गंभीर की धोनी? हिरो कुणालाही म्हणा, त्या दिवशी ११ जणांनी सगळ्या भारताचं स्वप्न पूर्ण केलं

रस्त्यावरच्या दुकानांबाहेर, घरात कोंडाळं करुन, गणपती मंडळांनी लावलेल्या स्क्रीनसमोर, जिथं शक्य होईल तिथं गर्दी. त्यादिवशीच्या दुपारनंतर कित्येकांना ना भूक लागली, ना उभे राहून पाय दुखले. जवळपास ३०० बॉल्सचा खेळ, दोनदा झालेल्या टॉसपासून त्या शेवटच्या छकड्यापर्यंत लोकांनी प्रत्येक बॉल… प्रत्येक क्षण पाहिला. आज या सगळ्याला ११ वर्ष पूर्ण झाली, पण आजही हे सगळं काल घडल्यासारखंच वाटतं.

का? कारण आपण भारतीय लोकं क्रिकेट म्हणलं, की लय इमोशनल होतो आणि भारताला वर्ल्डकप जिंकताना पाहणं हे आपल्यासाठी जगातलं सगळ्यात बाप फिलिंग होतं.

ही गोष्ट २०११ च्या वर्ल्डकप विजयाची आहे, जी आपण सगळ्यांनी अनुभवलीये. आज पुन्हा एकदा होऊन जाऊद्या… पण थोड्या ट्विस्टसकट.

वर्ल्डकप भारतात होणार म्हणल्यावर प्रेशर लय डेंजर होतं. साऊथ आफ्रिकेविरुद्ध हरल्यावर जरा धक्का बसला होता, त्यात इंग्लंडविरुद्धची मॅच पण टाय झाली. तरी पण नॉकआऊट्स पर्यंतची जुळणी झाली आणि समोर उभी राहिली ऑस्ट्रेलिया. त्यावेळी वर्ल्डकपमधल्या सगळ्यात डॉन टीमला भारतानं हरवलं, पुढं आलं पाकिस्तान. मोहालीत झालेली ती मॅच म्हणजे विषय एन्ड होती, त्यादिवशी भारत बंद असल्याची फिलिंग आली.

पाकिस्तानला हरवलं तरी बास झालं, असं म्हणणारी जनता आता, वर्ल्डकप जिंकल्याशिवाय ऐकणार नव्हती.

तारीख २ एप्रिल २०११, मुंबईचं वानखेडे स्टेडियम. जवळपास ४३ हजार पब्लिक, सामान्य माणसं तर होतीच, पण सेलिब्रेटी लोकांची गर्दीही तितकीच होती. लंकेनं दुसऱ्यांदा झालेला टॉस जिंकला (इथं लय लोकांनी संगकाराला कचाकचा शिव्या दिल्या.) झहीर खान जगात भारी बॉलिंग करत होता. लंकेची लय बाप बॅटिंग फक्त दोन खांबांवर टिकली, संगकाराचे ४८ आणि जयवर्धनेचे १०३ रन्स. लंकेचा स्कोअर झालेला, ६ आऊट २७४.

२७५ बघायला गेलं तर सोपं टार्गेट, पण वर्ल्डकप फायनल म्हणल्यावर विषय डीप असतोय भिडू.

पाहिल्याच ओव्हरचा दुसरा बॉल आणि सेहवाग आऊट. आता २७५ चा आकडा लय फुगलेला वाटू लागला. सचिननं प्रत्येक बॉल खेळण्याआधी टाळ्या वाजायच्या, कमॉनचा गजर व्हायचा, पोरं देवाला एका बोटाचा नमस्कार करायची.

पण सचिन सेट व्हायच्या आधीच, पुन्हा मलिंगानंच भारताला धक्का दिला…

सचिन तेंडुलकर वर्ल्डकप फायनलमध्ये १८ रन्सवर आऊट.

सगळं वानखेडे शांत, मॅच बघणारा प्रत्येक भारतीय शांत, एवढ्या गर्दीत एखादी टाचणी पडली असती तरी आवाज आला असता… कित्येक पिढ्यांचा हिरो असलेला सचिन आऊट होऊन परत येत होता आणि नव्या पिढीचा हिरो बॅटिंगला जात होता… त्याचं नाव विराट कोहली.

कोहलीच्या ३५ रन्सनं मोलाचं योगदान दिलं. पण ज्या पद्धतीनं दिल्शाननं कोहलीचा कॅच घेतला, ते बघून आपल्या बत्त्या डीम झालेल्या. पोरांनी फटाके आणायला काढलेलं कॉन्ट्री तसंच राहिलं, सगळ्यांचे डोळे स्क्रीनवर खिळलेले कारण आता युवराज येणार होता.

पण झालं भलतंच, काखेत निळ्या रंगाचं स्टिकर असलेली रिबॉकची बॅट, काहीशी ढगळ असणारी हलणारी जर्सी अशा अवतारातात मैदानावर उतरला… भारताचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी. या स्पर्धेत धोनी नेहमीच्या फॉर्ममध्ये नव्हता, पण त्यानं फायनलमध्ये फॉर्मातल्या युवराज आधी येण्याची डेरिंग केली, कारण लाला रिस्क है तो इस्क है.

धोनी यायच्या आधी आणि आल्यानंतरही मैदानावर एक कार्यकर्ता मात्र टिकून होता, गौतम गंभीर. गंभीरनं जेव्हा रनआऊट होऊ नये म्हणून डाइव्ह मारली, तेव्हा असंख्य भारतीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

त्यावेळी त्याच्या जर्सीवर लागलेला डाग, ना कधी धुतला जाईल आणि ना कधी आपल्या आठवणींतून पुसला जाईल.

गंभीर आणि धोनीनं भारताला मॅच काढून दिली, गंभीर ९७ वर आऊट झाला आणि त्यादिवशी एक गोष्ट सगळ्या जगाला समजली. तुम्ही सेंच्युरी न मारताही लोकांच्या आयुष्यभर लक्षात राहू शकताय… टीशर्टवरच्या डागासह.

युवराजचे पाय ग्राऊंडला लागले आणि धोनी सुटलाच, आता विजय जवळ दिसू लागला. मलिंगाच्या ४८ व्या ओव्हरमध्ये ११ रन्स आले. ४९ व्या ओव्हरचा दुसराच बॉल, युवराजनं धोनीला स्ट्राईक दिली, नुवान कुलसेकरा बॉलर होता, धोनीनं त्याला लॉंग ऑनला सिक्स उचलला, बॉल हवेत होता आणि असं वाटलं त्या मॅचमध्ये पहिल्यांदाच कॉमेंट्री ऐकतोय…

“DHONI, finishes off in style, India lift the world cup after 28 years.”

रवी शास्त्रीच्या आवाजात उमटलेले हे शब्द, आवडत्या पोरीनं होकार देताना बोललेल्या शब्दांपेक्षाही जास्त आवडते आहेत. भारत वर्ल्डकप जिंकलाय ही जाणीव धोनी-युवीच्या मिठीनं आणि रवी शास्त्रीच्या शब्दानं करुन दिली. त्या एका लाईनसाठी शास्त्रीला स्वखर्चानं बैठकीला बसवायची लय इच्छाय…

त्यानंतर मैदानात काय झालं, हे दुसऱ्या दिवशी समजलं. कारण मॅच जिंकल्यानंतर टीव्हीसमोर कुणी थांबलंच नाय. म्हणजे बघा आमच्या एका दोस्तानं जिंकल्याच्या नादात घरात आनंदानं शिवी दिली आणि फादर मुस्काडल म्हणून गायब झाला. दुसरा एक गडी, ज्या दुकानाबाहेर मॅच बघत होता, तिथल्या मालकाचा जिगरी दोस्त बनला, कुणी नाचून बेफाम झालेलं, तर कुणाच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नव्हतं.

पोरांच्या खांद्यावर बसून सगळ्या मैदानाला व्हिक्ट्री लॅप मारणारा सचिन, कॅन्सरला फाट्यावर मारत गुडघ्यावर बसून लहान पोरासारखा रडणारा युवराज, शॅम्पेन उडवत हसणारा धोनी, शांत संयमी झहीर, डाग अच्छे है वाला गंभीर, सेहवाग, कोहली, रैना, भज्जी, श्रीशांत, मुनाफ… भारताचे अकरा हिरो. 

ज्यांनी आपल्या आयुष्यात एक असा दिवस आणला, की आपण तो आठवून दरवर्षी आणि दरवेळी खुश होतो.

मॅच जिंकल्यावरच्या भाषणात युवराज म्हणाला होता, ‘Thank you, India.’ पण खरंतर आपल्याला युवराजला, सचिनला, गंभीरला, धोनीला आणि कोच गॅरी कर्स्टनसकट सगळ्या टीम इंडियाला थँक यू म्हणायचं होतं. 

आयुष्यात लाख क्षण परत अनुभवता येतील, पण ना त्या रात्री वानखेडेवर ऐकलेल्या वंदे मातरमची सर कशाला येईल आणि ना रस्त्यावरच्या गर्दीत उभं राहून भारतामाता की जय म्हणल्याची…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.