच्या विरोधकांना पक्षात प्रवेश देण्याच्या स्ट्रॅटेजिनुसार २० ऑक्टोबरला असाच एक महत्वाचा प्रवेश उद्धव ठाकरे गटात झाला होता. डिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख यांनी  शिवसेनेते प्रवेश केला. यवतमाळच्या डिग्रस मतदारसंघातून सध्या राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे आमदार आहेत. मात्र त्यांनी आणि यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे.

त्यामुळे संजय राठोड यांचे कट्टर विरोधक असलेल्या संजय देशमुख यांना उद्धव ठाकरेंनी भाजपातून आपल्याकडे खेचले आहे.

संजय देशमुखांना मात देत सध्या संजय राठोड यांचे मतदारसंघात वर्चस्व आहे. मुळात हे दोघेही शिवसेनेतूनच पुढे आले आहे.दोघेही जिल्हाप्रमुख होते. संजय देशमुखांनी १९९९ ते २००९ असे १० वर्ष दिग्रस मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.

विशेष म्हणजे दोन्हीवेळी त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता.मात्र २००९ मध्ये संजय राठोड यांच्याकडून पराभवानंतर संजय देशमुख मतदारसंघाच्या राजकारणात मागे पडले. मात्र दिग्रसमधील नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ अशा ठिकाणी प्रत्येकदा देशमुखांनी आपली ताकद दाखवली आहे.२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत ७५ हजार मतदान घेतले होते.

त्यामुळे संजय राठोड यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाने एक महत्वाचा मोहरा पुढं केला आहे. त्याचबरोबर संजय राठोड यांच्या बंजारा व्होट बँकेला काउंटर करण्यासाठी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे यवतमाळ हा सेनेचा बालेकिल्ला म्हणून पुन्हा मिळवण्यास उद्धव ठाकरेंनी कंबर कसल्याचं सांगण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यात झालेल्या झडपडीला भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी असेच प्रयत्न चालवले आहेत. खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे यांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

अशावेळी पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच असलेल्या बाळासाहेब दांगट यांना उद्धव ठाकरेंनी पुन्हा सेनेत आणले आहे.

बाळासाहेब दांगट हे १९९० आणि १९९५ मध्ये जुन्नर तालुक्यातून शिवसेनेचे लोकप्रतिनिधी होते. २००४ मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन काँग्रेसचा झेंडा हाती घेतला होता.

या पार्श्वभूमीवर सध्या भाजपमध्ये नाराज असलेले बुलढाण्यातील नेते विजयराज शिंदे यांना पुन्हा शिवसेनेत आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न चालवले आहेत. विजयराज शिंदे हे तीन टर्म बुलढाण्याचे आमदार होते. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना सोडून गेलेल्या जुन्या नेत्यांना माघारी आणण्यासाठी पद्धतशीर मोहीम राबवली जात आहे त्यातील पुढचं टार्गेट विजयराजे शिंदे असल्याचं सांगण्यात येत आहे.

याच प्लॅनबरोबर दुसरी गोष्ट उद्धव ठाकरेंच्या स्ट्रॅटेजीमध्ये प्रकर्षाने तुम्हाला दिसत असेल ती म्हणजे पक्षातील जुन्या नेत्यांना पुन्हा ऍक्टिव्ह होण्याची संधी द्यायची.

गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरेंकडून जेष्ठ नेत्यांना आता तुम्ही घरी बसण्याची वेळ आली आहे असा मॅसेज देण्याचा प्रयत्न चालू होता. त्यामुळे अनंत गीते, चंद्रकांत खैरे यांच्याकडून मातोश्रीकडून आम्हाला आता पाहिल्यासारखं बोलवलं जात नसल्याचा सूर आवळला जात होता.

मात्र आत चित्र बदललेलं दिसतं. उद्धव ठाकरे गटात हे जेष्ठ नेते पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याचं दिसतं. चंद्रकांत खैरे रोज सेनेची प्रतिक्रिया संन्यास पुढे येत आहेत. मराठवाड्यातून जे पक्ष प्रवेश होत आहेत त्यामध्ये देखील ते खैरे यांचा हात असल्याचं दिसतं. उद्धव ठाकरेंचा जो मराठवाडा दौरा झाला त्यामध्येही चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर दिसले. त्यामुळे चारवेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ऍक्टिव्ह झाले आहेत.

तसेच इकडे कोकणातही माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते पुन्हा शिवसेनेच्या कार्यक्रमात दिसू लागले आहेत. उद्धव ठाकरेंना कोकणात हातभार लावण्यासाठी रायगडमधून अनंत गीते अनेक संघटना आणि त्यांचे नेते यांना मातोश्रीवर पाठिंबा घेउन येताना दिसत आहेत. महाडच्या स्नेहल जगताप यांच्या सेनेतील प्रवेशसाठी देखील गीते प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर रायगडमधूनच सूर्यकांत दळवी देखील ऍक्टिव्ह झाले आहेत.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ही स्ट्रॅटेजी कामाला येणार का आणि ते त्यांचं लॉस्ट ग्राउंड पुन्हा मिळवणार का? हाच खरा प्रश्न आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.