कलकत्तात अनेक दिवस ओम पुरींनी रिक्षा चालवली पण ते कोणाच्याही लक्षात आले नाही…

आपल्याकडे हिंदी सिनेमा मध्ये नैसर्गिक अभिनय करणारे तसे कमी कलावंत आहे. सहज सुलभ आणि उत्स्फूर्त अभिनय करणारे कलावंत रसिकांच्या मनात घर करतात. अभिनेते बलराज सहानी, मोतीलाल, संजीव कुमार या ‘गोल्डन इरा’ मधील कलावंतांच्या सोबतच एक नाव प्रामुख्याने घ्यायला हवे ते म्हणजे अभिनेता ओम पुरी यांचे!

ओम पुरी यांना रुढार्थाने देखणं रूप नसताना ही हिंदी सिनेमाच्या पडद्यावरील सशक्त अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या अभिनयात रंगलेल्या कित्येक भूमिका म्हणजे अर्धसत्य, सदगती, आक्रोश, आरोहण, तमस,जाने भी दो यारो, मंडी, गांधी … या सिनेमातील भूमिका आजही लख्ख आठवतात.

ओम पुरी ने १९९२ साली ‘ सिटी ऑफ जॉय’ या इंग्रजी चित्रपटात अप्रतिम भूमिका साकारली होती.

या सिनेमाचे दिग्दर्शन ब्रिटीश दिग्दर्शक Roland Joffé यांनी केले होते. ओम पुरी यांनी कलकत्त्यातील एका रिक्षावाल्याची भूमिका केली होती. त्या काळी कलकत्त्यामध्ये हाताने ओढणाऱ्या रिक्षा असायच्या. बलराज सहानी यांनी १९५२ साली ‘दो बिघा जमीन’ या चित्रपटात अशीच भूमिका निभावली होती.

ओम ला जेंव्हा हि भूमिका ऑफर झाली तेंव्हा ते खूष झाले. आव्हानात्मक भूमिका साकारायची त्यांना आवडच होती. या भूमिकेमध्ये नैसर्गिकता येण्यासाठी ओम पुरी यांनी चक्क तीन महिने कलकत्ता ला जाऊन रिक्षावाल्यांच्या सोबत रिक्षा चालवली.

त्यावेळी कलकत्ता शहराच्या अनेक रस्त्यावरून ओम पुरी रिक्षा चालवली परंतु कोणाच्याही लक्षात आले नाही की हा रिक्षावाला एक अभिनेता आहे. त्यांनी रिक्षावाल्याचा संपूर्ण गेटअप अंगीकारला होता. त्यांचे कपडे त्यांचा ओढलेला चेहरा, वाढलेली दाढी, चेहऱ्यावरील गरीबीचे लाचार भाव यासाठी ओम पुरी यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी या काळामध्ये मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे बंद केले होते.

साधा आहार चालू केला होता. रोज संध्याकाळी ते बॅडमिंटन खेळायला, पळायला जायचे. अशा तऱ्हेने त्यांनी जवळपास ३० ते ३५ किलो वजन कमी केले होते. रिक्षा चालवण्यासाठी त्यांनी दोन रिक्षावाल्यांकडून रिक्षा चालवण्याच्या तंत्र शिकून घेतले. रिक्षा चालवताना इतर कुठल्याही प्रवासाने हात करून त्यांना रिक्षात घ्या असे म्हणू नये म्हणून ओम पुरी या रिक्षामध्ये कायम एक सवारी घेऊनच बाहेर पडायचे! त्यामुळे इतर कुठलेही प्रवासी त्यांची रिक्षा थांबवत नसत.

ही रिक्षातील सवारी म्हणजे खरंतर जी रिक्षा ओम पुरी यांनी भाड्याने घेतली होती तेच रिक्षावाले असत. हे रिक्षावाले ओम ला बारीक सारिक टेक्निक सांगायचे. खरी पंचाईत त्या वेळेला व्हायची ज्या वेळेला भर गर्दीमध्ये समोरच्या गाडीने अचानक ब्रेक लावले तर व्हायची. अशा वेळी रिक्षाला देखील थांबावे लागायचे. रिक्षाला कुठलेही ब्रेक नव्हते.

रिक्षा ओढत असल्यामुळे त्याला आपोआपच एक मोमेंटम आलेला असायचा. त्यामुळे रिक्षा थांबवण्यासाठी पाय घट्ट एका जागी उभे करावे लागायचे. त्यामुळे रिक्षाचा सगळा जोर हातावर आणि छातीवर यायचा. कित्येकदा हात पाय खरचटायचे. एरवी कायम एसी त वावरणारा हा अभिनेता भर उन्हात कलकत्याच्या रस्त्यावर अनवाणी रिक्षा ओढत होता.

रिक्षावाल्यांचे काम किती कठीण आहे हे ओम पुरी यांनी ओळखले.

ती सगळी मेहनत परिश्रम त्याला आपल्या चेहऱ्यावर आणायची होती म्हणून त्याने तीन महिने चक्क रिक्षा रस्त्यावर चालवली होती. अभिनयात वास्तवता यावी या साठी हे सारे परिश्रम होते.

या सिनेमात ओम सोबत Patrick Swayze,Pauline Collins आणि शबाना आजमी यांच्या भूमिका होत्या. ‘सिटी ऑफ जॉय’ हा सिनेमा चित्रीकरणा पासूनच वादग्रस्त ठरला ‘भारतातील गरिबीचे प्रदर्शन करून पैसे मिळवण्याचा धंदा बंद करा’ असे म्हणत कलकत्त्यामध्ये नागरिक रस्त्यावर उतरले त्यांनी चित्रीकरण बंद पाडले.

मोर्चा, दगडफेक, लाठीचार यातून हे प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाने काही अटी-शर्ती वर चित्रीकरणाला परवानगी दिली. दिग्दर्शकाने फटाफट चित्रीकरण करून सिनेमा बनवला. शूटिंगच्या दरम्यान इतका गदारोळ झाल्यामुळे हा सिनेमा जगभर जरी प्रदर्शित झाला असला तरी भारतात मात्र याला प्रदर्शित होवू दिले नाही.

या सिनेमाच्या अमेरीकेतील प्रदर्शनाच्या वेळचा एक विनोदी किस्सा आहे.

लॉस एंजल्स येथे ओम पुरी सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेला होता. तिथे दिग्दर्शक रोलांड यांच्या घरी गेला. त्यावेळची हि एक गमतीदार आठवण आहे. तिथे ओम पुरी ने एकदा दिग्दर्शक रोलांड सांगितले ,”आज मी तुम्हाला भारतीय जेवण करून खाऊ घालतो.” दिग्दर्शकाने देखील आनंदाने त्याला परवानगी दिली. ओम बाजारात जाऊन डाळ, भाजी ,तांदूळ, आटा घेऊन आले.

पुलाव, डाळ आणि पराठे असा साधाच मेनू ठरला. डाळ आणि पुलाव तर बनला पण आता पंचाईत आली पराठे बनवण्याची! कारण तिकडे पोळपाट लाटणे नव्हते. आता प्रश्न पडला काय करायचं? तिकडे किचन प्लॅटफॉर्मचा पोळपाट म्हणून वापर करता आला असता पण लाटण्याची काय करायचे? विचार करत करत असताना त्याची नजर शेल्फ वर पडली. तिथे एक वाईनची रिकामी बॉटल वर त्याची नजर पडली.
ओम ने ती बॉटल काढली व स्वच्छ धुतली. या रिकाम्या बॉटल ने त्याने त्या दिवशी पराठे लाटले! लाटण्याच्या ऐवजी बॉटल ने बनवलेले पराठे एकदम टेस्टी झाले होते. या सिनेमा साठी ओम पुरी ने अतोनात परिश्रम केले.सिनेमा च्या आधी आणि नंतर ही! हा सिनेमा त्या काळी भारतात प्रदर्शित होवू शकला नाही पण आता ओटीटी वर उपलब्ध आहे. हा किस्सा ओम पुरी ने त्याच्या आत्मचरित्रामध्ये सांगितला आहे!

-भिडू धनंजय कुलकर्णी 

-हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.