त्या दिवशी ओम पुरी पहिल्यांदा बोलला.

गोष्ट आहे खूप वर्षापूर्वीची. १९७० साल असावं. स्थळ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. भारत सरकारनं नाट्यशास्त्र प्रशिक्षणासाठी सुरु केलेली संस्था. इथे प्रवेश घेण्यासाठी अवघड अशी चाळणी प्रक्रिया पास होऊन देशभरातून विद्यार्थी येतात. फक्त १५ जणाची निवड व्हायची.

यातच होता नसिरुद्दीन शाह. नसीर एका जमीनदार कुटुंबातून आलेला होता. शिक्षण वगैरे कॉन्व्हेंटमध्ये झालेलं. दिसायला देखणा नव्हता पण इंग्रजाळलेला आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.

पहिलाच दिवस होता. दिल्लीच्या कॉलनीच्या एका इमारतीमध्ये हे इन्स्टिट्यूट होतं. तिसऱ्या मजल्यावर क्लास होता. नसीर वर जात होता तेव्हा जिन्यात त्याला दोन मुलं दिसली. दोघेही गावाकडून आलेली वाटत होती. पांढरा साधा शर्ट. विस्कटलेले केस. एकजण बाथरूममध्ये गेला दुसरा मुलगा तिथेच उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर देवीचे व्रण होते. थोडासा लाजाळू दिसणाऱ्या त्या मुलाला नसीरने आपली ओळख सांगत हाय हेलो केले.

तो मुलगा म्हणाला,

“हॅलो माय नेम इज ओम पुरी.”

तो खर्जातला दमदार आवाज ऐकून नसीर मनाशीच म्हणाला,

” काय जबरदस्त आवाज आहे. काश मेरी आवाज ऐसी होती.”

नसिरुद्दीन शाह आणि ओम पुरीची ही पहिली भेट. आयुष्यभराची मैत्री, स्पर्धा, अभिनयाचा एकाहून एक जबरदस्त परफॉरमन्स या सगळ्याची ही सुरवात होती. पहिल्याच भेटीत दोघांनी एकमेकांना जोखल होतं.

नसीरच्या घरच्या श्रीमंतीच्या अगदी विरुद्ध ओम पुरीची घरची स्थिती होती. अवघ्या सहाव्या वर्षी चहाच्या टपरीवर ग्लास विसळण्यापासून त्याचा प्रवास सुरु झाला होता. शिक्षण हिंदी मिडीयम मध्ये झालेलं. काहीच आत्मविश्वास नाही. नसीरशी बोलताना सुरवात इंग्रजीमधून करणाऱ्या ओम पुरीच इंग्लिशच ज्ञान त्याच एका वाक्यापुरत होतं.  

नाटकासारख्या अभिव्यक्तीच्या माध्यमामध्ये हा लाजाळू मुलगा कसा टिकणार याचच सगळ्यांना टेन्शन असायचं. सगळ्यात जास्त टेन्शन होत इब्राहीम अल्काझी यांना. ते त्या संस्थेचे डायरेक्टर होते. अगदी आपल्या हाताने त्यांनी हि संस्था घडवलेली होती. तिथले विद्यार्थी त्यांच्या मुलांच्या प्रमाणे होते. आपल्याकडे जे आहे ते भरभरून देण्यासाठी ते उत्सुक असायचे. प्रत्येक मुलावर त्याचं विशेष लक्ष असायचं.

नसीर तेव्हाही तिथला स्टार स्टुडंट होता.

त्याचा अभिनय, त्याचा आत्मविश्वास, त्याच इंग्लिश यावर सगळ्या मुली मरायच्या. एनएसडीच्या प्रत्येक नाटकात महत्वाचे, हिरोचे रोल त्यालाच मिळायचे. पहिल वर्ष असच गेल. दुसऱ्या वर्षात वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये विद्यार्थी वाटले जातात. नसीरच्या गर्लफ्रेंडने त्याला सल्ला दिला होता कि

“तसही तू चांगला अभिनय करतोस. त्यामुळे अभिनयाच्या कोर्सला जाण्यापेक्षा दिग्दर्शनामध्ये जा. तिथे तुला शिकायला मिळेल.”

नसीर पडत्या फळाची आज्ञा मानून दिग्दर्शनाच्या कोर्सला गेला. पण तिकडे जाऊनही जेव्हा नाटके बसवली जायची तेव्हा मुख्य कलाकार नसीरलाच केल जायचं. ओमला याचा राग यायचा. एक दिवस इब्राहीम अल्काझी सूर्यमुख या नवीन नाटकाचे कलाकार निवड होते अचानक ओम पुरीनी हात वर केला.

“सर आय वॉन्ट टू से समथिंग”

अल्काझी सरांचे डोळे फिरले. याला आज कुठून जोर चढला? तेही थेट इंग्लिश मध्ये? पण ओम पुरी पूर्ण तयारी करून आले होते. त्यांनी काय बोलायचं याचे डायलॉग पाठ केले होते.

“सर दे आर डिरेकशन स्टुडंटस, वी आर अॅक्टिंग स्टुडंटस. प्रेफरन्स फोर मेन रोल शुड बी गिव्हन टू अस. “

आयुष्यात पहिल्यांदा आत्मविश्वासाने ओम पुरी बोलला होता. तेही फर्ड्या इंग्लिश मध्ये. चिडलेल्या अल्काझी सरांनी त्याच्या कडे काही सेकंद रोखून पाहिलं आणि म्हणाले,

“कल पढ के आना. तुम्हारा टेस्ट लेंगे”

ओमने रात्रभर मेहनत केली. दुसऱ्या दिवशी त्याने वाचून दाखवलेला तो सूर्यमुख एनएसडीचे विद्यार्थी आजही विसरू शकत नाहीत. ओमचा हरवलेला आत्मविश्वास परत आला. तो स्टार बनून त्या रूममधून बाहेर आला, दारासमोर नसिरुद्दीन शाह उभा होता. तो म्हणाला,

“मुझे पता था तुम एक दिन बोलोगे.”

पुढे या दोघांनी एफटीआयआय मध्ये प्रवेश घेतला. नसीरने त्याला ओढून तिकडे नेल. अंगात घालायला शर्ट नव्हता. आपला एक भारीतला शर्ट दिला. एफटीआयआय मध्ये प्रवेश म्हणजे पुढची दिशा पक्की होती. फिल्मलाईन. दोघेही हिरो मटेरियल नाहीत. त्याकाळचा त्यांचा फोटो बघून एकदा शबाना आझमी म्हणाली होती,

“दो इतने बदशकल इन्सान, तुम्हारी हिंमत कैसे हुई इस इंडस्ट्री में आने की.”

पण याच दोन बदशकल इंस्नानांनी भारताची फिल्मइंडस्ट्री बदलून टाकली. तो पर्यंत फक्त चिकनेचुपडे अभिनेते हिरो बनत होते. अभिनयाचा मापदंड बनवला. इंग्लिश न येणाऱ्या ओम पुरीने पुढे जाऊन बावीस इंग्रजी सिनेमांमध्ये अॅक्टिंग केली. त्याच्या आवाजाने सगळ्यांना हलवून टाकलं.

आजही भारतातले सर्वोत्तम एक आणि दोन नंबरचे अभिनेते हा याच दोघा दोस्तांना जातो.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.