ओम पुरी पासून इरफान खान पर्यंत अभिनयाच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या

साधारण 1972-73 चा काळ. इब्राहिम अल्काझी हे त्यावेळी ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा’चे संचालक होते. पंजाबी पार्श्वभूमीतुन आलेले ओम पुरी हे त्यांचे विद्यार्थी होते. एक राष्ट्रीय संस्था असल्यामुळे एनएसडीचे सगळं वातावरण इंग्रजीमय होतं.

पण इंग्रजी बोलता येतं नसल्यामुळं पुरी कमालीचे अस्वस्थ होतं असतं.

ते ‘ प्रॅक्टिकल्स’ उत्तम करीत. मात्र वर्गात अगदी गप्प बसतं. चर्चेत भाग नाही की प्रश्न विचारणे नाही. या वातावरणामुळे पुरींमध्ये अखेर न्युनगंड तयार झाला. सहा महिन्यांमध्ये हा न्युनगंड इतका वाढला की त्यांनी एनएसडी सोडण्याच्या निर्णय घेतला.

पुरींची ही अस्वस्थता अल्काझी यांच्या नजरेतुन सुटली नाही. उत्तम अभिनय क्षमता असणारा हा विद्यार्थी वर्गात गप्प का बसतो हे कोडं सोडवण्याची जबाबदारी अल्काझींनी प्रा. रैना यांना दिली.

रैनांनी लगेच पुरी यांच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली.

प्रॅक्टिसची ठिकाणं, वर्गांमध्ये विषेश लक्ष द्यायला लागले. रैना काही दिवसांच्या निरीक्षणानंतर एक दिवस संधी पाहून पुरींशी बोलायला आले. ‘इंग्रजी नीट बोलता येत नसल्यानं ही अस्वस्थता आहे असं रैना यांनी अल्काझींच्या कानावर घातलं. त्यांनी ओम यांना बोलवुन घेतलं न् सांगितलं

“इंग्लिश हव्वा नहीं है। यह तो भाषा है। पढने, और सुनने से तुम वो भी अच्छी तरह से बोल सकते हो. क्लास मे चुप मत बैठा करो. तुम मेहनती हो, यदि अंग्रेजी की वजह से अटक जाओ तो कुछ दिन हिंदी में बोल देना पर रुकना मत। डायलॉग पूरा होना चाहिए, धीरे धीरे अंग्रेजी में बात करना. गलती हो गयी तो दोस्त संभाल लेंगे”

या सगळ्याचा परिणाम झाला आणि ओम पुरी वर्गातही बोलु लागले.

पुढील काही दिवसातच ओम पुरी यांना जपानी दिग्दर्शकांच्या ‘इबागीरी’ या काबुकी नाटकामध्ये मुख्य भुमिका मिळाली.

1962 ते 1977 असे तब्बल 15 वर्ष एनएसडीच्या संचालकपदी राहिलेले अल्काझी यांनी नसिरूद्दीन शाह, पंकज कपूर, रोहीणी हट्टंगडी, ज्योती सुभाष, विजया मेहता, बी. जयश्री, रतन थिय्याम, बी. व्ही कारंथ, उत्तरा बावकर, सई परांजपे, नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान, आशुतोष राणा, अतुल कुलकर्णी, अमृता सुभाष, वामन केंद्रे, मिलिंद शिंदे….. अशा लिस्ट न संपणाऱ्या दिग्गजांची करिअर घडवली आहेत.

आपण आज आदराने पाहत असलेली ही अख्खी पिढी अल्काझी यांच्या हाताखाली तयार झाली.

अल्काझी यांचा जन्म 1925 मध्ये पुण्यात झाला. त्यांचे वडील सौदीचे प्रसिद्ध बिझनेसमन आणि आई कुवैती होती. पुण्याच्या सेंट व्हिन्सेंट हायस्कुलमध्ये त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं. भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी त्यांचं संपुर्ण कुटुंब पाकिस्तानमध्ये गेलं.

पण अल्काझी यांनी मात्र भारतातच राहण्याचा निर्णय घेतला.

पुढे मुंबईला ‘सेंट झेवियर्स’ या नामांकित कॉलेजमध्ये अल्काझींनी ‘बी.ए.’साठी प्रवेश घेतला. पण नाटकाकडेच त्यांचा जास्त ओढा असल्याने कॉलेजमध्ये असतानाच ‘बॉबी परमसी’ नाटक ग्रुपशी ते जोडले गेले.

नाटकाच्या या वेडापायी त्यांच कॉलेजमध्ये विषेश मन रमलं नाही न् त्यामुळे 1947 साली ते बी. ए. चा अभ्यासक्रम अर्धवट सोडून लंडनला रवाना झाले. त्यांनी तेथे अग्रगण्य अशा ‘रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट’मध्ये नाट्य प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यांचा त्यावेळचा एक सहकारी सांगतो,

अल्काझी एका तळघरातल्या फ्लॅटमध्ये कवी निस्झी इझिकेलबरोबर राहत. जेवताना, खाताना त्यांच्या पुढ्यात सतत युरोपीयन नाटकांची पुस्तक असतं!’

या अस्सल नाट्य कलाकाराने आपल्या प्रतिभेचा प्रभाव लंडनमध्ये ही पाडला. हा प्रभाव इतका होता की, कोर्स पूर्ण झाल्या बरोबरच त्यांना ‘इंग्लिश ड्रामा लीग’ आणि ‘ब्रिटीश ब्राॅडकास्टिंग कंपनी’ या दोन्ही नामवंत संस्थांनी सन्मानित केलं. सोबतचं ब्रिटीश थिएटरसाठी पूर्णवेळ काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. पण त्यांनी ती प्रांजळपणे नाकारली.

त्यांचा ओढा भारतीय रंगभूमीकडेच असल्यामुळं ते पुन्हा भारतात आले.

आल्यानंतर नाटकाचा एक ग्रुप करुन पुन्हा नाटक सुरू तर केले. सोबतच इंग्लंडप्रमाणं भारतातही पूर्णवेळ गंभीरपणे नाट्यप्रशिक्षण देणारी भक्कम संस्था निर्माण व्हावी हे स्वप्न त्यांनी पाहिलं.

पण तो नुकातच स्वातंत्र्यानंतरचा काळ होता. देश गरीबीशी लढत होता आणि रस्ते – वीज – पाणी या मुलभूत सोयी आणि मूलभूत शिक्षण यांचाच अभाव होता. त्यामुळे या सुविधांना प्राधान्य असताना ‘नाटक’ वगैरे प्रशिक्षणाला गांभीर्यानं कोण घेणार? तरीही तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी १९५५ ला ‘संगीत नाटक अकादमी’ स्थापन करून नाट्यप्रेमींसाठी एक आशेचा किरण दाखवला.

हळूहळू यातूनच ‘एन. एस. डी.’ उभं राहिलं. इब्राहिम अल्काझी यांना त्याचा अभ्यासक्रम आणि आखणी करण्याची सगळी जबाबदारी दिली गेली.

संचालक पद नाकारलं.

एन. एस. डी. उभी राहिली तेव्हा त्याचे संचालक पदाची जबाबदारी स्विकारण्याची विनंती सरकारने केली. मात्र आपण सध्या केवळ 29 वर्षाचे असून या पदासाठी अजून तयार नसल्याचे त्यांनी सरकारला कळवले.

पुढे बरोबर सात वर्षानंतर म्हणजे 1962 मध्ये सेतु सेन यांच्या कार्यकाळानंतर त्यांनी ही विनंती मान्य केली.

खुल्या रंगमंचाचे प्रणेते

आज आपण जो रंगमंच पाहतो ज्याला प्रासिनियम म्हणतात, त्याची चौकट मोडून खुल्या रंगमंचाची कल्पना इब्राहिम अल्काझी यांनी भारतात रूढ केली. गिरीश कार्नाड यांचं ‘तुघलक’सारखं नाटक त्यांनी दिल्लीतल्या पुराना किल्ल्यावर सादर केलं.

खुल्या रंगमंचाचे अनेक प्रयोग करून पाहिले. आणि त्यासाठी हक्काचा रंगमंच असायला हवा म्हणून त्यांनी एन. एस. डी. मध्ये ‘मेघदूत’ एक खुला रंगमंच उभा केला. त्याचा सध्या विस्तार करण्यात आला आहे. असलेल्या जागेत आणखी चार छोटे छोटे खुले रंगमंच उभे केले गेले आहेत.

आणि नावावरुन वाद 

2017 मध्ये यातील एका रंगमंचाला इब्राहिम अल्काझी यांच नावं देण्यात आलं. पण वास्तविक ‘मेघदूत’ च नामांतरण झाल्याच्या अफवा काही हिंदुत्ववादी संघटनांनी उठवल्या आणि त्यावरुन वातावरण देखील तापवलं. पण संपूर्ण मेघदूतचं नामकरण झालेलं नाही. ते तसंच आहे. त्यातल्या एका मंचाला अल्काझींचं नांव दिलं गेलं आहे. ही वास्तव परिस्थीती आहे.

या प्रतिभावंत नाट्य कलावंताला संगीत नाटक अकादमीचे दोन पुरस्कार, ज्यात जीवनगौरव हा सर्वोच्च पुरस्कार, यासह ‘पद्मश्री-पद्मभूषण-पद्मविभूषण’ पासून तन्वीर पुरस्कार आणि फ्रान्स सरकारचा ‘नाइट ऑफ द आर्डर ऑफ आर्ट्स एंड लेटर्स’ पर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

असा हा भारतीय नाट्य क्षेत्रातला ‘शिखर पुरूष’ आज, वयाच्या ९५ व्या वर्षी हे जग सोडून गेला.

  •  ऋषिकेश नळगुणे.

संदर्भ :
1) अभिनेते ओम पुरी यांच्या निधनानंतर
‘विविधभारती’ने एक कार्यक्रम प्रसारित केला, त्यात ओम पुरी यांच्या मुलाखतीचा समावेश होता.
2) अभिनेता किरण माने यांची फेसबुक पोस्ट.
3) ‘हल्ली नावातच सगळं आहे’. महाराष्ट्र टाईम्स, 14/05/2017

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.