मुलाचा मृतदेह फेकून देण्यात आला, म्हणून त्यांनी बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायचं ठरवलं
कोरोना महामारी हा आपल्या सगळ्यांसाठीचं एक अवघड काळ होता. दररोज येणारा संक्रमितांचा आणि मृतांचा आकडा मनाला धडकी भरवायचा. अनेकांना आपल्या जवळच्या लोकांचा अत्यंविधी करायला सुद्धा परवानगी नव्हती.
पण या अवघड परिस्थितीत सुद्धा आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स आणि काही सामान्य लोकांच्या मदतीने माणुसकीचे दर्शन पहायला मिळाले. त्यातलचं एक उदाहरण म्हणजे शरीफ चाचा. ज्यांना नुकताच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेय.
अयोध्या पोलीस लाईन परिसरात असलेल्या एका छोट्या गल्लीत त्यांचं घर. भाड्याने असलेल्या या घरात १५ जणांचं कुटुंब एकत्र राहतं. या कुटुंबाचे प्रमुख म्हणजे ८५ वर्षीय मोहम्मद शरीफ म्हणजेच शरीफ चाचा.
कोरोना काळात बेवारश्यात गत पडलेल्या मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्याच्या त्याच्या समर्पणाबद्दल त्यांना २०२० मध्ये भारतातील चौथा-सर्वोच्च नागरी पुरस्कार असणारा पद्मश्रीने प्रदान करण्यात आला.परंतु कोविड निर्बंधांमुळे त्यांचा गौरव सोहळा काही आठवड्यापूर्वी पार पडला.
सायकल मेकॅनिक-सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद शरीफ यांनी आतापर्यंत २,५०० मुस्लिम आणि ३,००० हिंदूंचे दफन आणि अंत्यसंस्कार केले आहेत. जेणेकरून मृत्यूनंतर तर त्यांची प्रतिष्ठा राखली जाईल.
अतिशय साधं आणि कष्टाचं जीवन जगणारे शरीफ चाचा आपलं घर चालवण्यासाठी सायकल दुरुस्तीचे काम करायचे. या दरम्यान जवळपास २८ वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात एक धक्कादायक क्षण आला. जेव्हा त्यांचा २५ वर्षीय मुलगा मोहम्मद रईस, जवळच्या सुलतानपूर जिल्ह्यात गेला पण परत आलाच नाही.
संपूर्ण कुटुंबाने अनेक आठवडे त्याचा शोध घेतला पण काही उपयोग झाला नाही. त्यानंतर जे घडले ते आठवून शरीफ यांच्या डोळ्यात आजही पाणी येते.
शरीफ चाचा यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘महिन्याभरानंतर एक पोलिस आमच्या घरी आले आणि त्यांना आम्हाला माझ्या मुलाचा शर्ट दाखवला. कुटुंबीयांचा विश्वास आहे की, रईसचा खून झाला आहे. पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले की, त्याचा मृतदेह बेवारस आहे असं समजून मृतदेह गोमती नदीत फेकून दिला होता.’
तेव्हापासूनच शारीरिक चाचांनी शपथ घेतली की, शक्य तितक्या बेवारस मृतदेहांना आदरपूर्वक निरोप देईल. मग तो कोणत्याही जाती- धर्माचा का असेना कुजू देणार नाही. हिंदू लोकांचा हिंदू प्रथेनुसार आणि मुस्लिमांचा त्यांच्या पद्धतीने निरोप देईल.
त्यानंतर आता अशी व्यवस्था करण्यात आली आहे की, ७२ तासांनंतरही कोणी मृतदेहाचा दावा केला नाही, तर स्थानिक प्रशासन शरीफ यांच्याकडे तो मृतदेह सोपवते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी शरीफ दुकानदार आणि त्यांच्या कामावर विश्वास ठेवणाऱ्या इतरांकडून देणग्या गोळा करतात.
इमर्जन्सी केसेससाठी त्यांनी बेडखाली ठेवलेले कपडे आणि कफन यांच्याकडे बोट दाखवत म्हंटले की, बऱ्याचदा मला रात्री दोन वाजताही हॉस्पिटल किंवा पोलिसांकडून फोन येतात.’
आता पुरस्कार मिळाल्यानंतर शरीर चाचांना सामाजिक मान्यता आणि आदर दोन्ही आहे पण शरीफ यांच्या म्हणण्यानुसार, १५ वर्षांपूर्वी गोष्टी खूप वेगळ्या होत्या. त्या वेळी लोकांनी त्याला सामाजिक मेळाव्यात बहिष्कृत केले आणि कधीकधी त्याच्याबरोबर जेवायलाही नकार दिला.
शरीफ चाचांनी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी हातगाड्या विकत घेतल्यात. त्यांनी आतापर्यंत हजारो लोकांचे अंत्यसंस्कार केले आहेत, परंतु शक्य होईल तितके रेकॉर्ड ते ठेवतात. धक्कादायक बाब म्हणजे शरीफ चाचांनी रेकॉर्ड म्हणून ठेवलेले काही मृतदेहांचे फोटो इतके भयानक आहेत की, त्यांचा चेहरा ओळखणं सुद्धा अवघड आहे.
शरीफ यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, या वर्षाच्या सुरुवातीला कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, बेवारस आणि सोडलेल्या मृतदेहांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. कुटुंबीय मृतदेह टाकून जात होते.
शरीफ यांचा मुलगा मोहम्मद सगीर ५० वर्षांचा असून तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. तो सांगतो की,
त्यांचे वडील आता वृद्ध होत असून त्यांना मदतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. एक वर्षापासून त्यांचे गुडघे जाम झाले आहेत. पूर्वी ते स्वतः हातगाडी ओढून सायकलने जायचे पण आता मला स्कूटीवर घेऊन जावे लागते. काही खासदार आणि मान्यवरांनी त्यांना आर्थिक मदत आणि घर देण्याचे आश्वासन दिले, पण अजूनही कुठलीही मदत मिळाली नाही.
शरीफ यांच्या प्रयत्नांना गेल्या अनेक वर्षांपासून मान्यता मिळाली आहे. २००९ मध्ये, त्यांना मुंबईत रिअल हीरोज अवॉर्ड देण्यात आला आणि २०१२ मध्ये ते सत्यमेव जयते या टीव्ही शोमध्येही दिसले. एवढचं नाही तर त्यांच्या जीवनावर ‘रायझिंग फ्रॉम द अॅशेस’ ही डॉक्युमेंट्रीही बनवण्यात आली आहे.
शरीफ चाचा सांगतात की, पद्मश्री मिळाल्यानंतर पार दिल्लीचे लोक भेटायला येतात. पण त्यांच्या घरची परिस्थिती अजूनही बेताचीचं आहे. एवढ्या वर्षांच्या सेवेत सरकारी मदत कधीच मिळाली नाही. कोविडच्या काळातही मी स्वतः सर्व काही केले. मला आशा आहे की सरकार आता आम्हाला मदत करेल आणि आम्हाला घर देईल.
हे ही वाच भिडू :
- एका माजी पाकिस्तानी सैनिकाला भारताने पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलंय.
- पद्मश्री मिळालेला गुंगा पैलवान दिल्लीत आंदोलनाला बसलाय
- मास्कच्या कचऱ्यापासून विटा बनवणाऱ्या या भिडूला पद्मश्रीसुद्धा मिळालाय